महापौरांनी नालेसफाईच्या अंतिम टप्प्यातील कामांची केली पाहणी

    01-Jun-2026
Total Views |
Ritu Tawde
 
मुंबई: (Ritu Tawde) आगामी पावसाच्या पार्श्वभूमीवर महापौर रितू तावडे यांनी परिमंडळ-५ मधील विविध नाले आणि पर्जन्यजल निचरा व्यवस्थेची पाहणी करून अधिकाऱ्यांना गाळ काढणे आणि नालेसफाईची कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
 
तसेच नाल्यातून गाळ काढण्याचे काम ८०% पूर्ण झाल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिली.
 
महापौर (Ritu Tawde) म्हणाल्या की, ज्या भागांमध्ये पावसाळ्यात पाणी साचण्याची शक्यता असते, त्या ठिकाणी विशेष लक्ष द्यावे आणि डी-वॉटरिंग पंप पूर्ण क्षमतेने सज्ज ठेवावेत, जेणेकरून नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. त्यांनी घाटकोपर, गोवंडी, चेंबूर आणि वाशी नाका परिसरातील अनेक प्रमुख नाल्यांना भेट देऊन स्वच्छता कामांचा आढावा घेतला.
 
पाहणीदरम्यान नाल्यांमधील तरंगता कचरा अडवण्यासाठी बसविण्यात आलेल्या ट्रॅश बूम, कन्व्हेयर बेल्ट आणि इतर उपकरणांच्या कार्यपद्धतीचीही माहिती त्यांनी घेतली. मुंबईतील मोठे आणि लहान नाले यांमधून गाळ काढण्याचे काम वेगाने सुरू असून पावसाच्या निर्धारित उद्दिष्टाचा बहुतांश भाग पूर्ण झाला असल्याचे त्यांनी सांगितले. पावसाळा सुरू झाल्यानंतरही ही कामे सुरूच राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
 
हेही वाचा :  राज्य कसे केले पाहिजे याचा आदर्श अहिल्यादेवी होळकर यांनी ठेवला - देवेंद्र फडणवीस; पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिवादन
 
परिमंडळ-५ मध्ये कंत्राटदार बदलल्यामुळे काही कामांना विलंब झाला होता. मात्र, नव्या कंत्राटदाराची नियुक्ती झाल्यानंतर कामांना वेग आला आहे. आवश्यकतेनुसार अतिरिक्त मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री तैनात करण्याचे निर्देशही महापौरांनी दिले.
 
भूमिगत नाल्यांची नियमित स्वच्छता, रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर, नाल्यांवर संरक्षक भिंती उभारणे आणि पर्जन्यजल निचरा व्यवस्था अधिक सक्षम करण्यावर त्यांनी भर दिला.
 
  तसेच नागरिकांनी स्वच्छ केलेल्या नाल्यांमध्ये कचरा किंवा मलबा टाकू नये आणि शहर जलभरावमुक्त ठेवण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही महापौरांनी केले.(Ritu Tawde)