वाशी आणि ऐरोली नाका बनणार हरित प्रवेशद्वार; जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विशेष वृक्षारोपण मोहिमेला सुरुवात

    01-Jun-2026
Total Views |
Ritu Tawde
 
मुंबई : (Vashi Naka Green Project) शहरातील प्रमुख प्रवेशमार्ग असलेल्या वाशी नाका आणि ऐरोली नाका परिसराला हिरवेगार आणि आकर्षक स्वरूप देण्यासाठी व्यापक हरित क्षेत्र विकास प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. 
 
महापौर रितू तावडे यांनी सोमवारी या दोन्ही ठिकाणांना भेट देऊन अधिकाऱ्यांना रस्त्यांच्या दुतर्फा हरित पट्टे विकसित करणे, झुडपे हटविणे आणि मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्याचे निर्देश दिले.
 
महापौरांनी सांगितले की, ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने या मोहिमेचा प्रतीकात्मक शुभारंभ करण्यात येणार आहे. या अंतर्गत वाशी नाका आणि ऐरोली नाका परिसरात पर्यावरणपूरक व सौंदर्यपूर्ण हरित क्षेत्र विकसित करण्यात येणार आहे. तसेच पूर्व द्रुतगती महामार्गावरील पंतनगर ते मुलुंड दरम्यान खाडीकिनारी पिवळ्या बहावा (अमलतास) वृक्षांची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
 
हेही वाचा :  आचारसंहिता संपताच गोपाळगड किल्ला पूर्णतः ताब्यात घेणार; रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री उदय सामंत यांचे आश्वासन
 
पाहणीदरम्यान महापौरांनी सांगितले की, मुंबईत प्रवेश करणारे हजारो नागरिक आणि वाहने दररोज या दोन्ही मार्गांचा वापर करतात. त्यामुळे या परिसरांचे सुशोभीकरण आणि हरित विकास करणे आवश्यक आहे. त्यांनी पिंक टेबेबुइया आणि पिवळा बहावा यांसारख्या फुलझाडांना प्राधान्य देण्याची सूचना केली.
 
यामुळे परिसराचे सौंदर्य वाढण्यासोबतच पर्यावरणीय समतोलही अधिक मजबूत होईल. या प्रकल्पामुळे प्रदूषण नियंत्रण, जैवविविधतेचे संवर्धन, कार्बन शोषणात वाढ आणि नागरिकांना स्वच्छ व निरोगी वातावरण उपलब्ध होण्यास मदत होईल, असा विश्वास महापौरांनी व्यक्त केला. (Vashi Naka Green Project)