संघकार्याची बीजे देशाच्या कानाकोपऱ्यात रोवण्यासाठी प्रतिकूल परिस्थितीत, अपरिचित प्रदेशात आणि अनेक अडचणींना सामोरे जात ज्यांनी निःस्वार्थ भावनेने कार्य केले, अशा पहिल्या पिढीतील प्रचारकांमध्ये कै. कृष्णराव हरिहर उपाख्य अण्णाजी देशपांडे यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. बिहारसारख्या दूरच्या प्रांतात संघकार्याची पायाभरणी करण्यापासून ते नागपूरमध्ये संघ, जनसंघ, विश्व हिंदू परिषद आणि शैक्षणिक क्षेत्रातील विविध उपक्रमांना दिशा देण्यापर्यंत त्यांचे संपूर्ण जीवन राष्ट्रकार्याला समर्पित राहिले. अशा या संघसमर्पित कर्मयोग्याच्या जीवनप्रवासाचा हा स्मृतिगंधी आलेख.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना विजया दशमी १९२५ रोजी झाल्यानंतर दोन तीन वर्षातच संघाचे काम नागपूर परिसरात व वऱ्हाड मध्ये सुरू झाले होते. गुरूपूजन उत्सव आणि संघ शिबिरांना सुरुवात होऊन कार्य विस्ताराच्या दृष्टीने हालचाली सुरु झाल्या होत्या. संघ संस्थापक डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार यांनी महाराष्ट्रात आणि परप्रांतात संघ कामाची पेरणी करण्याची योजना आखली होती. त्यामुळे १९३९- १९४० चे वर्ष संघ कार्याच्या विस्तारासाठी महत्वाचे मानले जात कारण याच काळात नागपूरातील तरुण स्वयंसेवक शिक्षण पूर्ण करून किंवा शिक्षणासाठी देशाच्या विविध भागांत गेले आणि तेथे त्यांनी संघाचे काम उभे केले होते. संघ कामाच्या विस्तारासाठी जे स्वयंसेवक परप्रांतामध्ये गेले होते, त्यामध्ये कृष्णराव हरीहर देशपांडे यांच्या नावाचा उल्लेख संघाच्या इतिहासामध्ये आवर्जून उल्लेख होतो.
संघाच्या प्रथम फळीतील प्रचारकांपैकी एक असलेले कृष्णराव संघ कार्याच्या विस्तारासाठी बिहार मध्ये गेले होते. भाषेचे ज्ञान नाही, ओळख नाही, दळणवळणाची अपुरी साधने, आर्थिक अडचणी व निवासाची व्यवस्था ईत्यादी समस्यावर मात करून त्यांनी संघाचं काम तेथे सुरू केले होते. आज देशात संघ कार्याचा प्रचंड विस्तार झाला असून त्या विस्तारा मागे पहिल्या फळीतील प्रचारकांचे कठोर परिश्रम महत्वाचे आहेत. असंख्य संघ साधकांच्या तपश्चर्येचे आणि साधनेचे फलित म्हणजे संघ शताब्दी आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.
संघ समर्पित कृष्णराव हरिहर उपाख्य अण्णाजी देशपांडे यांचा जन्म नागपूर शहरात ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी दि. ११ जून १९१९ झाला होता. त्यांचे प्राथमिक शिक्षण महाल मधील फाटे शाळेत झाले. महाल मधून देशपांडे परिवार धरमपेठ भागात राहायला गेला. त्यावेळी धरमपेठ संघ विचाराच्या चळवळीचे केंद्र होते. हरिहर देशपांडे सुद्धा संघ विचाराचे पाईक असल्याने घरी संघ विचारी कार्यकर्त्यांचे सतत येणे जाणे होते. त्यामुळे न काळात संघ संस्कार अण्णाजींच्या मनावर होत गेले आणि वर्ष १९३० साली अण्णाजी देशपांडे यांचा संघ कार्यासोबत प्रत्यक्ष संपर्क आला आणि ते १९३९ मध्ये बिहार मध्ये संघाचे प्रचारक म्हणून गेले होते. प्रचारक जीवन जगत असतांना त्यांनी पाटणा विद्यापीठा मधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणं सुध्दा पूर्ण केले होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामाची देशातील वेगवेगळ्या प्रांतात पेरणी व्हावी, संघ कार्य अन्य प्रांतात रुजावे म्हणून नागपुर मधुन देशाच्या विविध भागात प्रचारक पाठविण्याची रचना तत्कालीन संघ अधिकाऱ्यांनी केली होती. वर्ष १९३९ साली संघ संस्थापक डॉ. हेडगेवार धरमपेठेतील देशपांडे वाड्यात आले आणि हरीहर देशपांडे यांच्या सोबत गप्पागोष्टी करतांना अण्णाला बिहारमध्ये शिक्षणासाठी पाठवा, शिक्षणाबरोबर संघ काम सुद्धा करेल, असे सुचविले. डॉ. हेडगेवार यांच्या सूचनेनुसार अण्णाजी १९३९ साली बिहार मध्ये प्रचारक म्हणून गेले. भागलपूर हे त्याचे कार्यक्षेत्र होते. त्यांनी संघ कार्य उभे करीत असताना बी.एससी पदवीचे व एम.एससी शिक्षण पूर्ण केले. भागलपूर क्षेत्रात संघ काम उभे करून ते पाच वर्षांनी १९४४ साली नागपूर मध्ये परतले.
नागपूर कृषी महाविद्यालयात नौकरी सुरू केली. दि. १० मार्च १९४५ रोजी त्यांचा विवाह अमरावती येथील विमल बाळकृष्ण पिंपरीकर यांच्या सोबत झाला. घरात आनंदी आनंद असताना गांधी हत्या सत्याग्रहामध्ये सहभाग व कारावासा मुळे नौकरीला मुकावे लागले होते. गांधी हत्या आरोपामध्ये संघ बंदी सत्याग्रहात सहभाग घेतांना त्यांनी कौटुंबिक जबाबदाऱ्या व परिवार हितापेक्षा संघ विचाराला महत्व दिले होते. ही उल्लेखनीय बाब होती. पुढे त्यांनी खासगी व्यवसाय आणि पुढील शिक्षण सुरू ठेवल होते. एम.एड, एल.एल.बी, पी.एच.डी शिक्षण पूर्ण करून पुन्हा वर्ष १९५२ साली नागपूरच्या बी.एड कॉलेजमध्ये नोकरी सुरू केली. शिक्षण शास्त्राचे विभाग प्रमुख सुद्धा होते. विदर्भातील पहिली शिक्षण क्षेत्रातील शिक्षण शास्त्राची आचार्य पदवी त्यांनी मिळवली होती.
नोकरी करीत असताना त्यांनी संघ कार्याकडे कधीच दुर्लक्ष केले नाही. धरमपेठ शाखेचे कार्यवाह व भाग कार्यवाह दायित्वाचे निर्वाहन सुद्धा केले होते. त्यांच्या धरमपेठ भागाच्या कार्यक्षेत्रामधून त्या काळात संघ कामाच्या विस्तारासाठी प्रचारक निघाले होते. त्यांचे चिरंजीव सुनीलजी देशपांडे सुद्धा १९८२ साली धरमपेठ भागातून प्रचारक निघाले. वर्तमानमध्ये सुनीलजी संघाचे अखिल भारतीय सह संपर्क दायित्वाचे निर्वाहन करत आहेत.
अण्णाजी देशपांडे बिहार मधील प्रचारकी जीवन व्यतीत करून १९४४ मध्ये नागपुरात परत आले. कठिण काळात बिहार सारख्या प्रदेशात संघ काम त्यांनी उभे केले होते. सामाजिक समरसता आणि निःस्वार्थ समाजसेवा रक्ता मध्ये असल्याने तथा सर्व समाज आपला आहे, या उदात्त विचारामुळे वर्ष १९६० च्या काळात धरमपेठ मधील देशपांडे निवास स्थान संघ विचाराचे केंद्र झाले होते. पण पुढे देशपांडे परिवार धरमपेठ येथून गांधीनगर २६१ येथे स्थलांतरीत झाला होता. अल्पकाळातच धरमपेठ प्रमाणे गांधीनगर मधील देशपांडे निवास स्थान सुद्धा स्वयंसेवकासाठी आधाराचे केंद्र झाले होते. संघ अधिकाऱ्यांचा नेहमी तेथे राबता असायचा. देशांत भारतीय जनसंघाची स्थापना झाल्याने. देशपांडे निवासस्थान म्हणजे संघ, जनसंघ आणि विश्व हिंदू परिषदचे कार्यालय म्हणून केंद्र सुध्दा ठरले होते. विमलताई यांनी जनसंघाच्या महिला आघाडी मध्ये व अण्णाजी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद व धरमपेठ शिक्षण संस्थेच्या कामात स्वतःला झोकून दिले होते.
वर्ष १९६२ आणि १९६७ लोकसभा निवडणुकीत देशपांडे निवासस्थान एका प्रकारे जनसंघाचे कार्यालयच ठरले होते. तसेच अण्णाजी देशपांडे यांच गांधीनगरमधील २६१ निवासस्थान स्वयंसेवक तथा कार्यकर्त्यासाठी आधाराचे केंद्र होते त्याचप्रमाणे त्यांच्या निवास स्थानातील दूरध्वनी क्र.२४७७९ सुद्धा गांधीनगर परिसरातील सर्वांना आपल्या हक्काचा फोन वाटत असे. त्या काळात फोनची संख्या अत्यंत कमी होती; नंतरच्या काळात वाढली. पण आण्णाजी देशपांडे यांच्या फोनवर आलेला निरोप किंवा सूचना बरोबर पोहचत असे. नागपूरच्या जुन्या काळातील कार्यकर्त्यांमध्ये गोष्टीचा फड रंगला की अण्णाजी देशपांडे यांच्या आठवणी तथा निवासस्थान २६१ व दूरध्वनी क्र.२४७७९ आवर्जून उलेख होत असतो.
धरमपेठ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, विश्व हिंदू परिषदचे विदर्भ प्रांत सचिव तथा अनेक विचार परिवारातील संस्थांचे मार्गदर्शक असलेल्या संघ समर्पित अण्णाजी देशपांडे यांनी कृतार्थ जीवन जगत आपला देह चंदना प्रमाणे झिजवून दि. २३ सप्टेंबर २००९ रोजी भारत मातेच्या चरणी अर्पण केला आहे. त्यांनी संघ कार्याची जवळपास ७५ वर्ष खडतर तपश्चर्या केली होती. त्यांच्या साधनेच्या कठीण काळात त्यांना पत्नी विमलताई यांची भक्कम साथ होती. तसेच त्यांना संघ संस्थापक डॉ. हेडगेवार, पू. श्रीगुरुजी, बाळासाहेब देवरस, सुदर्शनजी आणि डॉ. मोहनजी भागवत यांचा सहवास लाभला आहे. भाऊराव देवरस यांच्यापासून शेषाद्रीजी यांच्या सारख्या ज्येष्ठ प्रचारकांचा सुद्धा सहवास लाभला आहे. तत्कालीन काळात उच्च शिक्षित असलेले आण्णाजी देशपांडे सामान्य विद्यार्थ्यांसाठी आणि माणसासाठी चालते बोलते विद्यापीठ होते तर संघ कार्यकर्त्या साठी आधारवढ होते. त्यांच्या व्यवहारीक जीवनात कथनी आणि करणी मध्ये कधीच फरक आला नाही. त्यांचे कार्य सदैव स्मरणात राहील.