खरं तर प्रत्येकाचंच बालपण अशा अनेक उन्हाळी कोणत्या ना कोणत्या झाडाच्या सावलीत वेगवेगळे खेळ खेळून गेले असेल. यातील आठवणीतले झाड म्हणजे विलायती चिंच. याच झाडाविषयी माहिती देणारा हा लेख...
घराच्या अंगणात एखादे विलायती चिंचेचे झाड असणे म्हणजे सुख! वनस्पती शास्त्रीयदृष्ट्या Pithecellobiumdulce म्हणून ओळखली जाणारी ही वनस्पती मूलतः उष्णकटिबंधीय अमेरिकेतील! तिचा नैसर्गिक प्रसार मध्य अमेरिकेतून उत्तरेकडील दक्षिण अमेरिकेपर्यंत विशेषतः कोलंबिया, व्हेनेझुएला, ब्राझील आणि पेरू या देशांमध्ये आढळतो. अत्यंत अनुकूलनक्षम असल्यामुळे जगातील अनेक उष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये तिचा प्रसार झाला. वसाहतकालीन काळात स्पॅनिश आणि पोर्तुगीज व्यापार्यांनी तिची ओळख आग्नेय आशिया आणि भारतामध्ये करून दिली. त्यानंतर ही वनस्पती भारतासह अनेक देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली आणि स्थानिक परिसंस्थांमध्ये नैसर्गिकरित्या रुजली. हे झाड काटेदार, हिरवेगार अन् तितकेच डौलदार असते.
मूलतः तीन जाडसर खोडांच्या साथीने वाढलेल्या शाखांच्या कमी-अधिक बांधणीत पानापानांत फळं लपवणारं हे झाड आहे. पानाच्या बाबतीत सांगायचे झाल्यास, तळाशी साधारणपणे लहान, तीक्ष्ण काट्यांची एक जोडी आढळते. तरी, काही झाडांमध्ये काटे नसतात. पाने पानझडी स्वरूपाची असली, तरी नवीन पाने जुनी पाने गळत असतानाच येत असल्यामुळे हे झाड वर्षभर हिरवेगार दिसते. सदाहरित असल्याचा भास निर्माण करते.
फुले लहान, गोलाकार गुच्छांमध्ये (ग्लोमेर्यूल्स) येतात. प्रत्येक फुलोरा सुमारे एक सेंमी व्यासाचा असून पाच ते ३० सेंमी लांबीच्या लहान अक्षीय मंजिर्यांमध्ये (axillary panicles) फुले येतात. फुले पांढरट-हिरव्या रंगाची, किंचित सुगंधी आणि १.० ते १.५ मिमी व्यासाची असतात. फुलांमध्ये केसाळ पुष्पमुकुट (corolla), सुमारे ५० बारिक केसरदले (stamens) असून ती तळाशी नळीसारखी जोडलेली असतात. या केसरदलांभोवती हिरव्या रंगाचा दलपुंज (calyx) असतो.
मार्च महिना सुरू झाला की, पिवळसर मोहरात हे झाड न्हाऊन निघते. चिंचा धरू लागल्या की पोपट, चिमण्या, मैना अशा पाखरांची सकाळ-संध्याकाळ या झाडावर शाळा भरते. घुबड, धनेश हेदेखील या झाडावर दिसतात. भुंगे आणि मधमाश्यांच्या भुणभुण गीतांनी हे झाड मंत्रमुग्ध होते. खारुताईदेखील चिंचेतला एकेक गर खात असते.
वनस्पतीच्या औषधी उपयोगाबद्दल माहिती घेत असताना लक्षात आलं, प्राचीन आयुर्वेदिक ग्रंथ जसे की ‘चरक संहिता’ आणि ‘सुश्रुत संहिता’ यांमध्ये ठळकपणे आढळत नाही, तरी दक्षिण भारतातील काही प्रादेशिक आयुर्वेदिक हस्तलिखितांमध्ये ‘शमी पत्र’ नावाच्या वनस्पतीचा उल्लेख आढळतो, ज्याचे वर्णन विलायती चिंचेशी बर्याच अंशी जुळते. १६व्या शतकातील काही मल्याळी आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये या वनस्पतीचा वातविकारांवरील साहाय्यक औषध (adjuvant) म्हणून उल्लेख आढळतो. तसेच संधिवातामुळे सूज आल्यास त्यावर उपचार करण्यासाठी ताजी साल नारळाच्या पाण्यात वाटून तयार केलेला लेप वापरल्याचे वर्णनही आढळते. गुजरातमधील ग्रामीण पारंपरिक वैद्यकीय पद्धतींमध्ये विलायती चिंचेच्या शेंगेतील गराचा उपयोग खोकल्यावरील घरगुती उपाय म्हणून केला जात असे.
गावकरी किंचित तुरट चवीचा हा गर थोड्या सैंधव मिठासह चघळत असत, ज्यामुळे घशातील खवखव आणि वेदना कमी होण्यास मदत होत असे. मेसिकोमध्ये, जिथे ही वनस्पती स्पॅनिश व्यापार्यांमार्फत १७व्या शतकात पोहोचली, तेथील स्थानिक आदिवासी समाजांनी तिला अतिसारावरील आपत्कालीन औषध म्हणून स्वीकारले. झाडाच्या सालीचा काढा मातीच्या भांड्यात तयार करून पिण्याची प्रथा तेथे रूढ झाली. काळाच्या ओघात या वनस्पतीची औषधी कीर्ती फिलीपिन्सपर्यंत पोहोचली. आजही तेथील काही लोकवैद्य पोटदुखी आणि पचनसंस्थेच्या किरकोळ तक्रारींवर शेंगेच्या अर्काचा वापर करतात. १९व्या शतकातील मिशनरी नोंदींमध्ये जेसुइट धर्मप्रचारकांनी टागालोग समुदायामध्ये या फळाचा खाद्यपदार्थ, तसेच औषधी वनस्पती म्हणून होणारा वापर नोंदवून ठेवला आहे. २०व्या शतकात आयुर्वेदिक विद्यापीठांनी या वनस्पतीच्या प्रतिजैविक (antimicrobial) गुणधर्मांवर प्राथमिक संशोधन सुरू केले. जरी हळद किंवा अश्वगंधा यांसारखी व्यापक लोकप्रियता तिला मिळाली नाही, तरीही लोकवैद्य, आदिवासी उपचारक आणि एथ्नोबॉटनिस्ट यांच्या परंपरेत तिचे स्थान कायम राहिले आहे.
आज परिस्थिती फार वेगळी आहे. झाड तर आहे, पण त्याच्या सावलीत खेळणारी मुले आता राहिली नाहीत. आनंदाने मित्रामित्रांच्या वाट्याला येणारी ही चिंच आता केवळ झाडापुरतीच मर्यादित राहिली. आपल्या देशी आंबट चिंचेसारखी या चिंचेची चव आंबट नाही. मात्र, बियांच्या आकारामध्ये काहीसं साम्य यात बघायला मिळतं. फळाच्या परिपक्वतेवर त्या चिंचेची चव बदलत असते. सुरुवातीला हिरवट असणार्या चिंचेला काहीच चव नसते. मात्र, लालसर झाल्यावर ती खूप गोड लागते. या चिंचेची एकेक शेंग वेगवेगळ्या रंगांच्या छटात न्याहाळताना मी पाहिली आहे. कधी हिरव्या रंगातून पिवळसर रंगात डुंबताना, तर कधी पिवळट जांभळी रंगातून गडद लाल होतात. फार वेगळेपण घेऊन जन्मास येणारी ही चिंच फार विचार करायला लावणारी.
- परेश गुरव