मुंबई : (Ancient Stone Carvings) मुरबाड तालुक्यातील शेलारी गावाच्या परिसरात प्राचीन दगडी शिल्पांचा शोध लागला असून, इतिहासाचा एक नवीन अध्याय या मुळे प्रकाशझोतात आला आहे. शेलारी गावाच्या निसर्ग पर्यटन केंद्राच्या माती आणि पानगळीत दडलेली ही शिल्पं हजारो वर्षांपूर्वीच्या संस्कृतीची साक्ष देत आहे. इतिहास संशोधक योगेंद्र बांगर यांच्या संशोधनातून या शिल्पांचे वैशिष्ठ्य लोकांच्या समोर आले आहेच. मात्र त्याचबरोबर, मुरबाड तालुक्याचे प्राचीन काळातील महत्व देखील पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
प्राचीन काळातील स्थापत्यशैलीच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेल्या या शिल्पांवर विविध प्राणी असल्याचे आढळून येते. सदर शिल्पावर वाघ, हत्ती, मोर, कमळ, तसेच उंटीणीसदृश आकृती कोरलेली आहे. काळाच्या ओघात झिजूनही त्यावरील कोरीव काम आजही स्पष्टपणे दिसून येते. यावरून त्या काळातील शिल्पकलेची समृद्ध परंपरा अधोरेखित होत असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. शिल्पाच्या पायथ्यावरील तत्कालीन नक्षीकाम कलाशैली, व्यापारी संस्कृती आणि धार्मिक-सांस्कृतिक देवाणघेवाणीचे संकेत देणारे मानले जात आहे.
इतिहास संशोधक योगेंद्र बांगर या संदर्भात अधिक माहिती देताना म्हणाले की गोरखगडाकडे जाणारा जुना व्यापारी आणि रहदारी मार्ग या परिसरातून जात होता. सह्याद्रीतील व्यापारी, प्रवासी आणि साधुसंतांच्या वावरामुळे हा भाग ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा होता. शिल्पावरील उंटीणीच्या आकृतीचा संबंध राजस्थानातील व्यापारी संस्कृतीशी असू शकतो. एखाद्या राजस्थानी व्यापाऱ्याने या ठिकाणी दान दिले असावे किंवा व्यापारी हितसंबंधातून या शिल्पनिर्मितीला चालना मिळाली असावी. सदर प्राचीन शिल्पांचे पुरातत्तव विभागाच्या माध्यमातून सर्वेक्षण करुन त्यांचे संवर्धन आणि जतन करण्यात यावे, अशी मागणी इतिहासप्रेमींच्या माध्यमातून करण्यात आली आहे. (Ancient Stone Carvings)
मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.