मुंबई (Latur Farmer Bull Compensation) : वीज पडून बैल दगावल्याने लातूर जिल्ह्यातील भूमिहीन शेतकरी काशिनाथ गायकवाड यांच्या पत्नीला जोखडाला जुंपण्याची वेळ आली होती. या व्यथेची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने या शेतकरी कुटुंबाला बैल आणि दगावलेल्या बैलाच्या नुकसान भरपाईची रक्कम देण्याचे निर्देश दिले असून यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील बोंबळी खुर्दचे काशिनाथ गायकवाड भूमिहीन शेतकरी आहेत. त्यांच्याकडे असलेल्या बैलजोडीच्या मदतीने काशिनाथ गायकवाड आणि त्यांच्या पत्नी हौसाबाई परिसरातील शेतकऱ्यांची जमीन कसतात. मशागतीची, नांगरणी ते पेरणी, वखरणी अशी मिळेल ती कामे करतात. यावरच त्यांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. यातच त्यांच्याकडील एका बैलाचा शुक्रवार, ५ जून रोजी वादळी पावसात वीज पडून मृत्यू झाला. त्यामुळे मिळालेली कामे पूर्ण करण्यासाठी गायकवाड यांना पत्नी हौसाबाई यांना जुंपावे लागले. या प्रकरणाचा एक व्हिडीओही व्हायरल झाला.Latur Farmer Bull Compensation)
लातूरच्या देवणीतील हृदयद्रावक वास्तव! वीज कोसळून शेतकरी काशिनाथ गायकवाड यांचा बैल मृत्युमुखी. शेतकऱ्यासाठी बैल हा फक्त जनावर नसतो, तो त्याचा कुटुंबीय आणि उपजीविकेचा आधार असतो.
— Maharashtra Bandhu News (@BandhuNews_in) June 9, 2026
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत हे वृत्त पोहोचताच त्यांनी मुख्यमंत्री सचिवालयाला तातडीने कार्यवाहीचे निर्देश दिले. त्यानुसार प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी यांच्या संपर्कात राहून लातूरचे जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी महसूलसह, सर्व यंत्रणांना गायकवाड यांना तत्काळ मदत करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार तहसिल कार्यालयासह, पशूसंवर्धन, कृषी सर्व यंत्रणा गायकवाड यांच्यापर्यंत पोहचल्या. पशूसंवर्धन विभागाने प्रयत्नपूर्वक एक बैल उपलब्ध करून घेतला आणि तो जिल्हाधिकारी डॉ. बास्टेवाड, तहसिलदार सोमनाथ वाडकर यांच्यासह पशूसंवर्धन विभागाचे अधिकारी आदींच्या उपस्थितीत थेट गायकवाड कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात आला.Latur Farmer Bull Compensation)
शेतकरी कुटुंबाकडून समाधान व्यक्त
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने बैल मिळवून दिल्याने गायकवाड यांच्या पत्नी हौसाबाई आणि मुलगा पुंडलिक यांनी समाधान व्यक्त केले. त्यांनी मुख्यमंत्र्यांसह, जिल्हा प्रशासनाचेही आभार मानले. हौसाबाई म्हणाल्या की, "आमच्या एका बैलाचा वीज पडून मृत्यू झाल्याने दुर्दैवाने आमच्यावर अशी वेळ आली. पण आमच्या अडचणीची दखल घेऊन, लगेचच मदत मिळाल्याने बरे वाटले. आता पुढे येणाऱ्या खरीप हंगामासाठी मिळालेली कामे पूर्ण करण्याची चिंता दूर झाली. बैल पण चांगला मिळाला आहे. आता त्याची पण चागंली काळजी घेऊ आणि मिळालेली कामे देखील चांगली होतील असे बघू."Latur Farmer Bull Compensation)
नुकसानभरपाईसाठी अर्थसाहाय्य मंजूर
नैसर्गिक आपत्तीमध्ये जनावरांचा मृत्यू झाल्यास राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून तातडीने अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले जाते. त्यानुसार, गायकवाड यांच्या दगावलेल्या बैलाचा तातडीने पंचनामा आणि शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण करून नियमानूसार आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात आले आहे. ही रक्कम गायकवाड यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येत आहे.Latur Farmer Bull Compensation)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....