मेघनाची शब्दयात्रा

Total Views |
Meghna
 
वयाच्या अवघ्या १९व्या वर्षी स्वतः च्या भावनिक संघर्षाला प्रेरणेचे रूप देत, या संघर्षाचे पुस्तक करणार्‍या डोंबिवलीतील युवा लेखिका मेघना शरद शेलारविषयी...
 
वयाच्या १९व्या वर्षी अनेक तरुण-तरुणी, करिअरच्या वाटा शोधत असतात. काहीजण स्वप्नं पाहातात, तर काही त्या स्वप्नसिद्धीसाठी पावले टाकतात. डोंबिवलीतील मेघना शरद शेलार स्वप्न पाहिलेच नाही, तर ते सत्यातही उतरवून दाखवले. स्वतःच्या आयुष्यातील संघर्ष, एकाकीपणा आणि भावनिक प्रवासाला शब्दबद्ध करत तिने ‘कम हील विथ मी’ हे पुस्तक लिहिले, आणि एक युवा लेखिका म्हणून स्वतःची वेगळीच ओळखही निर्माण केली.
 
भूगोल या विषयात पदवीचे शिक्षण घेत असलेल्या मेघनाने, ‘तत्त्वज्ञान’ हा विषयदेखील प्रामुख्याने अभ्यासासाठी निवडला आहे. शिक्षणासोबतच लेखनाची आवड जोपासणार्‍या मेघनाचा प्रवास, अनेक तरुणांसाठी प्रेरणादायीच ठरतो. विशेष म्हणजे, तिच्या कुटुंबात यापूर्वी कोणीही लेखक किंवा साहित्यिक नव्हते. त्यामुळे पुस्तक प्रकाशित करणारी, कुटुंबातील ती पहिलीच व्यक्ती ठरली.
 
मेघनाचे बालपण आणि शिक्षण डोंबिवलीतच झाले. तिचे वडील ‘केडीएमसी’मध्ये कार्यरत आहेत, तर आई गृहिणी. सामान्य कुटुंबात वाढलेल्या मेघनाला, लहानपणापासूनच वाचन आणि लेखनाची आवड. शाळेत इंग्रजी, मराठी किंवा हिंदीच्या पुस्तकांमध्ये लेखकांची नावे पाहताना ती विचार करत असे की, एक दिवस माझेही नाव एखाद्या पुस्तकावर लेखक म्हणून झळकेल. त्यावेळी ते केवळ एक स्वप्नच होते; परंतु आज ते वास्तव आहे.
 
मेघनाच्या आयुष्यातील सर्वांत महत्त्वाचा टप्पा म्हणजे, तिने अनुभवलेला एकाकीपणाचा काळ. काही वर्षांपूर्वी ती जवळपास तीन महिने, एकटेपणाचा सामना करत होती. त्या काळात तिच्या मनात भावनांचा कल्लोळ होत असे. अनेकदा माणूस बाहेरून हसताना दिसला, तरी आतमध्ये तो तसा असेलच, असे नाही. मेघनालाही अशाच भावनिक संघर्षाचा सामना करावा लागला. मात्र, तिने या वेदनेला शरण न जाता, तिला शब्दांचे रूप दिले.
 
लेखनाची आवड उपजत असल्याने, तिला नियमित रोजनिशी लिहिण्याची सवय होती. तिचे आयुष्यातील अनुभव, भावना, संघर्ष आणि त्यातून बाहेर पडण्याच्या प्रवासाबाबत, ती रोजनिशीमध्ये लिहित असे. डिसेंबर २०२४ मध्ये अभ्यासाची खोली आवरताना, तिच्या हाती ही जुनी रोजनिशी लागली. सहज म्हणून ती वाचायला सुरुवात केल्यावर, तिच्या मनात एक विचार चमकला की, "मी माझ्या या भावनांचे शब्दांकन का करू नये? पुस्तक का लिहू नये?” हाच एक विचार तिच्या आयुष्याला नवी दिशा देणारा ठरला.
 
रोजनिशीतील अनुभव, जीवनाने शिकवलेले धडे आणि भावनिक संघर्षावर मात करण्याचे मार्ग, तिने मांडण्यास सुरुवात केली. काही महिन्यांच्या मेहनतीनंतर, तिचे ‘कम हील विथ मी’ हे पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकामागील तिचा हेतू अतिशय स्पष्ट आणि संवेदनशील आहे. मेघना सांगते की, "हे पुस्तक मी अशा व्यक्तींसाठी लिहिले आहे, जे आज नैराश्य, चिंता किंवा एकाकीपणाचा सामना करत आहेत.” तुम्ही या प्रवासात एकटे नसून, हा संदेशच ती या पुस्तकातून वाचकांपर्यंत पोहोचवू इच्छिते. तिने स्वतःच्या जखमा भरून काढण्यासाठी, शब्दांचा आधार घेतला. आता त्याच शब्दांच्या माध्यमातून, इतरांनाही सावरण्याचा प्रयत्न करत आहे.
 
त्या कठीण काळात तिची रोजनिशी, आई-वडील आणि एकविरा आईवरील श्रद्धा हेच तिचे खरे आधारस्तंभ ठरल्याचे ती सांगते. त्यांच्यामुळेच ती मानसिकदृष्ट्या सावरली आणि नव्या आत्मविश्वासाने उभीही राहिली. त्या काळात घेतलेला प्रत्येक सकारात्मक निर्णय, तिने आपल्या पुस्तकात नमूद केला आहे. लेखिका म्हणून अधिकृतपणे प्रकाशित झालेले हे तिचे पहिलेच पुस्तक असले, तरी लेखन तिच्यासाठी नवीन नाही. कविता, शायरी, जर्नल लेखन आणि रोजनिशी लिहिणे हेच तिचे छंद! या लेखनप्रवासातूनच एका पुस्तकाचा जन्म झाला आहे.
 
आज समाजमाध्यमांतूनही ती आपल्या पुस्तकाचा संदेश, अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवत आहे. पुस्तकातील प्रेरणादायी आणि विचार करायला लावणार्‍या ओळी, ती रील्सच्या माध्यमातून नियमितपणे शेअर करते. तिचा उद्देश केवळ पुस्तक विकणे हा नसून, लोकांशी भावनिक स्तरावर जोडले जाणे हा आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात नैराश्य, मानसिक तणाव अनुभवणार्‍या व्यक्तींना आधार देण्याचा, हा एक छोटासा प्रयत्न असल्याचे मेघना सांगते.




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.