बेस्ट बस अपघातातील जखमी ऋषभ गुप्ता यांची महापौरांकडून विचारपूस; कुटुंबाला तातडीने दोन लाखांची मदत; उपचारांचा संपूर्ण खर्च प्रशासन उचलणार

    10-Jun-2026
Total Views |
 BEST Bus Accident
 
मुंबई : (BEST Bus Accident) दादर येथील प्लाझा चित्रपटगृहाजवळ सोमवारी झालेल्या बेस्ट बस अपघातात गंभीर जखमी झालेल्या २२ वर्षीय ऋषभ गुप्ता यांची मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि बेस्ट समितीच्या अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांनी शीव येथील लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय येथे भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली.
 
सध्या ऋषभ गुप्ता यांच्यावर रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. महापौर आणि बेस्ट समिती अध्यक्षा यांनी त्यांच्या आई रमा गुप्ता तसेच अन्य नातेवाईकांची भेट घेऊन त्यांना धीर दिला.(BEST Bus Accident)
 
ऋषभ यांच्या उपचारासाठी आवश्यक असलेला सर्व वैद्यकीय खर्च प्रशासनाच्या वतीने केला जाईल, तसेच उपचारांमध्ये कोणतीही कमतरता राहू नये, अशा सूचना रुग्णालय प्रशासनाला देण्यात आल्याची माहिती त्यांनी कुटुंबीयांना दिली.
 
यावेळी महापौर रितू तावडे यांनी संबंधित बेस्ट बस कंत्राटदाराशी दूरध्वनीवरून संपर्क साधून गुप्ता कुटुंबाला तात्काळ दोन लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे निर्देश दिले. तसेच महापौर आणि बेस्ट समिती अध्यक्षा यांनी स्वतःच्या वतीनेही कुटुंबाला मदत प्रदान केली.
 
या भेटीदरम्यान महानगरपालिकेचे संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये) डॉ. शैलेश मोहिते आणि रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद इंगळे उपस्थित होते.
 
प्रशासनाकडून ऋषभ गुप्ता यांच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवले जात असून आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून दिली जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.(BEST Bus Accident)