मुंबई : (Maharashtra Farmer Loan) राज्यातील २०१७ मधील छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना आणि २०१९ मधील महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेमध्ये पात्र असूनही विविध कारणांमुळे लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मंगळवारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
२०१७ च्या कर्जमाफी योजनेत पात्र असलेले परंतू, लाभ न मिळालेले शेतकरी कर्जमाफीच्या प्रतिक्षेत असताना २०१९ ला महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना जाहीर करण्यात आली. त्यामुळे २०१७ च्या योजनेत पात्र असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. याशिवाय २०१९ च्या कर्जमाफी योजनेतही अनेक शेतकरी पात्र ठरले असतानाही विविध तांत्रिक अडचणींमुळे त्यांना लाभ मिळू शकला नाही.
दरम्यान, या पात्र शेतकऱ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आली. लवकरच यासंदर्भात अहवाल मागून वंचित राहिलेल्या ५ लाख ९० हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर सुमारे १४ हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे.(Maharashtra Farmer Loan)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....