मुंबई मेट्रोची पावसाळ्यासाठी एआय-सक्षम सज्जता

Total Views |
Mumbai Metro
 
मुंबई : (Mumbai Metro) पावसाळ्यातही प्रवाशांना सुरक्षित, विश्वासार्ह आणि अखंडित सेवा देण्यासाठी एमएमआरडीएने महा मुंबई मेट्रोच्या मार्गिका २अ, २ब, ७ आणि ९ वर अत्याधुनिक तंत्रज्ञानाधारित सज्जता आराखडा कार्यान्वित केला आहे. यंदा मार्गिका २ब आणि ९ चा पहिलाच पावसाळा असल्याने विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
 
मेट्रोच्या ३९ स्थानकांवर एकूण २,४९६ सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत असून स्थानके, प्लॅटफॉर्म आणि ऑपरेशनल क्षेत्रांवर २४ तास देखरेख ठेवली जाणार आहे. पाणी साचण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी ३० आपत्कालीन पंप तैनात करण्यात आले असून नाले व जलनिस्सारण व्यवस्था स्वच्छ करण्यात आली आहे.
 
मेट्रो नेटवर्कवरील १,०७० इन्सुलेटर तसेच २५ केव्ही केबल्स, पँटोग्राफ, ट्रान्सफॉर्मर्स आणि इतर विद्युत उपकरणांची तपासणी व देखभाल पूर्ण करण्यात आली आहे. १४ महत्त्वाच्या स्थानकांवर वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी अॅनिमोमीटर यंत्रणा बसविण्यात आली आहे.
 
अनपेक्षित परिस्थितीसाठी तीन राखीव मेट्रो मुख्य मार्गिकांवर आणि दोन डेपोमध्ये सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. प्रवाशांना सेवा अद्यतने देण्यासाठी डिजिटल डिस्प्ले, घोषणा प्रणाली आणि मोबाइल अॅप्सचा वापर केला जाणार आहे. दि. २५ मे ते दि. १५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत २४x७ आपत्ती नियंत्रण कक्ष कार्यरत राहणार असून महानगरपालिका, पोलीस आणि इतर यंत्रणांशी समन्वय साधला जाणार आहे.
 
पावसाळी तयारीसोबतच एमएमआरडीएने एआय-सक्षम ऑटोमेटेड पॅन्टोग्राफ कंडिशन मॉनिटरिंग सिस्टम कार्यान्वित केली आहे. या प्रणालीमुळे धावत्या मेट्रो गाड्यांमधील तांत्रिक बिघाड काही सेकंदांत ओळखता येणार असून सुरक्षा आणि सेवा विश्वासार्हता वाढणार आहे. तसेच एआय-आधारित व्हिडिओ अॅनालिटिक्सद्वारे संशयास्पद हालचाली, बेवारस सामान आणि सुरक्षेशी संबंधित बाबींवर लक्ष ठेवले जाणार आहे.
 
“महा मुंबई मेट्रोसाठी (Mumbai Metro) एमएमआरडीएची पावसाळी रणनीती तीन स्पष्ट उद्दिष्टांवर आधारित आहे. यामध्ये प्रवासी सुरक्षा, सेवा सातत्य आणि जलद प्रतिसाद यांचा समावेश आहे. यंदाच्या वर्षीही तयारी पूर्ण झाली आहे. कारण मेट्रो मार्गिका २ब आणि ९ पहिल्यांदाच पावसाळ्याला सामोऱ्या जात आहेत. तंत्रज्ञान, डेटा अॅनालिटिक्स आणि प्रत्यक्ष अभियांत्रिकी उपाययोजनांच्या एकत्रित वापरामुळे संभाव्य धोके लवकर ओळखणे, जलद प्रतिसाद देणे आणि सेवा व्यत्यय कमी करणे शक्य होते.”
 
- डॉ. संजय मुखर्जी, महानगर आयुक्त, एमएमआरडीए
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.