राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिनी सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
10-Jun-2026
Total Views |
मुंबई : (Sunetra Pawar's Emotional Post) "राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त पक्ष परिवारातील ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, समर्थक आणि हितचिंतकांना मनःपूर्वक शुभेच्छा! पण यंदाचा वर्धापन दिन साजरा करताना मनात एक वेगळीच भावना दाटून येते. कारण आज आदरणीय अजित दादा आपल्यात नाहीत…"
असे म्हणत पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी भावनिक पोस्ट सोशल मीडियावर बुधवार दि.१० रोजी शेअर केली आहे.
"सभागृहात भाषणं होतील, कार्यकर्त्यांचे मेळावे होतील, पक्षाचा झेंडा तितक्याच अभिमानानं फडकेल, पण प्रत्येक क्षणी एक पोकळी जाणवत राहील. दादा हे फक्त पक्षाचे नेते नव्हते, तर ते आधारवड होते. कार्यकर्त्यांच्या, सर्वसामान्य नागरिकांच्या सुख-दुःखात धावून जाणारे, संकटात खंबीरपणे पाठीशी उभे राहणारे, चूक झाली तर कान धरून समजावणारे आणि चांगलं काम केलं तर पाठीवर कौतुकाची थाप देणारे दादा प्रत्येकाच्या आयुष्याचा भाग बनले होते. त्यांनी जपलेला माणूस हा त्यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू होता."अशी भावनिकता त्यांनी व्यक्त केली आहे.(Sunetra Pawar's Emotional Post)
"शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा तसेच स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांनी घालून दिलेल्या सुसंस्कृत, लोकाभिमुख आणि विकासाभिमुख राजकारणाच्या पायावर उभा राहिलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज आपल्या यशस्वी प्रवासाची २७ वर्षे पूर्ण करत आहे. या प्रवासात असंख्य नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जनतेने पक्षाला दिलेली साथ हीच आमची खरी ताकद राहिली आहे."असे सुनेत्रा पवार यांनी लिहिले आहे.
"आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिनी, दादांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करत, त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार करूया.शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन आणि स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पुरोगामी वाटेवर चालून अधिक सक्षम, समृद्ध आणि प्रगत महाराष्ट्र घडवण्यासाठी नव्या जोमानं काम करण्याचा संकल्प करूया."असे आवाहन सुनेत्रा पवार यांनी यावेळी केले आहे.(Sunetra Pawar's Emotional Post)