विधान परिषदेच्या उमेदवारीवरुन पुण्यात राष्ट्रवादीत गोंधळ, रायगड आणि संभाजीनगरमध्ये शिवसेनेतही बंडखोरी?

    01-Jun-2026
Total Views |
Political Developments in Pune
 
पुणे : (Political Developments in Pune) पुणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी गोँधळ पाहायला मिळाला. माजी खासदार संजय काकडे आणि त्यांचे पुत्र विक्रम काकडे यांनी काही तासांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. जिजाी बंगल्यावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या प्रवेशानंतर विक्रम काकडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 
 
तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते आणि दिवंगत अजित पवार यांचे निकटवर्तीय असलेले सुनील टिंगरे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या दोन्ही नेत्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राष्ट्रवादीचा नेमका उमेदवार कोण, यावरुन गोंधळ निर्माण झाला आहे. विक्रम काकडे हे पार्थ पवार यांचे नीकटवर्तीय मानले जातात. राष्ट्रवादीत दीपक मानकर, विलास लांडे, सुनील टिंगरे यांच्यासारखे अनुभवी उमेदवारीसाठी इच्छुक असताना विक्रम काकडे यांना पक्षात प्रवेश देत त्यांना उमेदवारी दिल्याने पक्षातील निष्ठावंत नाराज असल्याची चर्चा आहे.
 
 
या निर्णायनंतर काही नाराज पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे राजीनामे सोपवल्याचा दावाही करण्यात येतो आहे. या दोन्ही नेत्यांना एबीफॉर्म दिल्याचेही सांगण्यात येते आहे. आता उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी कोण उमेदवारी मागे घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
 
 
 
शिवसेनेतही बंडखोरीची चिन्हे
 
विधान परिषदेच्या ६ जागांसाठी आग्रही असलेल्य़ा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला चार जागांवर समाधान मागावे लागले आहे. यात ठाण्यातून रविंद्र फाटक, नाशिकमधून नरेंद्र दराडे, परभणी-हिंगोली मतदारसंघातून सईद खान आणि यवतमाळमध्ये दुष्यंत चतुर्वेदी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. परभणी-हिंगोली मतदारसंघात माजी आमदार विप्लव बजोरिया हे इच्छुक असताना अल्पसंख्याक आघाडीच्या प्रदेशाध्यक्षांना उमेदवारी दिल्याने राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे.
 
 
 
तर रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून महेंद्र दळवी यांच्या कन्या जुईली दळवी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आली असून सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अर्ज दाखल करताना भाजपा नेते आणि मंत्री नितेश राणे, शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत हे उपस्थित होते.
 
महेंद्र दळवी यांनी भरलेला फॉर्म हा त्यांचा वैयक्तिक निर्णय असल्याचे सांगत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करण्यात येतील, असे सामंत यांनी सांगितले आहे. दुसरीकडे संभाजीनगर मतदारसंघातही सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर सत्तार यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शिंदे शिवसेनेतील ही बंडखोरी मानण्यात येते आहे. (Political Developments in Pune)