पंतप्रधान मोदी यांच्या सेवा कार्याला संपूर्ण देश लक्षात ठेवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; १२ वर्षात महाराष्ट्राला भरभरून दिले

    10-Jun-2026   
Total Views |
PM Modi Achievement
 
नवी दिल्ली : (PM Modi Achievement) केवळ सर्वाधिक काळ असलेले पंतप्रधान म्हणून नाही तर, 'विकास भी, विरासत भी' या त्यांच्या सेवा कार्याला संपूर्ण देश लक्षात ठेवेल, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक काळ देशाचे पंतप्रधानपद भुषवल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
 
नवी दिल्ली येथे माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाचे सर्वाधिक काळ कार्य करणारे निर्वाचित पंतप्रधान म्हणून ४ हजार ३९९ दिवस पूर्ण करत एक नवीन कीर्तीमान स्थापित केल्याबद्दल मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो.
 
हे ४ हजार ३९९ दिवस हा केवळ काळ नसून भारताच्या प्रगतीचा आलेख लिहिला गेलेला सुवर्णकाळ आहे. या काळात देशातील २५ कोटी लोक गरिबीतून बाहेर आले, देशातील रस्ते, रेल्वे, बंदरे, विमानतळ या सर्व प्रकारच्या पायाभूत सुविधांचे जाळे तयार झाले, भारताच्या अर्थव्यवस्थेने मोठी भरारी घेत जगातील चौथ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था म्हणून जगाच्या पाठीवर नाव कमावले, शेतकऱ्यांसाठी सिंचनाच्या सोयी उपलब्ध करून देण्यासाठी सर्वाधिक निधी केंद्र सरकारने उपलब्ध करून दिला, आत्मनिर्भर भारत तयार होताना आपण बघितला आणि विशेषत: ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून जगाला भारताची शक्ती दाखवू शकलो.
 
हेही वाचा :  बेस्टच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; ५०० कोटींच्या थकीत रकमेचा पहिला हप्ता मंजूर
 
भारताने युपीआयच्या माध्यमातून डिजिटल पेमेंट सिस्टिम गेटवे जगाला दिला आणि आज जगातील ३० देश हा डिजिटल पेमेंट गेट वे वापरत आहेत, असा देश मोदीजींनी उभा केला आहे. या काळात त्यांनी भारताच्या तरूणाईच्या स्वप्नांना मोठे पंख देण्याचे काम केले."
 
१२ वर्षांत महाराष्ट्राला भरभरून दिले
 
ते पुढे म्हणाले की, "गेल्या १२ वर्षात महाराष्ट्राला मोदी यांनी भरभरून दिले. धरणे, बंदरे, रस्ते, मेट्रो, रेल्वे, विमानतळ असे अनेक कागदावर दिसणारे प्रकल्प प्रत्यक्षात उतरलेले पाहायला मिळत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने मी आमच्या लाडक्या प्रधानमंत्र्यांचे अभिनंदन करतो. ज्या ज्या वेळी मी महाराष्ट्रासाठी मोदीजींकडे गेलो, त्या त्या वेळी त्यांनी महाराष्ट्राचे प्रश्न सोडवण्यास प्राधान्य दिले. २०१५ च्या दुष्काळात त्यांनी देशात केवळ महाराष्ट्राला बळीराजा योजना दिली. यामुळे विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील १०० धरणे आपण पूर्ण करू शकलो. इतका संवेदनशील नेता आपल्याला क्वचितच पाहायला मिळतो, असे मला वाटते."(PM Modi Achievement)
 
नेहरू आणि मोदींमध्ये कुठलीही स्पर्धा नाही
 
शरद पवार यांच्या वक्तव्यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात कुठलीही स्पर्धा नाही. हा केवळ रेकॉर्डचा भाग आहे. देशात नेहरू हे ४ हजार ३९८ दिवस पंतप्रधान होते. मोदीजींचे ४ हजार ३९९ दिवस झाले असून पुढेही ते राहणार आहेत. याव्यतिरिक्त नेहरू आणि मोदी यांच्या काळात त्यांनी केलेले काम आपल्याला माहिती आहे. त्यामुळे तुलना करण्याचा विषयच नाही. नवभारताच्या निर्मितीत मोदीजींचे स्थान अढळ आहे. त्यामुळे कुणाशीही तुलना करण्याचे कारण नाही."(PM Modi Achievement)
 
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....