आई-बाबा सामाजिक संस्थेतर्फे; १२०० हून अधिक विद्यार्थ्यांना वह्यावाटप
गडकरी रंगायतनमध्ये रंगला गुणगौरव कार्यक्रम
10-Jun-2026
Total Views |
ठाणे : (Aai-Baba Social Organization) आई-बाबा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष जयेंद्र कोळी व भाजपच्या नगरसेविका नम्रता कोळी यांनी गडकरी रंगायतनमध्ये आयोजित केलेल्या भव्य कार्यक्रमात १२०० हून अधिक विद्यार्थ्यांना वह्यावाटप करण्यात आले. त्याचबरोबर दहावी व बारावी परिक्षेतील ६० हून अधिक गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यापुढील काळातही आई-बाबा सामाजिक संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक आधार देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत, अशी ग्वाही जयेंद्र कोळी व नम्रता कोळी यांनी दिली.
या कार्यक्रमाला भाजपचे आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, आमदार माधवी नाईक, भाजपचे जिल्हाध्यक्ष संदिप लेले, ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले, गटनेते मुकेश मोकाशी, नगरसेवक सुनेश जोशी, मृणाल पेंडसे, उषा वाघ, जिल्हा सरचिटणीस सचिन पाटील, मंडळ अध्यक्ष रोहित गोसावी, रक्षा यादव आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांच्याकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.
गेल्या १८ वर्षांपासून आई-बाबा सामाजिक संस्थेने सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवसापासून वह्या देण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे. संस्थेचे अध्यक्ष जयेंद्र कोळी व नगरसेविका नम्रता कोळी यांच्याकडून प्रत्येक गरजू विद्यार्थ्यांपर्यंत वह्यांची भेट देण्याचा प्रयत्न केला जातो.त्यामुळे ठाण्यातील शैक्षणिक वर्तुळात हा उपक्रम प्रसिद्ध आहे. यंदा प्रथमच गडकरी रंगायतनमध्ये झालेल्या कार्यक्रमात शहरातील १२०० हून अधिक विद्यार्थ्यांना वह्यांची भेट देण्यात आली. तसेच ६० हून अधिक विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.(Aai-Baba Social Organization)
शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी अनेक गरजू पालकांची वह्या-पुस्तकांसाठी आर्थिक ओढाताण पाहिली होती. या मुलांच्या शैक्षणिक प्रगतीत आपण खारीचा वाटा उचलू शकतो, ही भावना लक्षात गरजू विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवसापासून वह्यांची भेट देण्यास सुरुवात केली होती. त्याला १८ वर्षांचा कालावधी उलटला असून, यापुढील काळातही विद्यार्थ्यांना सातत्याने मदतीचा हात दिला जाईल, अशी ग्वाही संस्थेचे अध्यक्ष जयेंद्र कोळी यांनी दिली.
ठाण्यातील सर्वसामान्य व मध्यमवर्गीय कुटुंबांना खासगी इंग्रजी वा सेमी इंग्रजी माध्यमांतील शाळांची फी बहुसंख्य पालकांना परवडणारी नाही. त्यामुळे महापालिकेच्या माध्यमातून इंग्रजी वा सेमी इंग्रजी माध्यमांमध्ये शिक्षण मिळावे, यासाठी प्रयत्नशील आहोत, अशी माहिती नगरसेविका नम्रता कोळी यांनी दिली. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील महापालिकेच्या शाळेच्या इमारतीची पुनर्बांधणी करून तेथे सीबीएसई माध्यमाची शाळा सुरू करण्याचा निर्धार व्यक्त केला. जिल्हा परिषदेच्या ताब्यातील बी. जी. हायस्कूलमध्ये सेमी इंग्रजी किंवा इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या पर्यायाची चाचपणी करणार आहोत, असे नम्रता कोळी यांनी सांगितले.
या कार्यक्रमासाठी प्रतीक सोलंकी, नरेश ठाकूर, अन्वेष जयगडकर, मीनाक्षी मेस्त्री, सुनिता भोईर, मयुर भालेराव, नयन दळवी, अविनाश बाबरे, निलेश तेली, कृष्णा देवळेकर, अंकुश गोगावले, महेश मिश्रा, हर्ष घाग, रेश्मा माने यांनी सहकार्य केले.(Aai-Baba Social Organization)