मे महिन्यातील क्रीडापटूंचे एक्झिट...

    01-Jun-2026
Total Views |
Legends Exit, Legacy Remains
 
क्षेत्र कोणतेही असो, प्रत्येक क्षेत्रातील नव्या पिढीला जुन्या पिढीच्या कामगिरीतून प्रेरणा मिळतेच. भारतीय क्रीडाक्षेत्रातही असेच काहीसे आहे. मात्र, जेव्हा असे जुने-जाणते खेळाडू जगाचा निरोप घेतात, तेव्हा ते एक आदर्शांचा वारसा नव्या पिढीच्या हाती देतात. मे महिन्यात अशीच दोन दु:खे भारतीय क्रीडाक्षेत्राने पचवली. या दोन खेळाडूंच्या योगदानाचा मागोवा घेणारा हा लेख...
 
समस्त क्रीडाप्रेमींनी यावर्षीच्या मे महिन्यात दोन एक्झिट्स पाहिल्या. त्या दोनपैकी एकाला क्रीडाप्रेमींनी श्रद्धांजली अर्पण केली, तर उर्वरित एकाला समस्त क्रीडाप्रेमींबरोबरच ‘आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक महासंघा’नेही, त्यांचा ध्वज तीन दिवस अर्ध्यावर उतरवत श्रद्धांजली वाहिली. क्रीडाक्षेत्रातील त्या दोन एक्झिट्स घेतलेल्या भारतीयांची नावे आहेत, राजा रणधीर सिंग आणि जेनिफर पेस. या दोन व्यक्तींची थोडयात ओळख करून घेत, यावेळच्या आपल्या ‘क्रीडाविश्व’तून आपणही त्यांना श्रद्धांजली अर्पण करूया.
माजी ऑलिम्पिक खेळाडू आणि देशातील सर्वांत यशस्वी महिला बास्केटबॉलपटूंपैकी एक असलेल्या जेनिफर पेस यांचे अलीकडेच निधन झाले. शारीरिक आजार असूनही, त्या गेल्या काही वर्षांपासून क्रीडाक्षेत्रात आणि समाज माध्यमांवर सक्रिय होत्या. यामाध्यमातून त्या नियमितपणे देशातील तरुण पिढीला प्रोत्साहन देत, त्यांच्या खास शैलीत क्रीडाक्षेत्राविषयी प्रेम व्यक्त करत होत्या.
 
पश्चिम बंगालचे विद्यमान मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी, भारतीय टेनिस क्षेत्रातील दिग्गज खेळाडू लिएंडर पेस यांच्या मातोश्री जेनिफर पेस यांच्या निधनाचे वृत्त ऐकून शोक व्यक्त केला. तसेच, पश्चिम बंगाल सरकारच्यावतीने श्रद्धांजली वाहताना सुवेंदू अधिकारी म्हणाले की, "भारतीय बास्केटबॉल संघाच्या माजी कर्णधार आणि ऑलिम्पिक खेळाडू जेनिफर पेस यांचे भारतीय क्रीडाक्षेत्रातील योगदान अद्वितीय आहे. त्यामुळे त्यांचा या क्षेत्रातील वारसा सदैव स्मरणात राहील. या दुःखाच्या प्रसंगी लिएंडर पेस आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाप्रति मी माझ्या संवेदना व्यक्त करतो. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी शोकाकुल कुटुंबाला बळ मिळण्याबरोबरच, जेनिफर पेस यांच्या आत्म्यास शाश्वत शांती लाभो, अशी मी प्रार्थना करतो.”
 
जेनिफर यांचा जन्म कोलकात्याचे मायकल डटन आणि रुबी मर्टल निस यांच्या पोटी झाला. बंगाली कवी मायकल मधुसूदन दत्त हे त्यांचे पणजोबा. जेनिफर पेस यांचे काका गार्नी निस हे हॉकी, स्पीड स्केटिंग, अ‍ॅथलेटिस, क्रिकेट, बॅडमिंटन आणि टेनिस यांसह अनेक खेळांमध्ये निपुणता असलेले एक उत्तम खेळाडू होते. जेनिफर यांचा विवाह, भारताचे ऑलिम्पिक हॉकीपटू वेस पेस यांच्याशी झाला. त्यांचा मुलगा लिएंडर पेस हा भारताचा जगप्रसिद्ध टेनिसपटू आणि ऑलिम्पिक पदकविजेता आहे. जेनिफर पेस यांनी दीर्घकाळ कर्करोगाशी लढा दिला. दि. १७ मे रोजी वयाच्या ७२व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
 
आईवडिलांकडूनच खेळाचा वारसा लाभलेल्या लिएंडरने मातृशोकाविषयी ‘टेनिस प्रिमियर लिग’च्या उद्घाटनप्रसंगी भावना व्यक्त करताना म्हटले की, "आजचा दिवस खूपच कठीण होता. आज पहिला दिवस असा आहे जेव्हा मी उठलो आणि मला जाणवले की, या जगात माझे आई-वडील कोणीही उरलेले नाहीत. काही महिन्यांपूर्वी मी माझ्या वडिलांना गमावले आणि काल मी माझ्या आईला.” पुढे टेनिस खेळाविषयी भावना व्यक्त करताना त्याने या खेळाप्रति कृतज्ञताही व्यक्त केली. आजवरच्या आयुष्यात त्याला टेनिसने कायमच साथ दिल्याचेही त्याने अधोरेखित केले. लिएंडर म्हणाला ”भारतात लहानपणी ‘ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट’ टीव्हीवर ‘विम्बल्डन’ पाहताना, नवरतिलोवा आणि ख्रिस्त एव्हर्ट यांना ‘विम्बल्डन’ आणि ‘रोलॅण्ड कॅरोस’च्या कोर्टवर झुंजताना मी पाहिले आहे. ते पाहूनच मी नवरतिलोवासोबत ‘विम्बल्डन’ जिंकू शकलो, इंगससोबत चारही ग्रॅण्डस्लॅम जिंकू शकलो. टेनिसमुळे निर्माण झालेल्या या नात्यांचे उदाहरण म्हणजेच ’टेनिस प्रिमियर लीग’ अर्थात ‘टीपीएल!’ तसेच, आजवर टेनिसवर प्रेम करणारे अनेक क्रीडापटू हे माझे कुटुंबीय असल्यचेही लिएंडरने म्हटले.
 
जेनिफर पेस या एक दिग्गज बास्केटबॉल खेळाडू आणि ‘भारतीय महिला बास्केटबॉल संघा’च्या कर्णधारही होत्या. जेनिफर यांनी १९७२च्या ‘म्युनिक ऑलिम्पिक’मध्ये, ‘भारतीय महिला बास्केटबॉल संघा’चे प्रतिनिधित्व केले. त्यांचे पती वेस हेदेखील ऑलिम्पिक खेळाडू होते. त्यांनीही १९७२ ‘म्युनिक ऑलिम्पिक’ मध्ये कांस्यपदक विजेत्या संघाचे प्रतिनिधित्त्व केल होते.
 
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या काळातच, लिएंडर पेसने त्याची राजकीय कारकीर्दीची सुरुवात करताना, यावर्षीच्या मार्च महिन्यामध्ये भाजपमध्ये प्रवेश केला.
 
जेनिफर पेस यांच्यापाठोपाठच राजा रणधीर सिंग यांनीही अलीकडेच, अर्थात दि. २७ मे रोजी ‘एक्झिट’ घेतली. भारताच्या राजा रणधीर सिंग यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी तर ‘आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक महासंघा’च्या अध्यक्षा कर्स्टी कॉव्हेंट्री यांनी शोक व्यक्त केला. तसेच, राजा रणधीर सिंग यांच्या सन्मानार्थ ‘आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक महासंघा’च्या मुख्यालयातला ऑलिम्पिक ध्वज तीन दिवस अर्ध्यावरही उतरवण्यात आला.
 
कर्स्टी कॉव्हेंट्री या झिम्बाब्वेच्या माजी ऑलिम्पिक जलतरणपटू असून, मार्च २०२५ मध्ये त्यांची ‘आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक महासंघा’च्या अध्यक्षपदी निवड झाली. त्या या पदावर पोहोचणार्‍या पहिल्याच महिला आणि आफ्रिकन व्यक्ती ठरल्या. ‘भारतीय ऑलिम्पिक महासंघा’च्या अध्यक्षा पीटी उषा यांनी, तसेच अभिनव बिंद्रा, ‘भारतीय राष्ट्रीय रायफल संघटने’नेही राजा रणधीर सिंग यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. गगन नारंग आणि अभिनव बिंद्रा हे स्वतः ‘ट्रॅप शूटर्स’ नसले, तरीही सिंग यांच्यासारख्या आद्यप्रवर्तकांनी भारतात उभारलेल्या ‘शूटिंग परिसंस्थे’तूनच त्यांचा उदय झाला. याच परिसंस्थेने पुढे मानवजित सिंग संधू आणि राज्यवर्धन सिंग राठोडांसारखे प्रख्यात ‘ट्रॅप’ आणि ‘डबल-ट्रॅप’ शूटर्स घडवले. पुढे, या दोघांनीही भारतीय नेमबाजीला जागतिक स्तरावर नेले.
 
राजा रणधीर सिंग (१८ ऑटोबर १९४६ - २७ मे २०२६) हे पाचवेळा, ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेले भारतीय खेळाडू आणि क्रीडा प्रशासक होते. ते एक उत्कृष्ट नेमबाजही होते, त्याचबरोबर ते भारतातील एक प्रख्यात क्रीडा प्रशासकही होते. त्यांनी १९८७ ते २०१२ अशी २५ वर्षे, ‘भारतीय ऑलिम्पिक संघटने’चे महासचिव म्हणून कामकाज पाहिले.
 
"राजा रणधीर सिंग यांच्या निधनामुळे भारतीय क्रीडाविश्वाने, एक सच्चा आधारस्तंभ आणि अत्यंत आदरणीय व्यक्तीमत्त्व गमावले आहे. ऑलिम्पिक चळवळीसाठी आणि भारतातील क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी त्यांचे समर्पण वादातीत आहे,” असे माजी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती सदस्य, माजी भारतीय ऑलिम्पिक संघ, तसेच माजी राष्ट्रमंडल खेल संघ अध्यक्ष असलेल्या डॉ. नरिंदर ध्रुव बत्रा यांनी म्हटले.
 
तसेच, सिंग यांच्या समर्पण भावनेचे कौतुक करताना ’सिंग यांनी त्यांचे वर्तन सदैव कटिबद्धतेने जपले; तसेच खेळाडू आणि क्रीडा प्रशासनाच्या क्षेत्रातील त्यांचे योगदान सदैव कृतज्ञतेने स्मरणात राहील,’ असेही बत्रा म्हणाले. सिंग यांना श्रद्धांजली वाहताना बत्रा म्हणाले की, ’ सिंग यांच्या निधन समयी त्यांचे कुटुंबीय, आप्तजन आणि संपूर्ण क्रीडाविश्वाप्रति मी संवेदना व्यक्त करतो परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती प्रदान करो.”
 
पतियाळाचे माजी महाराजा आणि क्रिकेटपटू भूपिंदर सिंग यांचे वंशज असलेले रणधीर सिंग, हे भारतातील सर्वांत सुप्रसिद्ध क्रीडा प्रशासकांपैकी एक होते. देशात ऑलिम्पिक चळवळीला चालना देण्याचे श्रेय त्यांनाच जाते. त्यांचा नेमबाजीचा वारसा, त्यांची कन्या राजेश्वरी हिने पुढे चालू ठेवला आहे. ट्रॅप नेमबाज असलेल्या राजेश्वरीने २०२२च्या आशियाई खेळांमध्ये, रौप्यपदक आणि २०१६च्या आशियाई अजिंयपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. दुसरीकडे, सुनैना हिने २०१८ मध्ये ‘आयओए’ची उपाध्यक्ष झाल्यावर, क्रीडा प्रशासनात आपले स्थान निर्माण केले. ती ‘आयओए’च्या आंतरराष्ट्रीय संबंध आणि शिक्षण समितीची सदस्यदेखील आहे.
 
‘भारतीय ऑलिम्पिक संघटने’चे त्यावेळचे अध्यक्ष सुरेश कलमाडी आणि त्यावेळचे सरचिटणीस रणधीर सिंग हे अनेक वर्षांपासून, या महत्त्वाच्या पदांवर होते, परंतु त्यांच्यातील समन्वय अपेक्षेप्रमाणे चांगला नव्हता. कलमाडी यांची कार्यशैली अधिक एकाधिकारशाहीची होती. याउलट, रणधीर सिंग हे पारदर्शकतेचे आग्रही होते. त्या दोघांत नेहमीच अहंकाराचा संघर्ष राहिला. दोन्ही अधिकार्‍यांमध्ये कार्यपद्धती आणि आर्थिक व्यवहारांवरूनही कलगीतुरा रंगला होता. दिल्लीला २०१०मध्ये झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची चर्चा झाल्यास, या दोघांचीही आठवण आल्याशिवाय राहणार नाही. एकमेकांच्या परस्परविरोधी भूमिकेमुळे, क्रीडाक्षेत्रात या दोघांमधील शीतयुद्ध नेहमीच चर्चेत राहिले. काहींनी तर त्या दोघांची तक्रार तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडेही केली होती.
 
घराणेशाही बद्दल अनेकदा नकारात्मक पद्धतीने बोलले जाते. परंतु, क्रीडाक्षेत्रात अशीही काही घराणी आहेत की, ज्यांच्याकडे पाहिल्यास क्रीडाक्षेत्रातील सकारात्मक भाव चटकन डोळ्यांत भरतात. मग, ते निष्कलंक पेस घराणे आणि थोडी खुशी-थोडे गम देणारे रणधीर सिंगांचे घराणे असो.
 
घराणेशाही सकारात्मक पद्धतीने चालवल्यास, त्याचे सर्वजण स्वागतच करतात. पुढची पिढी चालवायला पाल्य-पालक यांचे क्रीडाप्रेम असेच राहिले, तर भारताला चांगले क्रीडापटू मिळायला त्याचा फायदाच होईल, हे नक्की.
 
खेळाडूच्या यशात सर्वाधिक योगदान, प्रामुख्याने त्याच्या मातेचे असते. मातृशक्तीचे हे योगदान सर्वांसमोर यावे, या भावनेतूनच क्रीडाक्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणार्‍या खेळाडूंच्या मातांचा गौरव ‘क्रीडा भारती’च्यावतीने दरवर्षी केला जातो. आजच्या आपल्या लेखात आपण लिएंडर पेसच्या आईचे उदाहरण पाहिले. अशा अनेक मातांपैकी, काहींचा सत्कार ‘क्रीडा भारती’ पुणे महानगरतर्फे ‘जिजामाता सन्मान पुरस्कार २०२६’ हा कार्यक्रम आज, सोमवार, दि. १ जून रोजी संध्याकाळी होत आहे. या सोहळ्याच्या आयोजकांना आणि त्या पुरस्काराच्या लाभार्थींना आपण सारे ‘क्रीडाविश्व’दारे मनःपूर्वक शुभेच्छा देऊया. शिवाय, जिजामातेचरणी मागणे मागू की, भारतमातेला असेच पाल्य-पालक समन्वय सदा लाभो.
 
- श्रीपाद पेंडसे