मुंबई : (Suman Kalyanpur) आपल्या मधूर आवाजाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचे रविवार, दि. 31 मे रोजी निधन झाले. वयाच्या 89व्या वर्षी मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने भारतीय संगीतक्षेत्रातील एका सुवर्ण युगाचा अंत झाला असून संगीतविश्वावर शोककळा पसरली आहे. मराठी भावगीत, भक्तीगीत आणि हिंदी चित्रपट संगीतात त्यांनी दिलेले योगदान कधीही न विसरता येणारे आहे. कलाक्षेत्रातील त्यांच्या अफाट कामगिरीची दखल घेऊन केंद्र सरकारने 2023 साली त्यांना ‘पद्मभूषण’ या नागरी पुरस्काराने सन्मानित केले होते. (Suman Kalyanpur)
सुमन कल्याणपूर यांचा जन्म दि. 28 जानेवारी 1937 रोजी बांगलादेशातील (तत्कालीन अविभाजित भारत) भवानीपूर येथे झाला होता. लहानपणापासूनच त्यांना संगीताची प्रचंड आवड होती. सुमनजींचे माहेरचे आडनाव हेमाडी असे होते. त्यामुळे लग्नापूर्वी त्या सिनेसृष्टीत सुमन हेमाडी या नावानेच गाणी गात असत आणि याच नावाने त्यांची सुरुवातीची गाणी लोकप्रिय झाली. सुमन कल्याणपूर यांच्या संगीताच्या प्रवासाची सुरुवात गझलसम्राट तलत महमूद यांच्यामुळे झाली. तलत महमूद यांनी स्वतःच्या एका आगामी चित्रपटासाठी सुमनताईंना गाण्याची विचारणा केली. सुमनताईंनीही या सुवर्णसंधीला होकार दिला आणि तिथूनच त्यांचा चित्रपटसृष्टीतील प्रवास सुरू झाला, तर मराठी भावगीत गायनाची त्यांची सुरुवात ग. दि. माडगुळकर यांच्या अजरामर गीतांनी झाली. सुमन कल्याणपूर जरी शुद्ध शास्त्रीय संगीत आणि नाट्यसंगीताकडे फारशा वळल्या नाहीत, तरी त्यांच्या गाण्यांमध्ये कमालीची शास्त्रीय बैठक होती. (Suman Kalyanpur)