कै. जयंतराव सहस्रबुद्धे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परंपरेतील असे एक संघतपस्वी होते, ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य राष्ट्रकार्यासाठी अर्पण केले. विज्ञान, संस्कृती, संघटनकौशल्य आणि राष्ट्रभक्ती यांचा अद्भुत संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वात पाहायला मिळत होता. संघ प्रचारक म्हणून त्यांनी केलेले कार्य, तसेच ‘विज्ञान भारती’च्या माध्यमातून भारतीय विज्ञानाच्या पुनर्जागरणासाठी केलेले योगदान हे आजही प्रेरणादायी आहे.
जयंतराव सहस्रबुद्धे यांचा जन्म १७ एप्रिल १९६६ रोजी मुंबईतील गिरगाव येथे झाला. त्यांचे वडील श्रीकांत सहस्रबुद्धे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी दीर्घकाळ जोडलेले कार्यकर्ते होय. तर मातोश्री राष्ट्र सेविका समितीच्या सक्रिय कार्यकर्त्या. त्यामुळे राष्ट्रभक्ती, संघनिष्ठा आणि समाजसेवा हे संस्कार जयंतरावांना बालपणापासूनच लाभले.
मुंबई विद्यापीठातून ‘बी.एस्सी. टेक.’ (इलेक्ट्रॉनिक्स) पर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी ‘भाभा अणुसंशोधन केंद्रा’त (बीएआरसी) काही काळ नोकरी केली. मात्र, त्यांचे मन राष्ट्रकार्याकडेच ओढले जात होते. अखेरीस १९८९ मध्ये त्यांनी उज्ज्वल व्यावसायिक कारकीर्द बाजूला ठेवत पूर्णवेळ संघ प्रचारक होण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय केवळ करिअर बदलण्याचा नव्हता, तर संपूर्ण जीवन राष्ट्रकार्यासाठी समर्पित करण्याचा होता.
विद्यार्थीदशेपासूनच जयंतराव संघकार्यामध्ये सक्रिय होते. प्रभात शाखा, महाविद्यालयीन शिक्षण, संध्याकाळच्या बैठका आणि रात्री उशिरापर्यंत भित्तीलेखन व पोस्टर लावण्याचे कार्य अशा अविरत दिनक्रमातून त्यांचे कार्यकर्तेपण घडत गेले. प्रचारक म्हणून त्यांनी महाराष्ट्रातील विविध भागांत कार्य केले.
गोवा विभाग प्रचारक आणि त्यानंतर २००१ ते २००९ या काळात कोकण प्रांत प्रचारक म्हणून त्यांनी प्रभावी नेतृत्व केले. संघाचे ज्येष्ठ प्रचारक हो. वे. शेषाद्री यांचे सचिव म्हणून काम करताना त्यांना संघकार्याचा व्यापक अनुभव प्राप्त झाला. संघटन बांधणी, कार्यकर्ते घडविणे आणि विचारप्रसार यामध्ये त्यांचे विशेष कौशल्य होते.
२००९ मध्ये त्यांच्यावर ‘विज्ञान भारती’च्या राष्ट्रीय संघटन सचिवपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. यानंतर त्यांच्या कार्याचा विस्तार राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर झाला. जयंतरावांनी विज्ञान भारतीला केवळ एक संस्था म्हणून नव्हे, तर भारतीय ज्ञानपरंपरा आणि आधुनिक विज्ञान यांच्यातील सेतू म्हणून विकसित केले. त्यांच्या नेतृत्वाखाली ‘विद्यार्थी विज्ञान मंथन’, ‘टेक फॉर सेवा’, ‘इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिव्हल’, ‘विश्ववेद विज्ञान संमेलन’, ‘भारतीय विज्ञान संमेलन’ यांसारख्या अनेक उपक्रमांना व्यापक स्वरूप प्राप्त झाले. त्यांनी ‘वर्ल्ड आयुर्वेद फाउंडेशन’, ‘जीआयएसटी – ग्लोबल इंडियन सायंटिस्ट अँड टेक्नोक्रॅट फोरम’, ‘न्यासा’, ‘शक्ती’ यांसारख्या उपक्रमांना नवी दिशा दिली. विज्ञान भारतीच्या कार्याला जागतिक स्तरावर नेण्यात त्यांचे योगदान मोलाचे आहे.
जयंतराव हे अत्यंत व्यासंगी वक्ते होते. स्वामी विवेकानंद, भारतीय विज्ञानपरंपरा आणि भारतीय वैज्ञानिकांच्या जीवनकार्यावर त्यांनी असंख्य व्याख्याने दिली. महेंद्रलाल सरकार, आचार्य प्रफुल्लचंद्र राय, आचार्य जगदीशचंद्र बोस, मेघनाद साहा, सर सी. व्ही. रमण यांसारख्या महान वैज्ञानिकांवरील त्यांचे अभ्यासपूर्ण विवेचन श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून टाकत असे. त्यांची संस्कृत भाषेवरील प्रभुत्वदेखील उल्लेखनीय होते. एका कार्यक्रमात त्यांनी संपूर्ण बौद्धिक संस्कृतमधून दिले होते. त्यांचे संस्कृत केवळ शुद्ध आणि अस्खलितच नव्हते, तर सामान्य स्वयंसेवकालाही सहज समजेल असे होते. विद्वत्ता आणि सुलभता यांचा सुंदर मेळ त्यांच्या भाषणांत दिसून येत असे.
जयंतरावांची सर्वात मोठी ताकद म्हणजे कार्यकर्ते घडविण्याची क्षमता. ते केवळ कार्यक्रम उभारणारे नव्हते, तर कार्यक्रम चालविणारे आणि पुढे नेणारे कार्यकर्ते तयार करणारे संघटक होते. ‘शास्त्र प्रतिभा’, ‘सायन्स इंडिया फोरम’च्या माध्यमातून आखाती देशांतील हजारो भारतीय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे असो किंवा 'जीआयएसटी'च्या माध्यमातून अमेरिका, युरोपसह जगभरातील भारतीय वैज्ञानिकांना मातृभूमीशी जोडणे असो, प्रत्येक ठिकाणी त्यांनी सक्षम कार्यकर्त्यांची फळी उभी केली. त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला त्यांच्यातील आत्मीयता, प्रोत्साहन देण्याची वृत्ती आणि मार्गदर्शनाची शैली विशेष भावत असे.
संघटनेत उच्च पदांवर असूनही जयंतराव अत्यंत नम्र आणि सहजस्वभावी होते. ते प्रत्येकाशी आदराने वागत. कार्यकर्त्यांच्या समस्या, कल्पना आणि चिंतेकडे ते गांभीर्याने लक्ष देत. त्यामुळे त्यांच्याभोवती नेहमी आत्मीयतेचे वातावरण निर्माण होत असे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात अधिकारापेक्षा आपलेपणा अधिक जाणवत असे. कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते वरिष्ठ अधिकारी म्हणून नव्हे, तर कुटुंबातील ज्येष्ठ सदस्याप्रमाणे वागत.
‘आझादी का अमृत महोत्सव’च्या निमित्ताने भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील वैज्ञानिकांचे योगदान जनतेसमोर आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केले. स्वातंत्र्य आंदोलनामध्ये भारतीय वैज्ञानिकांनी बजावलेली भूमिका, त्यांचे राष्ट्रनिष्ठ कार्य आणि विज्ञानाच्या माध्यमातून राष्ट्रनिर्मितीचा विचार त्यांनी समाजापर्यंत प्रभावीपणे पोहोचवला. भारतीय विज्ञानाचा इतिहास आणि त्यामागील राष्ट्रभक्तीचा धागा उलगडून दाखविण्यात त्यांचा मोठा वाटा होता.
आयुष्याच्या उत्तरार्धात अपघातामुळे त्यांना शारीरिक त्रास सहन करावा लागला. परंतु राष्ट्रकार्यावरील त्यांची निष्ठा कधीही कमी झाली नाही. प्रकृतीच्या अडचणी असूनही ते अखेरपर्यंत विज्ञान भारतीच्या विविध उपक्रमांना मार्गदर्शन करत राहिले. २ जून २०२३ रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या जाण्याने संघपरिवार, विज्ञान भारती आणि राष्ट्रवादी विचारविश्वाची मोठी हानी झाली.
कै. जयंतराव सहस्रबुद्धे यांचे जीवन हे त्याग, तपस्या, विद्वत्ता आणि संघटनकौशल्य यांचे अद्वितीय उदाहरण आहे. त्यांनी विज्ञानाला राष्ट्रसेवेचे माध्यम बनविले आणि राष्ट्रकार्यासाठी विज्ञानाची शक्ती उभी केली. संघ प्रचारक म्हणून जगलेले त्यांचे आयुष्य हे व्यक्तिगत यशापेक्षा राष्ट्रीय ध्येयाला प्राधान्य देणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी दीपस्तंभ आहे. त्यांनी पद, प्रतिष्ठा किंवा प्रसिद्धी यांचा कधीही विचार केला नाही. राष्ट्रहित, समाजउभारणी आणि कार्यकर्ते घडविणे हेच त्यांच्या जीवनाचे ध्येय राहिले. म्हणूनच कै. जयंतराव सहस्रबुद्धे हे राष्ट्रसेवेला वाहिलेले खरे ‘संघतपस्वी’ होते. त्यांच्या कार्याची प्रेरणा भावी पिढ्यांना सतत राष्ट्रभक्ती, विज्ञाननिष्ठा आणि समर्पणाचा मार्ग दाखवत राहील.