वसंतींची उत्तुंग भरारी...

    10-Jun-2026
Total Views |


Vasanthi 
 
आव्हानांना तोंड देत, गेली नऊ वर्षे मुंबई विद्यापीठाचा क्रीडा विभाग समर्थपणे सांभाळणार्‍या आणि त्याचवेळी स्वत:ही खेळात उत्तुंग झेप घेणार्‍या वसंती कधिरवन यांच्याविषयी...
 
मनाच्या संकल्पाची शक्ती फार मोठी. एखाद्या व्यक्तीने संकल्प केल्यास, त्या व्यक्तीला अनेक अडचणी आल्या, तरी मार्ग सापडतोच. म्हणूनच, ‘इच्छा तेथे मार्ग’ असे म्हटले जाते. भारत हा देश तरुणांचा म्हटला जात असला, तरीही मनशक्तीच्या जोरावर आजही अनेक वरिष्ठ गगनाला गवसणी घालताना दिसतात. आज विविध क्षेत्रांत असलेल्या अनेक वरिष्ठांची कामगिरी प्रसंगी तरुणांसाठीही आदर्शवत ठरते. असेच एक व्यक्तिमत्त्व म्हणजे वसंती कधिरवन!
 
मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा विभागाच्या विभागप्रमुख असलेल्या वसंती म्हणजे या संकल्पशक्तीचे उत्तम उदाहरणच! वसंती या मूळच्या तामिळनाडूच्या. तामिळनाडूच्या कोईम्बतूरजवळील रासीपुरम या गावी १९६७ मध्ये वसंती यांचा जन्म झाला. तिथेच त्यांचे बालपणही गेले. वसंती यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण काहीकाळ कॉन्व्हेंट, तर नंतर सरकारी शाळांमधून झाले. वसंती यांचे वडील क्रीडा शिक्षक आणि ‘एनसीसी’ ऑफिसर होते, तर आईदेखील शिक्षिका होत्या. त्यामुळे शिस्त, खेळाविषयीची विशेष भावना आणि अभ्यास यांचा वारसा वसंती यांना पालकांकडूनच लाभला. लहानपणापासूनच वसंती यांचे मन खेळाच्या मैदानावर रमत असे. त्यांना उंच उडी, लांब उडी आणि तिहेरी उडीमध्येही त्यांना विशेष रस होता. शालेय शिक्षणकाळापासूनच त्यांनी या खेळांच्या विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता.
 
वसंती यांनी शालेय शिक्षण झाल्यानंतर ‘राज्यशास्त्र’ विषयामध्ये पदवीही घेतली. तरीही, लहानपणापासून खेळाकडे असलेली ओढ त्यांना शांत बसू देईना. राज्यशास्त्राची पदवी घेतल्यानंतर वसंती यांनी ‘बीपीएड’ आणि ‘एमपीएड’ही केले. त्यानंतर त्यांनी या क्षेत्रात ‘एमफिल’चीही पदवी घेतली. ‘बीपीएड’ आणि ‘एमपीएड’ काळातही विशेष प्रावीण्य असलेला विषय म्हणून त्यांनी ‘उंच उडी’ या खेळालाच प्राधान्य दिले होते. पुढे वसंती यांना कनिष्ठ महाविद्यालयामध्ये अर्थार्जनाची संधी मिळाली. पुढे दोनच वर्षांत वसंती यांची निवड वरिष्ठ महाविद्यालयात झाली. याकाळातही नोकरीमुळे मैदान काहीसे दूर राहिले असले, तरीही वसंती यांनी सरावात अंतर पडू दिले नाही.
 
पुढे त्यांचे लग्न झाले आणि त्या मुंबईला आल्या. आता त्यांच्या समोरच्या अडचणी अधिकच वाढल्या. दक्षिण भारतातून मुंबईमध्ये आलेली तरुण मुलगी. प्रदेश, भाषा आणि चालीरीती या सगळ्यात एक नवेपणा जाणवत असला, तरीही अडचणीही डोळ्यासमोर काजवे होऊन चमकत होत्या. मात्र, लहानपणापासूनच क्रीडासंस्कार झालेल्या वसंती यांचा स्वभाव लढाऊ झाला होता. संकटाला संधीमध्ये रूपांतर करण्याची वृत्ती त्यांच्या अंगी विकसित झाली होती. त्यामुळे यावेळीही नव्या शहरात बावरून न जाता, वसंती यांनी प्राथमिक वर्गाच्या मुलांचे शिकवणी वर्ग घेण्यास सुरुवात केली. तामिळनाडूमध्ये भाषा विषय शिकताना, हिंदी विषय निवडल्याने त्यांना संवाद साधणे सहज झाले. तसेच अनेक मराठी विद्यार्थी आणि पालक यांच्याशी संबंध आल्याने, मराठी भाषा आणि प्रदेश व संस्कृतीचीही त्यांना ओळख झाली.
 
नंतर त्यांनी मुंबईमध्येच काही महाविद्यालयांमध्ये क्रीडा विभागप्रमुख म्हणून नोकरी करण्यास सुरुवात केली. मात्र, त्यावेळी देशामध्ये क्रीडा क्षेत्राचा विकास आजच्या इतका नसल्याने, महाविद्यालयांमध्ये पायाभूत सुविधांची कमतरता वसंती यांना बोचत असे. याच काळात त्यांनी क्रीडा विषयामध्ये ‘पीएचडी’ पूर्ण केली. २००८ मध्ये त्यांनी शिक्षक म्हणून मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा विभागात पाऊल ठेवले. खेळाडूंची मानसिकता समजून घेण्यासाठी त्यांनी या क्षेत्रातील मानसशास्त्राचीही पदवी घेतली.
 
आजही त्या क्रीडा विभागात प्राध्यापक असून, ‘रोटेशन’ पद्धतीने गेली नऊ वर्षे त्यांनी क्रीडा विभागप्रमुख म्हणून नेटाने कारभार सांभाळला होता. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत २५ विद्यार्थ्यांनी क्रीडा प्रशिक्षण विषयात ‘पीएचडी’ पूर्ण केली असून, वसंती यांनी मुंबई विद्यापीठातील सुरक्षा कर्मचारी, सफाई कर्मचारी, तसेच इतर कर्मचार्‍यांनाही विविध खेळांचे प्रशिक्षण दिले आहे. आज या कर्मचार्‍यांचा संघही विविध स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करत असून, त्यांच्या शारीरिक क्षमतांचाही विकास झाला असल्याचे वसंती सांगतात.
 
एवढे सगळे असूनही वसंती यांचे मैदान सुटलेले नाही. आजही त्यांचा सराव सुरू असून, त्या ५५ वर्षांवरील खेळाडूंसाठीच्या राज्यस्तरीय, राष्ट्रीय ‘मास्टर्स अ‍ॅथलेट’ स्पर्धांमध्ये सहभागी होतात. आजवर त्यांना दहाराष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये ‘कांस्य’ आणि ‘रौप्य’ पदक मिळाले आहे. ‘उंच उडी’ प्रकारात ‘महाराष्ट्र चॅम्पियन सुवर्णपदका’च्याही त्या मानकरी आहेत.
 
आजही वसंती यांचा खेळाचा नियमित सराव सुरू असून, त्या कामानिमित्ताने बाहेर गेल्यावरही लहानसे कीट बरोबर नेतात. पण, सरावामध्ये खंड पडू देत नाहीत. आज त्या संसार, कार्यालय आणि छंद यांना समान वेळ देत आहेत. त्या क्रीडा क्षेत्रामध्ये संशोधनही करत असून, त्यांचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये ६४पेक्षा जास्त संशोधन पेपरही प्रसिद्ध झाले आहेत. वसंती यांचे पती आणि मुलगीही खेळाडू असून, वसंती यांच्या ध्येयासक्तीला त्यांचा पूर्ण पाठिंबा आहे. आता ६० वर्षांच्या वरील व्यक्तींसाठी असलेल्या स्पर्धांमध्ये ‘सुवर्ण’ कामगिरी करण्याचे ध्येय वसंती यांनी ठेवले असून, त्यासाठी त्या कसून सराव करत आहेत. त्यांचे हे ध्येय साध्य होवो, याच दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून वसंती कधिरवन यांना शुभेच्छा!
 
- कौस्तुभ वीरकर