मुंबई : (Chembur Metro Station) मुंबईच्या पूर्व उपनगरांतील लाखो प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासात मोठा बदल घडवून आणणारे चेंबूर मेट्रो स्टेशन आणि मोनोरेल जोडणी प्रकल्प आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहेत. या दोन्ही महत्त्वाच्या सार्वजनिक वाहतूक प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी नुकतीच चेंबूर मेट्रो स्टेशनला भेट दिली. यावेळी मुंबई मोनोरेल ऑपरेशन कंपनी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक कन्हूराज बगाटे उपस्थित होते.
चेंबूर मेट्रो स्टेशनची पायाभूत सुविधा जवळपास पूर्ण झाली असून, प्रवाशांसाठी आवश्यक असलेल्या विविध सुविधांची उभारणी पूर्णत्वास आली आहे. दुसरीकडे, मुंबई मोनोरेलचे संपूर्ण आधुनिकीकरण करण्यात आले असून नवीन रेक्स, अद्ययावत सिग्नलिंग प्रणाली आणि प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक नवीन सुविधांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे मोनोरेलची विश्वासार्हता आणि कार्यक्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.(Chembur Metro Station)
हे दोन्ही प्रकल्प सुरू झाल्यानंतर पूर्व उपनगरांपासून दक्षिण-मध्य मुंबईपर्यंतचा प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सुलभ होणार आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी, नोकरीसाठी दररोज प्रवास करणारे कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक तसेच कुटुंबांसाठी या प्रकल्पांचा मोठा फायदा होणार आहे. वाहतुकीत अडकून जाणारा वेळ वाचल्याने नागरिकांना अधिक गुणवत्तापूर्ण वेळ मिळणार आहे.
एमएमआरडीएच्या ‘मुंबई इन मिनिट्स’ या संकल्पनेअंतर्गत राबविण्यात येणारे हे उपक्रम शहरातील नागरिकांना जलद, सुलभ आणि प्रभावी वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल मानले जात आहेत. या प्रकल्पांमुळे मुंबईतील संधी, सेवा आणि गतिशीलता नागरिकांच्या अधिक जवळ येणार असल्याचे एमएमआरडीएकडून सांगण्यात आले.(Chembur Metro Station)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.