मलवाहिन्यांची कोंडी आता दूर होणार; मुंबई महापालिकेकडून ४ रॉडिंग मशिन खरेदी
01-Jun-2026
Total Views |
मुंबई : (Rodding Machine) मुंबईच्या पश्चिम उपनगरातील मलनिःसारण वाहिन्यांमध्ये (गटार लाईन) वारंवार होणारी कोंडी आणि चोकअपची समस्या दूर करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने आधुनिक पाऊल उचलले आहे. पश्चिम उपनगरातील मलवाहिन्यांची जलद आणि प्रभावी सफाई करण्यासाठी पालिकेच्या मलनिःसारण प्रचालन विभागातर्फे ४ आधुनिक 'लो पॉवर रॉडिंग मशिन' खरेदी केल्या जाणार आहेत. यासाठी पालिकेने ऑनलाईन ई-निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.
पश्चिम उपनगरांमध्ये लोकसंख्येच्या वाढत्या विस्तारामुळे मलवाहिन्या तुंबण्याच्या आणि दूषित पाणी रस्त्यावर येण्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. पारंपरिक पद्धतीने ही कोंडी फोडण्यात अनेक अडचणी येतात, तसेच मनुष्यबळाचा वापर करताना सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. ही समस्या तातडीने आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सोडवण्यासाठी महापालिका या नव्या मशिनचा वापर करणार आहे. या मशिनमुळे मलवाहिन्यांमधील कचरा आणि साचलेली घाण अंतर्गत भागातूनच यशस्वीरीत्या उपसणे शक्य होणार आहे.
महापालिका प्रशासनाने निश्चित केलेल्या अटींनुसार, हे कंत्राट मिळणाऱ्या कंपनीला कार्यारंभ आदेश (वर्क ऑर्डर) मिळाल्यापासून पावसाळी कालावधीसह २ महिन्यांच्या आत या चारही मशिनचा पुरवठा करावा लागणार आहे. हा संपूर्ण प्रकल्प 'आयटम रेट कंत्राट' तत्त्वावर राबवला जात असून, यासाठी इच्छुक कंत्राटदारांना ३९ हजार ४०० रुपये बयाणा रक्कम जमा करावी लागेल.
या निविदेत सहभागी होणाऱ्या कंत्राटदारांची मुंबई महापालिकेत यांत्रिक किंवा विद्युत श्रेणीत 'वर्ग ब' किंवा त्यापेक्षा वरील वर्गात नोंदणी असणे आवश्यक आहे. ही संपूर्ण निविदा प्रक्रिया 'थ्री पॅकेट सिस्टम'द्वारे ऑनलाईन पद्धतीने राबवली जात असून २५ मे पासून निविदा विक्री सुरू झाली आहे. इच्छुकांना १५ जून २०२६ रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत 'महाटेंडर्स' या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करता येतील. त्यानंतर १७ जून रोजी तांत्रिक तर २४ जून रोजी आर्थिक निविदा उघडली जाईल.
रॉडिंग मशीन हे भूमिगत मलनिःसारण वाहिन्या आणि पाईप्समधील अडथळे किंवा चोकअप दूर करण्यासाठी वापरले जाणारे एक आधुनिक यांत्रिक उपकरण आहे.जेव्हा नाल्यांमध्ये किंवा सांडपाण्याच्या पाईप्समध्ये कचरा, प्लास्टिक, गाळ, झाडांची मुळे किंवा इतर वस्तू अडकून पाण्याचा प्रवाह थांबतो, तेव्हा ही कोंडी फोडण्यासाठी या मशीनचा प्रामुख्याने वापर केला जातो.(Rodding Machine)