असदच्या एन्काऊंटर नंतर सूर्याच्या आईकडून समाधान व्यक्त; इतर सामिल आरोपींविराधात केली कठोर कारवाईची मागणी

    01-Jun-2026
Total Views |
Surya murder case
 
मुंबई : (Surya murder case) गाझियाबादच्या खोडा परिसरातील सूर्याच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असद पोलिस चकमकीत ठार झाला. त्याच्या एन्काऊंटर नंतर सूर्याच्या आईने समाधान व्यक्त केले आहे. मात्र, आपल्या मुलाच्या हत्येत सहभागी असलेल्या इतर सर्व आरोपींनाही कठोर शिक्षा व्हावी, तसेच त्यांच्या घरांवर बुलडोझर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. याशिवाय असदचा मृतदेह पाहण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली आहे.
 
सरोज यावेळी म्हणाल्या की, पोलिसांनी आम्हाला न्याय मिळवून दिला आहे. त्यासाठी पोलिस, प्रसारमाध्यमे आणि सर्वांचे मी आभार मानते. मात्र, असदचा मृतदेह किंवा त्याचा फोटो पाहिल्याशिवाय तो चकमकीत ठार झाला आहे, यावर माझा विश्वास बसणार नाही. सात जणांनी मिळून माझ्या मुलाची हत्या केली. कोणीतरी त्याचे हात पकडले, कोणीतरी तोंड आणि मान दाबून धरली, तर असदने त्याच्यावर चाकूने वार केले. त्यामुळे या सर्व आरोपींवरही कठोर कारवाई व्हायला हवी. प्रशासनाने बुलडोझर कारवाईचे आश्वासन दिले होते, तीही लवकरात लवकर पूर्ण व्हावी.
 
हेही वाचा :  मीरा-भाईंदर परिसरात केरळ स्टोरीची पुनरावृत्ती!;जिहादी शब्बास शेख विरोधात गुन्हा दाखल
 
रविवारी उत्तर प्रदेश सरकारचे कॅबिनेट मंत्री सुनील शर्मा आणि जिल्हाधिकारी रविंद्र मांदड यांनी सूर्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी मंत्र्यांनी मुख्यमंत्री विवेकाधीन निधीतून ५ लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर झाल्याची माहिती दिली. तसेच कुटुंबातील एका सदस्याला नगरपालिकेत नोकरी देण्यात येणार असून कुटुंबाला सुरक्षा पुरविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. या प्रकरणात तातडीने कारवाई करण्यात आली असून कोणत्याही आरोपीला सोडले जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
 
आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी; विहिंपची मागणी
 
रविवारी विश्व हिंदू परिषद चे केंद्रीय महामंत्री बजरंग बागडा यांनीही सूर्याच्या घरी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यांनी समाज या दुःखाच्या प्रसंगी कुटुंबाच्या पाठीशी उभा असल्याचे सांगितले. तसेच कार्यकर्त्यांकडून निधी गोळा करून मदत करण्याचीही घोषणा केली. या घटनेतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, जेणेकरून गुन्हेगारांना कायद्यापासून सुटका होणार नाही, असा संदेश जाईल, असे त्यांनी म्हटले. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे गाझियाबाद विभाग मंत्री अजय शर्मा, विभाग संघटन मंत्री साहिल वालिया, हरनंदी महानगर अध्यक्ष बी. के. गुप्ता, राजेश तंवर यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. (Surya murder case)
 
पीलीभीतमध्ये पोलिसांची छापेमारी
 
सूर्या हत्याप्रकरणातील इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी गाझियाबाद पोलिसांनी पीलीभीतमधील दोन वस्त्यांमध्ये छापेमारी केली. पोलिसांनी दोन घरांची झडती घेतली; मात्र आरोपी सापडले नाहीत. शनिवारी गाझियाबाद पोलिसांची दोन पथके पीलीभीतमध्ये पोहोचली होती. शहर कोतवाली क्षेत्रातील बुजकसावान आणि खुशीमल या भागांत त्यांनी शोधमोहीम राबवली. या प्रकरणातील काही आरोपी पीलीभीतमध्ये आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. तसेच या घटनेशी संबंधित दोन संशयित अल्पवयीन मुलगेही पीलीभीतचेच रहिवासी असल्याचे समोर आले आहे. सुमारे चार ते पाच तास पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला. पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. (Surya murder case)