पर्यावरण आणि जैवविविधता; भविष्य घडवणारी दिशा

    01-Jun-2026
Total Views |
United Nations Environment Programme
 
पर्यावरण आणि जैवविविधता हा आता केवळ एक विषय किंवा विचार राहिलेला नाही. या विषयात करिअर करून तो भविष्य घडवणारा एक मार्ग झाला आहे. त्याविषयी विशद करणारा हा लेख...
 
आज जग एका अतिशय महत्त्वाच्या वळणावर उभे आहे. हवामानबदल, वाढतं प्रदूषण, जंगलांची होणारी तोड, पाण्याची टंचाई, नष्ट होत चाललेल्या प्रजाती या सगळ्या समस्या केवळ वर्तमानाच्या नाहीत, तर येणार्‍या पिढ्यांच्या अस्तित्वाशी निगडित आहेत. त्यामुळे पर्यावरण आणि जैवविविधता हे विषय आता केवळ अभ्यासक्रमापुरते मर्यादित राहिलेले नाहीत; ते मानवजातीच्या भविष्याचा केंद्रबिंदू बनले आहेत. सध्या सरकारी नियम, औद्योगिक परवानग्या, नगररचना, शेती, जलव्यवस्थापन, वनसंवर्धन, ऊर्जानिर्मिती अशा प्रत्येक क्षेत्रात पर्यावरणीय निकष अत्यंत महत्त्वाचे झाले आहेत. कोणताही मोठा प्रकल्प उभारताना पर्यावरणीय परिणाम अहवाल (Environmental Impact Assessment) आवश्यक ठरतो. कंपन्यांनाही आता ‘सस्टेनेबिलिटी’ आणि ‘ईएसजी’ (Environmental, Social, Governance) या संकल्पना पाळाव्या लागतात. म्हणजेच, भविष्यात रोजगाराच्या असंख्य संधी या क्षेत्राशी जोडल्या जाणार आहेत.
 
अशा परिस्थितीत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी पर्यावरण आणि जैवविविधता हे विषय केवळ पर्यायी म्हणून न पाहता, एक सक्षम आणि अर्थपूर्ण करिअरची दिशा म्हणून स्वीकारण्याची गरज आहे. अनेकदा विद्यार्थ्यांना वाटतं की विज्ञान, अभियांत्रिकी, वैद्यकीय किंवा व्यवस्थापन क्षेत्राइतकी प्रतिष्ठा या विषयांना नाही. पण वास्तव अगदी उलट आहे. आज जगभरात पर्यावरणतज्ज्ञ, वन्यजीव संशोधक, जलतज्ज्ञ, हवामानअभ्यासक, पर्यावरणीय कायदे जाणणारे तज्ज्ञ, शाश्वत विकास सल्लागार यांची मागणी झपाट्याने वाढत आहे. या विषयांचं वैशिष्ट्य म्हणजे, ते केवळ नोकरी देत नाहीत, तर समाजासाठी काहीतरी अर्थपूर्ण करण्याची संधी देतात. एखादे झाड वाचवणे, नदीचे पुनरुज्जीवन करणे, पक्षी आणि प्राण्यांच्या अधिवासाचे संरक्षण करणे, गावांना पाण्यासाठी सक्षम करणे, ही कामं केवळ करिअर नसून जीवनाला मूल्य देणारी साधना आहे.
 
पर्यावरणाचा अभ्यास माणसाला अधिक संवेदनशील बनवतो. तो निसर्गाकडे फक्त संसाधन म्हणून पाहायला शिकवत नाही, तर सहअस्तित्वाची जाणीव करून देतो. मानव हा निसर्गाचा मालक नाही, तर एक घटक आहे, ही समज या विषयांतून विकसित होते आणि कदाचित आज जगाला सर्वाधिक गरज याच विचारांची आहे. यासाठी शासन, शैक्षणिक संस्था आणि समाज यांनी एकत्र येऊन विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन देण्याची गरज आहे. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये केवळ पुस्तकापुरता अभ्यास न ठेवता, प्रत्यक्ष निसर्गभ्रमण, जैवविविधता नोंदी, जलसंधारण प्रकल्प, वृक्षसंवर्धन आणि स्थानिक पर्यावरण अभ्यास यांसारख्या उपक्रमांना प्राधान्य दिलं पाहिजे. जेव्हा विद्यार्थी प्रत्यक्ष निसर्गाशी जोडले जातात, तेव्हा त्यांच्या मनात या विषयांबद्दल आत्मीयता निर्माण होते.
 
जगभरात ‘ग्रीन इकोनॉमी ही संकल्पना वेगाने विकसित होत आहे. अक्षय ऊर्जा, सेंद्रिय शेती, कचरा व्यवस्थापन, कार्बन क्रेडिट, पर्यावरणीय पर्यटन, जैवविविधता संवर्धन अशा क्षेत्रांमध्ये उद्योजकतेच्या नव्या संधी निर्माण होत आहेत. त्यामुळे पर्यावरण आणि जैवविविधता हे विषय केवळ सामाजिक जबाबदारी नाहीत, तर आर्थिकदृष्ट्याही सक्षम भविष्य घडवणारे ठरत आहेत. तरुण पिढी जर निसर्गाशी नातं जपत पुढे गेली, तर विकास आणि संवर्धन यांचा सुंदर समतोल साधला जाऊ शकतो. अन्यथा प्रगतीच्या नावाखाली आपणच आपल्या अस्तित्वाचा पाया कमकुवत करू. म्हणूनच विद्यार्थ्यांनी, पालकांनी आणि शिक्षण संस्थांनी या विषयांकडे दुय्यम दृष्टीने न पाहता, त्यांना प्रोत्साहन द्यायला हवे. उद्याचं जग केवळ तंत्रज्ञानावर नाही, तर शाश्वततेवर उभं राहणार आहे आणि त्या भविष्याचे खरे शिल्पकार पर्यावरण आणि जैवविविधतेचा अभ्यास करणारे विद्यार्थी असतील. निसर्गाचं रक्षण करत प्रगती साधणं, हीच खरी आधुनिकतेची ओळख ठरणार आहे.
- डॉ. सोनाली शिंदे