भारतीय आत्मनिर्भरतेचा जागतिक डंका

    01-Jun-2026
Total Views |


India
 
‘मेक इन इंडिया’ने जागतिक स्तरावर भारताचा दबदबा निर्माण केला असून, देशाची निर्यात २४.४० टक्क्यांनी वाढली आहे. आर्मेनियाच्या लष्करी संचलनात ‘आकाश’ आणि ‘पिनाक’ सारख्या स्वदेशी शस्त्रास्त्रांचे झालेले दर्शन, भारताच्या आर्थिक महासत्तेकडे होत असलेल्या वाटचालीची साक्ष देते. हा वाढता प्रभाव आत्मनिर्भर आणि शक्तिशाली भारताचा जागतिक विजय आहे.
 
गेल्या काही वर्षांपासून भारताने ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘मेक इन इंडिया’ या दोन महत्त्वाकांक्षी संकल्पनांच्या आधारे, आपली जागतिक रणनीती अतिशय आक्रमकपणे आखली आहे. आज या धोरणांची गोमटी फळे पाहायला मिळत आहेत. भारत आजवर शस्त्रास्त्रांसाठी विदेशांवर, प्रामुख्याने रशिया, युरोप आणि अमेरिकेवर अवलंबून होता. भारताची ओळख जगात ‘सर्वाधिक शस्त्रे आयात करणारा देश’ अशीच होती. मात्र, आज चित्र पूर्णपणे पालटले असून, आजचा नवा भारत जगातील अनेक देशांसाठी एक विश्वासार्ह, तंत्रज्ञानयुक्त आणि सक्षम शस्त्रास्त्र पुरवठादार म्हणून उदयास आला आहे. भारताची अर्थव्यवस्था आणि संरक्षण क्षेत्र या दोन्ही आघाड्यांवर, देशाने मिळवलेले यश हे ऐतिहासिकच आहे.
 
भारतीय अर्थव्यवस्थेने जागतिक निर्यातीच्या क्षेत्रात ऐतिहासिक झेप घेतली. ताज्या आकडेवारीनुसार, भारताच्या निर्यातीत तब्बल २४.४० टक्क्यांची लक्षणीय वाढ नोंदवली गेली. देशाची एकूण निर्यात ४.०७ लाख कोटींच्या घरात पोहोचली असून, एका वर्षात भारतीय निर्यातीमध्ये ८० हजार कोटी रुपयांची वाढ झाली. इंजिनिअरिंग, फार्मास्युटिकल्स, इलेट्रॉनिक वस्तू, मोबाईल फोन्स आणि रसायने यांसारख्या क्षेत्रांमध्ये, भारताने जागतिक पुरवठा साखळीत आपले भक्कम स्थान निर्माण केले आहे. अमेरिका किंवा युरोपसारख्या पारंपरिक बाजारपेठांपुरतीच ही मागणी मर्यादित नसून, आशियाई देशांच्या बाजारपेठांमध्ये भारतीय उत्पादनांची मागणी वाढली आहे. महामारीनंतर बहुराष्ट्रीय कंपन्यांनी ‘चायना प्लस वन’ हे जे जागतिक धोरण स्वीकारले, त्याचा सर्वाधिक फायदा भारताने घेतला.
 
आर्थिक आघाडीवरील यशासोबतच भारताने संरक्षण क्षेत्रात घेतलेली गरुडझेप, अभिमानास्पद अशीच. आर्मेनिया या युरेशियन देशात राष्ट्रीय दिनानिमित्त एका लष्करी संचलनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये भारताच्या ‘मेक इन इंडिया’ शस्त्रास्त्रांचे झालेले प्रदर्शन, जगाचे डोळे दीपवणारे ठरले. या परेडमध्ये भारताची संपूर्णपणे स्वदेशी निर्मिती असलेली ‘आकाश’ ही हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणाली आणि ‘पिनाक मल्टी-बॅरल रॉकेट लॉन्चर’सारख्या, अत्यंत प्रगत शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन करण्यात आले.
 
एका सार्वभौम देशाच्या राष्ट्रीय लष्करी संचलनात भारताच्या शस्त्रास्त्रांना असे मानाचे स्थान मिळणे, हे भारतीय उत्पादनाच्या जागतिक यशाला मिळालेली पोचपावतीच ठरते. कारगिल युद्धात ज्या देशाने बाहेरील देशांकडे शस्त्रास्त्रांसाठी हात पसरले होते. तोच देश आज आधुनिक युद्धतंत्रातील संहारक शस्त्रे जगाला विकत आहे, हा प्रवास खरोखरच थक्क करणारा असाच.
 
आर्मेनियाला केलेल्या शस्त्रनिर्यातीमागे, भारताची एक अत्यंत सुस्पष्ट, प्रगल्भ आणि आक्रमक नीती आहे. आर्मेनिया आणि अझरबैजान यांच्यातील लष्करी संघर्ष सर्वश्रुत आहे. या संघर्षात अझरबैजानला तुर्की आणि पाकिस्तान या दोन्ही भारतद्वेष्ट्या देशांचा उघड पाठिंबा आहे. तुर्की, अझरबैजान आणि पाकिस्तान या देशांनी मिळून एक अघोषित इस्लामिक लष्करी गट तयार केला असून, तो आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर काश्मीरच्या मुद्द्यावरून भारतीय हिताला सातत्याने बाधा पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. पाकिस्तानचे दहशतवादी आणि तुर्कीयेचे प्रगत ड्रोन्स अझरबैजानच्या मदतीला उभे राहिल्यावर, भारताने आर्मेनियाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला. ‘आकाश’ आणि ‘पिनाक’सारखी विद्ध्वंसक शस्त्रे आर्मेनियाला देऊन, भारताने तुर्कीये - अझरबैजान - पाकिस्तानच्या अभद्र आघाडीला कठोर इशारा दिला आहे. तुम्ही आमच्या शत्रूंना मदत कराल, तर आम्ही तुमच्या शत्रूंना अशी अद्ययावत शस्त्रे देऊ की तुमचे अस्तित्वच धोयात येईल. आर्मेनिया हा भारताचा संरक्षण क्षेत्रात सर्वांत मोठा ग्राहक झाला आहे. कोट्यवधी डॉलर्सची शस्त्रास्त्रे, भारत आज आर्मेनियाला आत्मविश्वासाने पुरवत आहे.
 
भारताची ही प्रगल्भ संरक्षण मुत्सद्देगिरी आर्मेनियापुरती किंवा युरेशियापुरती मर्यादित नाही. चीनला त्याच्याच भाषेत आणि त्याच्याच अंगणात उत्तर देण्यासाठी, भारताने आपल्या ‘अ‍ॅक्ट ईस्ट पॉलिसी’अंतर्गत आग्नेय आशियाई देशांसोबतही सामरिक संबंध कमालीचे दृढ केले आहेत. दक्षिण चीन समुद्रात चीनच्या वाढत्या दादागिरीला चाप लावण्यासाठी, भारताने व्हिएतनामसोबत ‘ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ’ क्षेपणास्त्रांचा करार केला. व्हिएतनाम हा चीनचा पारंपरिक शत्रू. त्याला ‘ब्रह्मोस’सारखे अस्त्र देऊन, भारताने चीनची डोकेदुखी वाढवली आहे. याशिवाय, इंडोनेशियासारख्या आणखी एका महत्त्वाच्या आशियाई देशासोबतही, शस्त्रास्त्रनिर्यातीची आणि विशेषतः ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्र देण्याची भारताची चर्चा आता अगदी अंतिम टप्प्यात आली आहे. फिलीपिन्सने याआधीच भारताकडून ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्रे खरेदी करून, आपल्या नौदलात तैनात केली आहेत. हे सर्व देश चीनच्या विस्तारवादी धोरणाने त्रस्त असून, त्यांना आता भारताच्या रूपाने एक खंबीर, लोकशाहीवादी आणि विश्वासार्ह सामरिक पाठीराखा मिळाला आहे.
 
‘मेक इन इंडिया’ या मोहिमेची सुरुवात झाल्यावर, देशातील काही विरोधी पक्षांनी, तसेच संकुचित वृत्तीच्या नेत्यांनी आणि पाश्चात्य अर्थतज्ज्ञांनी याची खिल्ली उडवली. भारत कधीही शस्त्रास्त्र निर्यातदार देश बनू शकत नाही, असाच त्यांचा दावा होता. मात्र, आज भारताच्या अर्थव्यवस्थेने आणि संरक्षण निर्यातीने जो उच्चांक गाठला आहे, त्याने या सर्व टीकाकारांची तोंडे कायमची बंद केली आहेत. आर्थिक पातळीवर २४.४० टक्क्यांची निर्यातवाढ आणि संरक्षण पातळीवर आर्मेनियापासून व्हिएतनामपर्यंत पसरलेला भारतीय शस्त्रास्त्रांचा दबदबा, या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आज जगातील कोणतेही राष्ट्र भारताच्या सामरिक आणि आर्थिक ताकदीकडे दुर्लक्ष करू शकत नाहीत. भारत आता जागतिक राजकारणातील भूराजकीय समीकरणे आपल्या सोयीनुसार ठरवणारा, एक प्रमुख खेळाडू झाला आहे. येणारा काळ हा भारताचाच आहे आणि ‘मेक इन इंडिया’ हे त्या सुवर्णकाळाचे सर्वांत मोठे, प्रभावी आणि स्वयंपूर्ण अस्त्र आहे, हाच याचा मथितार्थ.