पंतप्रधान नरेंद्र मोदी - जनभावना समजून घेणारे लोकशाहीवादी नेते!

    10-Jun-2026
Total Views |
 
 Modi
 
मला हे जाणून अत्यंत आनंद होत आहे की, नरेंद्र मोदी हे आता भारताचे लोकशाही पद्धतीने निवडून आलेले आणि सलग सर्वाधिक काळ सेवा बजावणारे पंतप्रधान ठरले आहेत. हा आनंद यासाठी नाही की, मोदींनी पंडित जवाहरलाल नेहरू यांचा पंतप्रधानपदावरील कार्यकाळाचा विक्रम मागे टाकला; तर यासाठी अधिक आनंद होतो की, ही घटना भारतातील लोकशाहीच्या विजयाची भव्य गाथा सांगते. भारताने केवळ टिकून राहण्यात यश मिळवले नाही, तर तो सातत्याने प्रगती करत भरभराटीलाही पोहोचला आहे. भारत एक विलक्षण यशोगाथा आहे आणि त्या यशोगाथेत नरेंद्र मोदी यांचे योगदान अत्यंत मोठे आणि ऐतिहासिक आहे.
 
पंडित नेहरू १९५२ पर्यंत थेट जनतेतून निवडून न आलेले पंतप्रधान म्हणून पदावर राहिले. १९४७ मध्ये अत्यंत असाधारण परिस्थितीत तितयाच बुद्धिमान आणि समर्पित व्यक्तींमधून त्यांची निवड करण्यात आली. महात्मा गांधी यांनी जनतेवर मिळवलेला एकप्रकारचा नकाराधिकार आणि नैतिक पकड यामुळेच पंडित नेहरू यांना पंतप्रधानपदासाठी नामनिर्देशन मिळाले. ते १९५२ मधील पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत महात्मा गांधींचा आशीर्वाद आणि स्वातंत्र्य चळवळीचे वलय घेऊन उतरले. त्यावेळी साहजिकच काँग्रेस पक्षाची मक्तेदारी होती. काँग्रेसला कोणतीच राजकीय स्पर्धा नव्हती. त्या सार्वत्रिक निवडणुकीत जरी ५३ राजकीय पक्षांनी सहभाग घेतला होता, तरी त्यांचे अस्तित्व आणि प्रभाव नाममात्र होता. त्यानंतर जेव्हा नरेंद्र मोदी हे २०१४ मध्ये पहिल्यांदा आणि २०२४ मध्ये पुन्हा उच्चपदावर विराजमान होईपर्यंत, भारत एक खूप वेगळा देश बनला होता. आकार, विविधता, अर्थव्यवस्था आणि नागरिकांची झालेली प्रगती पाहता, भारताचे रूप पूर्णपणे पालटले होते.
 
१९५२ मध्ये पंतप्रधानपदी निवडून येणे, हे २०१४ किंवा २०२४च्या तुलनेत अधिक सोपे होते, असे म्हणण्याचा मोह नक्कीच होतो. परंतु, असे म्हणणे पूर्णतः योग्य किंवा विवेकपूर्ण ठरणार नाही. अगदी १९९६ मध्ये मी पंतप्रधान झालो, त्यावेळी राजकीय मापदंड आणि स्पर्धेत पूर्णपणे बदल झाला होता. राष्ट्र अधिक प्रश्न विचारणारे, अधिक समावेशी आणि अधिक प्रगल्भ झाले होते. नेहरू-गांधी घराण्याबाहेरील पंतप्रधानांना कोणतेही तेजस्वी वलय लाभले नव्हते. त्यांच्याकडे पुढे जाण्यासाठी आधार ठरेल असे कोणतेही विशेषाधिकार, वंशपरंपरेतून मिळालेली प्रतिष्ठा किंवा राजकीय आश्रय उपलब्ध नव्हता. नरेंद्र मोदी आणि माझ्या बाबतीत तर परिस्थिती अशी होती की, अनेक पंतप्रधानांना लाभलेली सामाजिक प्रतिष्ठा आणि सांस्कृतिक वारसा यांचाही आधार आम्हाला मिळालेला नव्हता.
 
मी अधिक काळ या पदावर टिकू शकलो नाही, माझा कार्यकाळ अवघ्या ११ महिन्यांचा होता. मात्र, मला आश्चर्य या गोष्टीचे वाटते की, नरेंद्र मोदी यांना असे कोणते दैवी वरदान लाभले आहे की, ते आजही या उच्चपदावर कोणत्याही प्रकारच्या थकव्याची चिन्हे न दिसता विराजमान आहेत. इतकेच नव्हे, तर त्यांना निवडून देणार्‍या जनतेमध्येही थकवा किंवा उत्साहात घट झालेली दिसून येत नाही. त्यांची कार्यक्षमता, ऊर्जाशक्ती आणि दीर्घकाळ पदावर टिकून राहण्याची क्षमता, ही आपण पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या बाबतीत पाहिलेल्या अनुभवापेक्षा खूपच वेगळी आहे.
 
पंडित नेहरू यांच्या काळापासून ते आतापर्यंतच्या काही मनोरंजक आकडेवारीवर नजर टाकूया. यातून मी उल्लेख केलेले परिवर्तन दिसून येते. साध्या राजकीय स्पर्धेबद्दल बोलायचे झाले, तर ज्यावेळी १९५२ मध्ये निवडणुका झाल्या, तेव्हा स्पर्धेत केवळ ५३ पक्ष होते. तर, नरेंद्र मोदी यांना २०२४ मध्ये दोन हजार, ५९३ राजकीय पक्षांविरुद्ध निवडणूक लढवावी लागली. नेहरूंच्या काळात मतदारांची संख्या १७ कोटी होती, तर २०१४ मध्ये ती ८३ कोटी होती. १९५२ मध्ये ३४ कोटी असणारी भारताची लोकसंख्या आज १४६ कोटींहून अधिक झाली आहे.
 
आणखी एका पैलूने माझे लक्ष वेधले असून, तो म्हणजे पंडित नेहरूंच्या मंत्रिमंडळात विविध समुदायांची लोकसंख्या किंवा भारतातील सांस्कृतिक आणि जातीय विविधता प्रतिबिंबित झाली नव्हती. अगदी पंडित नेहरू यांच्या तिसर्‍या आणि अंतिम कार्यकाळातदेखील मंत्रिमंडळाची रचना आश्चर्यकारकपणे विषम दिसत होती. त्यात प्रामुख्याने उच्चवर्णीय पुरुषांचाच समावेश होता. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ‘काका कालेलकर आयोगा’चा अहवाल फेटाळून लावला होता, ज्यामध्ये वंचित आणि मागासवर्गीय समाजघटकांना आरक्षणाच्या माध्यमातून संधी उपलब्ध करून देण्याची शिफारस करण्यात आली होती.
 
नरेंद्र मोदी नेतृत्व करत असलेले मंत्रिमंडळ मात्र विलक्षण वैविध्यपूर्ण आहे; येथे २७ ‘ओबीसी’, दहा ‘एससी’ आणि पाच ‘एसटी’ आहेत. महिलांचे प्रतिनिधित्वदेखील कमालीचे वाढले आहे. नरेंद्र मोदी यांनी एप्रिल २०२६ मध्ये संसदेच्या सदस्यसंख्येचा विस्तार करून महिलांना ऐतिहासिक प्रतिनिधित्व देण्याचा आणि आपले संघराज्य अधिक परिपूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रस्ताव मांडला होता. त्यांनी महिलांसाठी आरक्षणाचे विधेयक मंजूर होईल, याची आधीच खात्री करून दिली आहे. मला विश्वास आहे की, येत्या काळात ते संसदेची सदस्यसंख्या वाढविण्यासाठी आपले प्रयत्न पुन्हा नव्या जोमाने सुरू ठेवतील.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एक राष्ट्र म्हणून भारत अनेक आघाड्यांवर अधिक आत्मभान असलेला, जागरूक देश बनला आहे. पंडित नेहरू यांच्या काळापेक्षा आजची लोकशाही अधिक गजबजलेली आणि आवाज उठवणारी झाली आहे. जातीबद्दल जागरूकता, संविधानिक अधिकार, लिंगभेद जागृती, पर्यावरणीय घडामोडी इत्यादी एका नवीन उंचीवर जाऊन पोहोचल्या आहेत. पंडित नेहरू यांच्या नेतृत्वाखालील भारत बहुतांश निरक्षर होता. शिवाय, एका लोकशाही सरकारकडून जनतेच्या नेमक्या कोणत्या अपेक्षा असायला हव्यात, याविषयी नागरिकांमध्ये अज्ञान होते. ती एक पूर्णतः नवीन व्यवस्था होती. आज राष्ट्रासाठी आणि लोकशाहीच्या दृष्टीनेदेखील चांगली गोष्ट म्हणजे नागरिक अधिक सुशिक्षित आणि ज्ञानी झाले आहेत. त्यांच्या नजरेतून काहीही सुटत नाही.
 
पंडित नेहरू यांना जास्तीत जास्त अर्धा डझन वर्तमानपत्रांना तोंड द्यावे लागत असे. मात्र, समाजमाध्यम व्यासपीठांमुळे नरेंद्र मोदी यांना प्रत्येक सेकंदाला टीकेला तोंड द्यावे लागते आणि त्यावर केलेली टीका ही असत्यापित, अन्यायकारक, तसेच अत्यंत कठोर आणि वैयक्तिक असू शकते. याशिवाय, त्यांना २४ तास टीकेला सामोरे जावे लागते, ते वेगळेच. त्यांना मुख्य प्रवाहातील वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांकडून होणार्‍या अहोरात्र टीकेचा आणि कधीकधी शत्रुत्वाचाही सामना करावा लागतो. पंडित नेहरू यांच्या काळाशी तुलना केली, तर त्याकाळात ‘दूरदर्शन’वरील बातमीपत्रेच अस्तित्वात नव्हती; तिथे आता त्यांची संख्यादेखील कित्येक हजार इतकी झाली आहे.
 
पंडित नेहरू यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळापेक्षा अधिक काळ पदावर राहण्याचा टप्पा यशस्वीपणे गाठल्याबद्दल मी नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करतो. त्यांच्या नेतृत्वाखाली भारत एक चैतन्यशील लोकशाही म्हणून अढळ राहिल्याबद्दल ते अधिक कौतुकास पात्र आहेत. भारत कायम जलदगतीने प्रगती करणारी अर्थव्यवस्था राहील, यासाठी ते करत असलेले प्रयत्न, त्यांच्या कल्याणकारी योजना आणि लष्करी संघर्षाच्या काळात त्यांचे निर्णायक नेतृत्व या सर्वांकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. राष्ट्रहिताच्या बाबतीत ते कधीही तडजोड करत नाहीत.
 
नरेंद्र मोदी हे केवळ देशाचे कार्यकारी प्रमुख राहिले नाहीत, तर ते राष्ट्राचे प्रमुख मार्गदर्शकही ठरले आहेत. त्यांनी समाजातील सर्व स्तरांतील आणि सर्वप्रकारच्या लोकांशी सातत्याने, तसेच सहानुभूतीपूर्वक संवाद साधला आहे. मी कधीच त्यांचा ‘आकाशवाणी’वरील ‘मन की बात’ कार्यक्रम चुकवत नाही. मी त्यांच्या पुरस्कारांच्या यादीचे नेहमीच कौतुक करतो, ज्यामध्ये उल्लेखनीय कर्तृत्ववान व्यक्तींचा शोध घेऊन त्यांचा गौरव केला जातो. पंडित नेहरू यांच्या काळाच्या आणि त्यानंतरच्या कालखंडाच्या तुलनेत नरेंद्र मोदी यांनी अधिक व्यापक जनसंपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे. तंत्रज्ञानाचा इतका व्यापक आणि परिणामकारक उपयोग करणारे दुसरे कोणतेही पंतप्रधान दिसत नाहीत. अशाप्रकारचे कार्य निःस्वार्थ वृत्ती आणि समर्पित बांधिलकीशिवाय शक्य नाही.
 
नरेंद्र मोदी हे यशस्वी आहेत. कारण, त्यांनी कायमच आत्मचिंतनशील वृत्ती जोपासली. त्यांनी स्वतःचे सातत्याने आत्मपरीक्षण केले. त्यांचे कार्य असेच सुरू राहण्याकरिता आणि पंतप्रधानपदाचे अनेक कार्यकाळ त्यांच्या आयुष्यात येण्यासाठी त्यांना भरपूर ऊर्जा आणि उत्तम आरोग्य देण्याची प्रार्थना, मी त्या सर्वशक्तिमान ईश्वराला करतो.
 
एच. डी. देवेगौडा
(लेखक हे राज्यसभेचे सदस्य, तसेच भारताचे माजी पंतप्रधान आहेत.)