नाटोक ना चॉलबे!

    01-Jun-2026
Total Views |
Politics, Religion and National Security
 
तृणमूल काँग्रेसचे युवराज मानले जाणारे अभिषेक बॅनर्जी यांना सोनपूर दौर्‍यात संतप्त जमावाच्या रोषाला सामोरे जावे लागले. त्यांना मारहाण झाली. ‘चोर, चोर ’अशा घोषणाही जमावाने दिल्या. अखेर, पोलिसांनी हेल्मेट घालून अभिषेक यांना सुरक्षित बाहेर काढले. या घटनेनंतर तृणमूल काँग्रेसने लगेच भाजपकडे बोट दाखवत, लोकशाही धोयात आल्याचा टाहो फोडण्यास सुरुवात केली. राजकारणात अनेकदा घटनांपेक्षाही, त्यानंतर घडणार्‍या प्रतिक्रियाच अधिक बोलक्या असतात. सोनपूरच्या घटनेबाबतही नेमके तेच दिसत आहे. अभिषेक यांच्यावर हल्ला होताच, भाजपला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्याची जी घाई तृणमूलने दाखवली, तीच संशय निर्माण करणारी ठरली. ममतादीदींनी ज्या पद्धतीने माध्यमांसमोर येऊन, अभिषेकला झालेल्या दुखापतीचे वर्णन केले, त्यावरून ही दुखापत मोठी असल्याचेच भासले. मात्र, अल्पावधीतच अभिषेकला झालेली दुखापत, किरकोळ असल्याचे समोर आल्याने ममता दीदींनाही त्यांच्या कांगाव्याचा सूर बदलावा लागला. तसेच, या प्रकरणाच्या पुढच्या तपासामध्ये चक्क अटक झालेल्या काही व्यक्ती, तृणमूलशीच संबंधित असल्याचेही समोर आले. यामुळे तृणमूलने उभे केलेले संपूर्ण कथानकच, संशयाच्या भोवर्‍यात सापडले.
 
राजकारणात सहानुभूती हे अत्यंत प्रभावी शस्त्र असते. विशेषतः जेव्हा एखाद्या पक्षासमोर भ्रष्टाचार, प्रशासनातील अपयश किंवा जनतेतील नाराजीसारखी आव्हाने उभी असतात, तेव्हा राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू बदलण्याचा मोह निर्माण होतो. सध्याची तृणमूलची अवस्था पाहता, त्यांना अशाच नाटकांची गरज असल्याचे जाणवते. यातील सर्वांत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तृणमूलची राजकीय विश्वासार्हता! या घटनेनंतरही अपेक्षित परिणाम तृणमूलला साध्य झालेले नाहीत. या हल्ल्यानंतर जनतेची स्वाभाविक प्रतिक्रिया ‘कर्माचे फळ’ अशीच होती. यातूनच जनतेतील रोष लक्षात येतो. १५ वर्षे जनसेवेची उत्तम संधी मिळाल्यावरही, सहानुभूतीवर जगण्याची वेळ का यावी, हाच खरा प्रश्न आहे. ममता दीदी आणि नौटंकी यांचा संबंध तसा जुनाच. त्यात दुखापत झाल्याचे बहाणे त्यांनी कित्येक निवडणुकांमध्येही केले आहेत. अभिषेक यांनी त्याचीच री ओढण्याचा प्रयत्नही केला. मात्र, त्यांचा हा प्रयोग पूर्णपणे फसला आहे.
 
अवैधतेसाठी दहशतीचा आधार
 
मुंबईतील गरीब नगर येथील अतिक्रमणविरोधी कारवाईचा बदला घेण्यासाठी, मुंबईवर मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट रचला जात होता, अशी माहिती दिल्ली पोलिसांच्या तपासातून समोर आली. या कटात मुंबई पोलीस, सुरक्षा यंत्रणा आणि शहरातील गर्दीची व संवेदनशील ठिकाणे लक्ष्य करण्यात येणार होती. त्यामागे ‘आयएसआय’ आणि विदेशी सूत्रधारांचा हात असल्याचा संशयही व्यक्त होत आहे. या प्रकरणाने, आपल्या समाजासमोर एक अत्यंत अस्वस्थ करणारा प्रश्न उभा केला आहे. तो प्रश्न म्हणजे, एखाद्या अवैध गोष्टीला हक्क समजण्याची मानसिकता निर्माण झालीच कशी? कायद्याने अतिक्रमण चुकीचेच आहे. तरीही अशी कारवाई झाली की, अनेकजण तथाकथित मानवतेचे गळे काढण्यास सुरुवात करतात. अचानक त्यांना कायदाच शत्रू वाटू लागतो. त्यामुळे, अवैध काम करणार्‍यांना सहानुभूती मिळते. याच सहानुभूतीतून, होणारी कारवाई अन्याय असल्याची भावना बळावते. पण, कारवाई होतेवेळी मानवतेच्या गप्पा झोडणारे, असा हल्ल्याचा कट उघडकीस होतो, तेव्हा कोणत्यातरी बिळात लपून बसतात.
 
गरीब नगर कारवाईदरम्यान समाजमाध्यमांवर फिरलेले काही व्हिडिओ झोप उडवणारे होते. त्यात अगदी कोवळ्या वयातील मुलेही आवेशाने धमक्या देताना दिसली. ‘हे करू, ते करू, बघून घेऊ’ अशा भाषेतील धमक्या देण्यात आल्या. असे संस्कार जर रुजवले जात असतील, तर तो शहराच्या सुरक्षेचाच प्रश्न होतो. मुंबईतील झोपडपट्टी हे एक भयाण वास्तव आहे. अनेक कुटुंबांचा जगण्याचा संघर्ष त्याच्याशी जोडला गेला आहे. मात्र, जगण्याचा प्रश्न आणि अतिक्रमणाचे समर्थन या दोन वेगळ्या गोष्टी ठरतात. दुर्दैवाने अनेक वर्षांच्या राजकीय लांगूलचालनाने दोन्हींची सरमिसळ केली. परिणामी, अतिक्रमण हा नैसर्गिक अधिकार झाला. या झोपडपट्यांमध्ये नेमके काय सुरू आहे, याचा अदमान शहरातील कोणालाच फार नसतो. मुंबईतील झोपडपट्टीच्या विस्ताराचा विचार केल्यास, गरीब नगरची झोपडपट्टी हिमनगाचे टोक ठरावी. मतभेद असू शकतात, संताप असू शकतो; पण त्यासाठी मुंबईसारख्या शहराला रक्ताने न्हाऊ घालण्याचा कट रचला जात असेल, तर तो केवळ गुन्हा नाही, तर सभ्य समाजाविरुद्धचे युद्ध आहे. त्यामुळे, हे युद्ध लढताना किमान या धमकीनंतर तरी समाजाने एकदिलाने लढणे आवश्यक आहे.
 
- कौस्तुभ वीरकर