“सत्तेसाठी राऊत यांनी मोदी आणि बाळासाहेबांचा विचार सोडला” – नवनाथ बन

    01-Jun-2026
Total Views |
Navnath Ban
 
मुंबई : (Navnath Ban) भाजप प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी संजय राऊत यांच्या भाजप प्रवेशासंदर्भातील वक्तव्यावर जोरदार टीका केली. "२०१४ ते २०१९ या काळात संजय राऊत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सातत्याने कौतुक करत होते. राऊत यांना विस्मरणाचा आजार झाला आहे.मुख्यमंत्रीपदाच्या राजकारणासाठी त्यांनी मोदींचा आणि बाळासाहेब ठाकरे यांचा विचार सोडला आहे." असा आरोपही बन यांनी सोमवार दि.१ रोजी केला.
 
भारतीय जनता पक्षात इतर पक्षांतून आलेल्या नेत्यांबाबतच्या प्रश्नावर नवनाथ बन यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली." देशहित आणि राष्ट्र प्रथमचा विचार स्वीकारणाऱ्या प्रत्येकाचे भाजपमध्ये स्वागत असून उद्या संजय राऊत यांनीही हा विचार स्वीकारला तर त्यांचे स्वागत करण्यात येईल."असे बन म्हणाले.
 
"संजय राऊत हे काँग्रेस आणि गांधी परिवाराची स्तुती करण्याचे काम करत असून राहुल गांधी, सोनिया गांधी, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या कामांचे गुणगान गाणे हाच राऊत यांचा कार्यक्रम झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चांगल्या निर्णयांचे स्वागत करण्याऐवजी गांधी परिवाराचे राजकारण पुढे नेण्याचे काम राऊत करत आहेत." अशी टीका बन यांनी केली.
 
 
उमेदवारी आणि निष्ठावंतांच्या प्रश्नावर नवनाथ बन यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली." शिवसेनेवर टीका करणारे राऊतच नंतर पक्षात आले, त्यामुळे त्यांनी निष्ठेचे धडे देऊ नयेत. भाजप विचार स्वीकारणाऱ्यांना संधी देतो, अरुण लखानी, अमर राजूरकर आणि बसवराज पाटील ही त्यांची उदाहरणे आहेत."असे बन म्हणाले.
 
संजय राऊत यांचे प्रबोधन करण्याइतके आपण मोठे नसल्याचे सांगतानाच नवनाथ बन (Navnath Ban) यांनी त्यांना रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतील प्रशिक्षण शिबिरात सहभागी होण्याचे निमंत्रण दिले. २०१९ पूर्वी हिंदुत्व आणि राष्ट्रभक्तीवर भाषण करणाऱ्या राऊतांना त्या भूमिका पुन्हा आठवण्याची गरज असल्याचे बन यांनी म्हटले.
 
लाडकी बहीण योजनेबाबत उपस्थित करण्यात येणाऱ्या प्रश्नांवर नवनाथ बन यांनी काँग्रेस आणि महाविकास आघाडीवर टीका करताना बन म्हणाले की,"योजना बंद करण्यासाठी न्यायालयात धाव घेणारेच आज योजनेवर प्रश्न उपस्थित करत आहेत. अपात्र लाभार्थींवर कारवाई होईल, मात्र पात्र महिलांचे लाभ सुरूच राहतील."(Navnath Ban)