आधुनिक काळातील ‘जनरल डायर’

    10-Jun-2026   
Total Views |
POK Protests And Crackdown
 
जालियनवाला बाग हत्याकांडाचा तो काळा दिवस इतिहास कधीच विसरू शकत नाही, जेव्हा जनरल डायरने निःशस्त्र आणि शांततापूर्ण आंदोलन करणार्‍या भारतीयांवर बेछूट गोळीबार करण्याचे आदेश दिले. आज तब्बल शतकाहून अधिक काळानंतर, पाकव्याप्त काश्मीरमध्येही हुकूमशाही आणि क्रूरतेचा तसाच एक नवा अंक पाहायला मिळाला. नव्या अंकाचे सूत्रधार आहेत, पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर. रावळकोट आणि संपूर्ण ‘पीओके’ भागात दि. ९ जून रोजी झालेल्या बंददरम्यान शांततापूर्ण श्रद्धांजली सभेसाठी जमलेल्या आंदोलकांवर पाकिस्तानी सैन्याने केलेला बेछूट गोळीबार, २७ निष्पापांचा झालेला मृत्यू आणि शेकडो जण जखमी झाल्याची घटना, मुनीर यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करते. म्हणूनच प्रश्न उपस्थित करावासा वाटतो की, जनरल मुनीर आधुनिक काळातील जनरल डायर ठरले आहेत का?
 
‘पीओके’मधील ताज्या हिंसाचाराच्या मुळाशी केवळ कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न नाही, तर तिथल्या जनतेच्या अस्तित्वाची आणि राजकीय अस्मितेची लढाई आहे. ‘जॉईंट अवामी अ‍ॅशन कमिटी (जेएएसी)’ आणि स्थानिक संघटनांनी ४५ सदस्यीय विधानसभेतील १२ राखीव जागांच्या निर्णयाला तीव्र विरोध केला आहे. या जागा अशा ‘निर्वासितांसाठी’ राखीव ठेवण्यात आल्या आहेत, जे स्वतःला काश्मीरशी संबंधित मानतात. पण, प्रत्यक्षात पाकिस्तानच्या इतर प्रांतांमध्ये राहतात. या व्यवस्थेमुळे ‘पीओके’मधील मूळ रहिवाशांचे राजकीय प्रतिनिधित्व कमकुवत केले जात असून, इस्लामाबादच्या इशार्‍यावर नाचणार्‍या बाहेरील लोकांचा प्रभाव वाढवला जात आहे. आपल्याच मातीवर आपले अधिकार नाकारले जात असल्याने तिथली जनता रस्त्यावर उतरली. पण, लोकशाही मार्गाने आवाज उठवणार्‍या या जनतेला पाकिस्तान सरकारने ‘दहशतवादविरोधी कायद्यां’तर्गत बंदी घालून थेट गुन्हेगार ठरवले.
 
मुनीर यांनी पाकिस्तानची सत्ता हाती घेतल्यापासून प्रत्येक अंतर्गत आवाज दाबण्यासाठी लष्करी बळाचा वापर केला आहे. ‘पीओके’मध्येदेखील हेच घडले. आंदोलनाची तीव्रता जगासमोर येऊ नये, म्हणून संपूर्ण भागात इंटरनेट सेवा ठप्प करण्यात आली. ‘जेएएसी’च्या प्रमुख नेत्यांना दहशतवादी ठरवून तुरुंगात डांबण्यात आले आणि काही नेत्यांच्या संशयास्पद हत्या झाल्या. एका मृत कार्यकर्त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी आणि श्रद्धांजली वाहण्यासाठी जमलेल्या निःशस्त्र गर्दीवर पाकिस्तानी निमलष्करी दलाने थेट गोळ्या झाडल्या. यामुळेच ‘पाकिस्तान मानवाधिकार आयोगा’ने या कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त करत प्रशासनाला जाब विचारला आहे.
 
पाकिस्तान नेहमीच आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर ‘काश्मीरमधील मानवाधिकारांचा’ ऊर बडवून आव आणत असतो. मात्र, ‘पीओके’मधील स्थानिक काश्मिरी जनतेवर स्वतःचेच सैन्य ज्याप्रकारे अनन्वित अत्याचार करत आहे, त्याने पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा जगासमोर उघडा पडला. रावळकोटमधील या क्रूरतेच्या निषेधार्थ लंडनसह जगातील अनेक प्रमुख शहरांमध्ये प्रवासी काश्मिरी आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांनी पाकिस्तान सरकार आणि जनरल मुनीर यांच्या विरोधात तीव्र निदर्शने सुरू केली आहेत. ‘काश्मीर स्वातंत्र्या’च्या गप्पा मारणारा पाकिस्तान स्वतःच्या ताब्यात असलेल्या काश्मिरींना गुलाम आणि कीटक समजून मारत आहे, हे आता लपून राहिलेले नाही.
 
इतिहासाचा एक नियम आहे; दडपशाही जेवढी तीव्र असेल, तेवढाच जनक्षोभाचा भडका मोठा उडतो. जनरल डायरने गोळीबार करून भारतीय स्वातंत्र्यलढ्याची ठिणगी अधिक तीव्र केली होती, जी शेवटी ब्रिटिश साम्राज्याला गिळून बसली. आज मुनीरदेखील त्याच वाटेवर आहे.
 
पाकिस्तानने आजवर जागतिक मंचावर काश्मीरचा जो खोटा अजेंडा चालवला, त्याचा बुरखा यानिमित्ताने फाटल्याचे दिसते. स्वतःच्या हक्कासाठी पेटून उठलेली ‘पीओके’मधील जनता आता इस्लामाबादच्या हुकूमशाहीपुढे झुकण्यास तयार नाही, हे रावळकोटच्या रस्त्यांवर सांडलेल्या रक्ताने सिद्ध केले आहे. जनरल मुनीर यांनी पोकळ धमया आणि बंदुकांच्या जोरावर ‘पीओके’ला नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला, तर हाच असंतोष पाकिस्तानच्या राजकारणाला आणि भूगोलाला कायमची खीळ घालणारी एक नवी नांदी ठरेल, यात तिळमात्र शंका नाही!




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक