मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर मुंबईतील पाणी टँकर चालकांचा संप मागे

जिल्हाधिकाऱ्यांनीही कारवाई होणार नसल्याचे दिले आश्वासन; पाणीपुरवठा सेवा पूर्ववत

    10-Jun-2026
Total Views |
Mumbai Water Tanker Strike
 
मुंबई : (Mumbai Water Tanker Strike) मुंबई वॉटर टँकर असोसिएशनने रविवारी मध्यरात्रीपासून सुरू केलेला बेमुदत संप मंगळवारी सायंकाळी मागे घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर असोसिएशनला त्यांच्याविरोधात कोणतीही कारवाई केली जाणार नसल्याचे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर टँकर चालकांनी तात्काळ प्रभावाने सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला.
 
मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर जिल्हाधिकाऱ्यांसोबतही चर्चा करण्यात आली. यावेळी या प्रकरणात महानगरपालिकेला आवश्यक सूचना देण्यात येतील, तसेच वॉटर टँकर असोसिएशनच्या मागण्या केंद्रीय भूजल प्राधिकरणासमोर मांडल्या जातील, असे सांगण्यात आले. या आश्वासनांनंतर असोसिएशनने आपले आंदोलन मागे घेतले.
 
मुंबईत विहिरी आणि बोअरवेलमधून पाणी उपसा करण्यासाठी केंद्रीय भूजल प्राधिकरणाचे ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या विहीर मालक, बोअरवेल चालक आणि पाणी टँकर मालकांना प्रशासनाकडून नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. यामुळे नाराज झालेल्या टँकर चालकांनी यापूर्वी तहसीलदारांसोबत बैठक घेतली होती. मात्र, त्यातून कोणताही तोडगा न निघाल्याने त्यांनी ८ जूनपासून संप पुकारला होता.
 
 
मुंबईत आधीच १० टक्के पाणी कपात लागू आहे. अशा परिस्थितीत पाणी टँकरांच्या संपाचा परिणाम गृहनिर्माण संस्था, हॉटेल्स, महानगरपालिका तसेच इतर शासकीय प्रकल्पांवर झाला. खासगी बांधकाम प्रकल्पांनाही पाणीपुरवठ्यात अडचणींचा सामना करावा लागला आणि अनेक ठिकाणी वाढीव दराने पाणी खरेदी करावे लागले.
 
संपामुळे वाढत्या अडचणी लक्षात घेता सरकार आणि प्रशासनावर तोडगा काढण्याचा दबाव वाढत होता. मंगळवारी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत असोसिएशनच्या प्रतिनिधींना नोटिसांबाबत कोणतीही दंडात्मक कारवाई केली जाणार नसल्याचे आश्वासन देण्यात आले. तसेच त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक विचार केला जाईल, असेही सांगण्यात आले.
 
मुंबई वॉटर टँकर असोसिएशनचे सचिव अमोल मांढरे यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक सकारात्मक झाली असून त्यांच्या आश्वासनानंतर तात्काळ सेवा पूर्ववत करण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हा प्रशासन त्यांच्या मागण्या संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवेल आणि लवकरच यावर तोडगा निघेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
 
संप मागे घेतल्यामुळे मुंबईतील हजारो गृहनिर्माण संस्था, हॉटेल्स, बांधकाम प्रकल्प आणि इतर संस्थांना मोठा दिलासा मिळाला असून शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था पुन्हा सुरळीत होऊ लागली आहे. (Mumbai Water Tanker Strike)