हिंदू’ लिहिलंच पाहिजे

वीरशैव-लिंगायत समाजाचे भवितव्य हिंदू समाजाच्या ऐक्यातच सुरक्षित : पू. श्री काडसिद्धेश्वर स्वामी महाराज

    10-Jun-2026   
Total Views |


 Hindu Identity Census Awareness
 
कोल्हापूर येथील श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान, कणेरी मठाचे पीठाधीश्वर पूज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामी महाराज यांनी अध्यात्माबरोबरच शिक्षण, आरोग्य, सेंद्रिय शेती, ग्रामविकास आणि समाजप्रबोधनाच्या माध्यमातून एक व्यापक कार्य उभे केले आहे. संत बसवेश्वरांचे विचार, हिंदू वीरशैव-लिंगायत समाजाची दिशा, आगामी जनगणना, सामाजिक ओळख, आरक्षण, युवकांची भूमिका आणि समाजासमोर उभ्या असलेल्या वैचारिक आव्हानांवर त्यांनी अनेकदा स्पष्ट आणि परखड भूमिका मांडली आहे. दै. ‘मुंबई तरूण भारत’शी साधलेल्या या विशेष संवादात त्यांनी कणेरी मठाची परंपरा, बसवेश्वरांचे तत्त्वज्ञान, हिंदू समाजाचे ऐक्य आणि समाजातील संभ्रम निर्माण करणार्‍या प्रवृत्तींबाबत सविस्तर भाष्य केले.

कणेरी मठाची परंपरा अनेक शतकांची आहे. आजच्या काळात या परंपरेचे समाजासाठी नेमके महत्त्व काय आहे?
 
कणेरी मठाचा इतिहास पाचव्या-सहाव्या शतकापासूनचा आहे. आजपर्यंत ४८ मठाधिपती होऊन गेले आणि सध्या मी ४९वा मठाधिपती म्हणून कार्य करीत आहे. पूर्वी मठात लोक येत असत आणि धार्मिक कार्यांबरोबर अनेक उपक्रम चालत असत. पण आज केवळ लोकांनी मठात यावे, एवढ्यावर भागत नाही. मठानेही लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे.
 
आज आमच्याकडे सेंद्रिय शेतीचे मोठे क्षेत्र आहे. हजारो देशी गायी आहेत. कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जाते. अन्नछत्राच्या माध्यमातून दररोज हजारो लोकांना अन्नदान केले जाते. आधुनिक सुविधांनी सुसज्ज रुग्णालये आहेत. गुरुकुल आहे. विविध राज्यांतील आर्थिकदृष्ट्या मागास मुलांना शिक्षण देणारे प्रकल्प आहेत. जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र शिक्षक देणारा ‘विद्याचेतना’ उपक्रम आहे.
 
आम्ही असा विचार करतो की, सामान्य माणूस कष्टाची कमाई करून धर्मसंस्थांसाठी योगदान देतो, तर त्या धर्मसंस्थांनी समाजासाठी काय करायचे, याचा विचार झाला पाहिजे. म्हणून त्यांच्या आरोग्याची, शिक्षणाची, शेतीची आणि रोजगाराची चिंता करणे, हेही धर्मकार्यच आहे. आमची प्रवचने आणि कीर्तने हा सिद्धांताचा भाग आहे, तर समाजासाठी केलेले कार्य हा त्याचा व्यवहारातील भाग आहे.
 
आपण मठाला केवळ धार्मिक केंद्र न ठेवता ग्रामविकास, शिक्षण, शेती आणि समाजसेवेचे केंद्र बनविण्यामगची प्रेरणा काय होती?
 
मी स्वतः ग्रामीण भागातून आणि शेतकरी कुटुंबातून आलो आहे. त्यामुळे गावाची परिस्थिती, शेतकर्‍यांचे प्रश्न आणि सामान्य माणसाच्या अडचणी जवळून पाहिल्या आहेत. त्याचबरोबर अनेक प्राचीन मठांची स्थितीही पाहिली. हळूहळू मठांमध्ये येणार्‍या लोकांची संख्या कमी होत चालली होती.
 
मग आम्हाला आत्मपरीक्षण करावे लागले. लोकांच्या गरजा काय आहेत, समाजाला काय अपेक्षित आहे आणि धर्मसंस्थांनी त्या गरजांना कशा प्रकारे प्रतिसाद दिला पाहिजे, याचा विचार करावा लागला. जर धर्मसंस्था काळानुरूप बदलल्या नाहीत, तर त्या प्रवाहाबाहेर फेकल्या जातील.
 
धर्म टिकला पाहिजे, साधना टिकली पाहिजे, पण त्याबरोबरच लोकांसाठी आणखी काय करता येईल, याचाही विचार झाला पाहिजे. केवळ सिद्धांत सांगून भागत नाही. लोकांना एकत्र आणणे, त्यांच्या धार्मिक भावना वृद्धिंगत करणे आणि समाजाशी सुसंगत राहणे आवश्यक आहे. म्हणूनच, शिक्षण, आरोग्य, शेती आणि ग्रामविकास या क्षेत्रांत मठाने उतरले पाहिजे, असे आम्हाला वाटले.
 
आद्य समाजसुधारक जगद्गुरू संत बसवेश्वरांचे विचार आजही तितकेच समर्पक वाटतात. आजच्या समाजासाठी त्यांच्या कोणत्या विचारांची सर्वाधिक गरज आहे?
 
१२व्या शतकात बसवेश्वरांनी जी सामाजिक समतेची क्रांती घडवून आणली, ती अभूतपूर्व होती. त्यांनी स्त्रियांना मुख्य प्रवाहात आणले, वंचितांना प्रतिष्ठा दिली, श्रमाला महत्त्व दिले आणि समाजातील अनिष्ट प्रथांविरोधात आवाज उठविला.
 
परंतु आज काही मंडळी बसवेश्वरांना स्वतंत्र धर्मसंस्थापक म्हणून मांडण्याचा प्रयत्न करतात. मी त्यांना स्पष्ट सांगतो की, बसवेश्वरांच्या संपूर्ण वचनसाहित्यात त्यांनी स्वतःला स्वतंत्र धर्मसंस्थापक म्हटल्याचा एकही उल्लेख नाही. उलट त्यांनी समाजातील विकृती दूर करून धर्म अधिक शुद्ध, अधिक सुंदर आणि अधिक समाजाभिमुख करण्याचे कार्य केले.
 
जशी अंगावरील कपड्यांवर धूळ बसते आणि ती झटकावी लागते, तसेच धर्मामध्येही काही अनिष्ट प्रथा शिरतात. त्या दूर करून समाजाला योग्य दिशा देणे हे धर्माचार्यांचे काम असते. बसवेश्वरांनी हेच काम केले. म्हणून मी नेहमी सांगतो की, १२व्या शतकात हिंदू धर्माच्या शुद्धीकरणामध्ये बसवेश्वरांचे योगदान अत्यंत मोठे आहे. त्यांनी दया ही धर्माची मूळ असल्याचे सांगितले. दया, समता, श्रम आणि समाजहित यांवर त्यांनी उभे केलेले तत्त्वज्ञान आजही तितकेच महत्त्वाचे आहे.
 
‘कायक’ आणि ‘दासोह’ या संकल्पना आजच्या युवकांनी आपल्या जीवनात कशा उतरवल्या पाहिजेत?
 
बसवेश्वरांनी सांगितलेले ‘कायक’ म्हणजे सत्यशुद्ध भावनेने केलेले कर्म. राजा असो वा सामान्य माणूस, प्रत्येकाने स्वतःच्या कष्टावर जगले पाहिजे. हे त्यांचे स्पष्ट तत्त्व होते. ‘कायक’ म्हणजे केवळ बोलणे किंवा प्रवचन करणे नाही. आपल्या प्रामाणिक व्यवसायातून जीवन जगणे, हे त्याचे स्वरूप आहे.
 
‘दासोह’ म्हणजे आपण जे कमावतो, त्यातील काही भाग गरजूंसाठी खर्च करणे. समाजातील दुर्बल घटकांना हात देणे. पण केवळ तोंडी ‘दासोह’ सांगून चालत नाही. तो आचरणातून दिसला पाहिजे. बसवेश्वरांनी असंग्रहाची शिकवण दिली. मात्र प्रत्येक काळाची परिस्थिती वेगळी असते. १२व्या शतकातील प्रत्येक गोष्ट आज जसाच्या तशी लागू होईल, असे नाही. काळ, परिस्थिती आणि जबाबदार्‍या लक्षात घेऊन व्यवहार करावा लागतो. त्यामुळे तत्त्वांचा गाभा जपत वर्तमानाची गरज ओळखणे आवश्यक आहे.

स्वतंत्र लिंगायत धर्माचा आग्रह धरत विविध भूमिका मांडल्या जातात. या विषयाकडे आपण कसे पाहता?
 
बसवेश्वरांना स्वतंत्र धर्मसंस्थापक म्हणून मांडण्याचा प्रयत्न करणार्‍यांनी प्रथम त्यांचे साहित्य अभ्यासावे. बसवेश्वरांनी त्यांच्या वचनांमध्ये कुठेही ‘मी स्वतंत्र धर्म स्थापन करीत आहे,’ असे म्हटलेले नाही. कोणी असे दाखवून दिले, तर मीही त्यांच्याबरोबर उभा राहीन, असे मी आव्हानपूर्वक सांगतो.
 
बसवेश्वर हे दार्शनिक होते. त्यांनी समाजातील वंचित, उपेक्षित, महिलांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले. धर्माच्या नावाखाली आलेल्या विकृती दूर करण्याचे काम केले. म्हणून मी म्हणतो की, १२व्या शतकात हिंदू धर्माच्या शुद्धीकरणात त्यांचे योगदान अत्यंत मोठे आहे. काही लोक चार वचने वेगळी काढून वेगळा अर्थ सांगतात. पण बसवेश्वरांच्या वचनांमध्ये वेद, उपनिषदे, आगम आणि पुराणांचे अनेक संदर्भ आहेत. ‘ॐ नमः शिवाय’ हा मंत्र यजुर्वेदातून आलेला आहे. बसवेश्वरांनी पुनर्जन्म मानला, पापापासून दूर राहण्याचा संदेश दिला, गोसंवर्धनाचा गौरव केला आणि कर्मसिद्धांत मांडला. मग हे सर्व हिंदू धर्माच्या मूलभूत संकल्पनांशी जोडलेले नाहीत का?
 
७७० संतांच्या वचनसाहित्याला ‘धर्मग्रंथ’ म्हणायचे आणि एकाचवेळी बसवेश्वरांना एकमेव धर्मसंस्थापक म्हणायचे, यातच मोठा विरोधाभास आहे. त्यामुळे लोकांनी अशा प्रचाराला बळी पडू नये. आपल्या वाडवडिलांनी जशी ओळख जपली, तीच पुढे नेली पाहिजे. आज काही लोक देवदेवतांची निंदा करतात, हिंदू समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करतात आणि बसवेश्वरांच्या नावाचा वापर करून कट्टरता निर्माण करतात. मी अशा प्रवृत्तींना ‘तालिबानी’ असे संबोधतो. कारण बसवेश्वरांचे तत्त्वज्ञान हे समन्वयाचे आहे, संघर्षाचे नाही.
 
समाजाने अशा लोकांपासून सावध राहिले पाहिजे. कारण ही मंडळी समाजाला भ्रमित करण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्या वडिलोपार्जित परंपरा, कुलदैवत, ग्रामदैवत, यात्रोत्सव आणि हिंदू संस्कृतीचा अवमान करून समाजाचे काहीही भले होणार नाही.
 
आगामी जनगणना देशाच्या भावी धोरणांच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जाते. या प्रक्रियेकडे वीरशैव-लिंगायत समाजाने कोणत्या दृष्टीने पाहावे? तसेच धर्माच्या रकान्यात ‘हिंदू’ आणि जातीच्या रकान्यात संबंधित ज्ञाती अथवा पोटजातीची नोंद करण्याबाबत सुरू असलेल्या जनजागृतीचे महत्त्व आपण कसे स्पष्ट कराल?
 
जनगणना हा केवळ आकड्यांचा विषय नाही. देशातील विविध समाजघटकांची लोकसंख्या, त्यांची सामाजिक स्थिती, शैक्षणिक प्रगती, शासनाच्या योजना आणि भविष्यातील धोरणे या सर्वांशी जनगणनेचा थेट संबंध असतो. त्यामुळे समाजाने या प्रक्रियेकडे अत्यंत सजगतेने पाहिले पाहिजे.
 
मी नेहमी एकच सांगतो की, आपल्या वाडवडिलांनी ज्या पद्धतीने नोंदी केल्या, त्याच परंपरेचा आदर केला पाहिजे. धर्माच्या रकान्यात ‘हिंदू’ ही नोंद आणि जातीच्या रकान्यात संबंधित ज्ञाती किंवा पोटजातीची अचूक नोंद करणे आवश्यक आहे. कारण संविधानाने आणि विद्यमान व्यवस्थेने अनेक सवलती, आरक्षणे आणि सामाजिक लाभ हे विशिष्ट सामाजिक वर्गांच्या आधारे दिले आहेत. त्यामुळे चुकीची माहिती किंवा संभ्रम निर्माण करणारे प्रयोग समाजाच्या हिताचे ठरणार नाहीत.
 
आज काही लोक वेगवेगळ्या प्रकारे मते मांडतात. मात्र समाजाने भावनिक घोषणांपेक्षा दीर्घकालीन परिणामांचा विचार केला पाहिजे. एकदा चुकीची नोंद झाली, तर त्याचे परिणाम अनेक पिढ्यांवर होऊ शकतात. त्यामुळे समाजबांधवांनी विचारपूर्वक निर्णय घ्यावा आणि आपल्या ऐतिहासिक, सामाजिक आणि सांस्कृतिक सातत्याचा विचार करून नोंदी कराव्यात.
 
माझी सर्व वीरशैव-लिंगायत बांधवांना विनंती आहे की, समाजात संभ्रम निर्माण करणार्‍या प्रचारापेक्षा वस्तुस्थिती आणि परंपरेवर विश्वास ठेवावा. कारण समाजाचे भवितव्य हे भावनिक घोषणांवर नव्हे, तर योग्य आणि शाश्वत निर्णयांवर अवलंबून असते.
 
अल्पसंख्याक दर्जा, सामाजिक ओळख, शिक्षण आणि आरक्षण यांसारख्या विषयांवर समाजात विविध मतप्रवाह दिसतात. अशा संवेदनशील विषयांकडे समाजाने कोणत्या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे?
 
हे विषय अत्यंत संवेदनशील आहेत. त्यामुळे त्याकडे संयमाने आणि व्यापक हिताच्या दृष्टीने पाहण्याची गरज आहे. समाजातील ज्या घटकांना शैक्षणिक, आर्थिक किंवा सामाजिकदृष्ट्या अधिक मदतीची गरज आहे, त्यांच्यापर्यंत सुविधा पोहोचल्या पाहिजेत, याबाबत कोणाचेही दुमत असू शकत नाही.
 
परंतु, एखादी समस्या सोडवण्यासाठी संपूर्ण समाजामध्ये फूट पडेल, अशी भूमिका घेणे योग्य ठरणार नाही. मी नेहमी एक उदाहरण देतो की, घरामध्ये एखादा साप शिरला, म्हणून संपूर्ण घर पेटवून देत नाहीत. त्याऐवजी योग्य मार्गाने त्या समस्येवर उपाय शोधला जातो. त्याचप्रमाणे ज्या घटकांना सुविधा मिळालेल्या नाहीत, त्यांच्यापर्यंत त्या पोहोचवण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत; पण त्यासाठी समाजाची एकता आणि परंपरा धोक्यात येता कामा नये.
 
समाजातील सर्व घटकांना न्याय मिळाला पाहिजे. त्यासाठी संवाद, अभ्यास आणि विधायक मार्ग आवश्यक आहे. संघर्ष किंवा विभाजन नव्हे, तर समन्वय आणि परस्पर विश्वास हीच पुढील वाटचालीची दिशा असली पाहिजे.
 
आज वीरशैव-लिंगायत समाजातील उद्योजक, नोकरदार, शेतकरी आणि तरुण वर्गाने समाजाच्या व्यापक हितासाठी कोणती भूमिका घ्यावी, असे आपल्याला वाटते?
 
आज समाजामध्ये शिक्षित, सक्षम आणि विविध क्षेत्रांत यशस्वी झालेली मोठी पिढी निर्माण झाली आहे. ही मोठी ताकद आहे. परंतु या शक्तीचा उपयोग केवळ वैयक्तिक प्रगतीपुरता न राहता, समाजाच्या उन्नतीसाठी झाला पाहिजे.
 
उद्योजकांनी रोजगारनिर्मिती करावी, शेतकर्‍यांनी आधुनिक आणि शाश्वत शेतीकडे वाटचाल करावी, नोकरदारांनी समाजाशी आपले नाते जपावे आणि युवकांनी संघटन, शिक्षण आणि संस्कार यांना प्राधान्य द्यावे. समाजामध्ये निर्माण होणारे गैरसमज दूर करण्यासाठी प्रबोधनाची आवश्यकता आहे.
 
बसवेश्वरांनी सांगितलेल्या ‘कायक’ आणि ‘दासोह’ या तत्त्वांचा स्वीकार करून समाजामध्ये सेवा, समर्पण आणि बांधिलकीची भावना निर्माण झाली पाहिजे. आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या घटकांनी शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक उपक्रमांसाठी योगदान दिले, तर समाज अधिक सशक्त होईल. समाजाची ताकद केवळ संख्येमध्ये नसते; तर संघटन, संस्कार आणि परस्पर विश्वासामध्ये असते. त्यामुळे सर्वांनी सामूहिक जबाबदारी स्वीकारण्याची गरज आहे.
 
पुढील २० ते २५ वर्षांनंतरचा हिंदू वीरशैव-लिंगायत समाज आपण कसा पाहू इच्छिता?
 
मला असा समाज पाहायचा आहे, जो आर्थिकदृष्ट्या सक्षम, शैक्षणिकदृष्ट्या प्रगत, धार्मिकदृष्ट्या जागरूक आणि सामाजिकदृष्ट्या एकसंध असेल. बसवेश्वरांनी सांगितलेले ‘कायक’, ‘दासोह’, समानता आणि सदाचार हे जीवनमूल्य समाजाच्या प्रत्येक स्तरावर रुजलेले असावेत.
 
आजही अनेक ठिकाणी उपजातींच्या भिंती दिसून येतात. गेल्या अनेक शतकांमध्ये बरेच बदल झाले असले, तरी पूर्ण सामाजिक समरसता निर्माण होण्यासाठी अजून प्रयत्नांची आवश्यकता आहे. समाजामध्ये ‘रोटी आणि बेटी व्यवहार’ अधिक व्यापक झाले पाहिजेत. उपजातींमधील अंतर कमी झाले पाहिजे.
 
मला असा समाज अपेक्षित आहे, ज्यामध्ये परस्परांबद्दल विश्वास असेल, मत्सर नसेल; श्रमाला प्रतिष्ठा असेल आणि धर्म व संस्कृतीबद्दल अभिमान असेल. युवकांनी जगाशी स्पर्धा करावी, पण आपल्या संस्कारांपासून दूर जाऊ नये.
 
आर्थिक प्रगतीसोबतच नैतिक मूल्ये आणि सामाजिक बांधिलकी टिकवणे, हेही तितकेच महत्त्वाचे आहे. भविष्यातील हिंदू वीरशैव-लिंगायत समाज अधिक संघटित, अधिक जागरूक आणि अधिक समरस व्हावा, हीच अपेक्षा आहे.
 
शेवटी, आगामी जनगणना, समाजाची एकता आणि पुढील पिढीच्या भविष्यासंदर्भात समाजबांधवांना आपण कोणता संदेश द्याल?
 
माझी एकच अपेक्षा आहे की, पुढील पिढी कष्टाळू, राष्ट्रनिष्ठ, धर्माधिष्ठित आणि स्वाभिमानी असली पाहिजे. विनाकष्ट सर्व काही मिळावे, अशी मानसिकता समाजाला पुढे नेऊ शकत नाही. श्रम, प्रामाणिकपणा आणि आत्मविश्वास या मूल्यांवर उभे राहणारे समाजच दीर्घ काळ टिकतात.
 
आपल्या कामावर प्रेम करणारी, देशावर प्रेम करणारी, धर्माविषयी श्रद्धा असलेली आणि परस्परांमध्ये विश्वास ठेवणारी पिढी घडवणे, ही आजची सर्वांत मोठी गरज आहे. मतभेद असतील, विचारभिन्नता असेल; पण द्वेष नसावा. समाजामध्ये प्रेम, सहकार्य आणि समन्वयाची भावना वाढली पाहिजे.
 
आपल्या मर्यादा मान्य करत बसण्यापेक्षा क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करणारी पिढी घडली पाहिजे. परिस्थिती बदलण्याची ताकद प्रत्येकामध्ये आहे, यावर विश्वास असला पाहिजे. मोठी स्वप्ने पाहणारी आणि त्यासाठी कठोर परिश्रम करणारी तरुणाई निर्माण झाली, तर समाजाचे भविष्य उज्ज्वल असेल.




सागर देवरे

सागर देवरे, सामाजिक न्याय प्रतिनिधी, दैनिक मुंबई तरुण भारत.
शिक्षण : बी.ए. एल.एल.बी. (अभ्यासक्रम सुरू).
सामाजिक व पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असून विविध सामाजिक, शैक्षणिक व अन्य चळवळींवर वृत्तांकनाचा अनुभव.
समुदायाधारित प्रश्नांवर सातत्याने अभ्यासपूर्ण लेखन.
सामाजिक न्याय, हिंदू बहुजन समाजाचे प्रश्न व विद्यार्थी चळवळींवर विशेष लेखन.