आयकर भरणा करण्यापूर्वी बदललेले 'हे' नियम वाचून घ्या! अन्यथा नोटीशीला द्यावे लागेल उत्तर

    01-Jun-2026   
Total Views |

ITR Filing

मुंबई (Income Tax file Documents) : जून महिना सुरू झाल्यानंतर देशातील नोकरदारवर्गाला आपआपल्या कंपनीतून फॉर्म १६ मिळण्यास सुरुवात होते. त्यानंतर सर्वजण करभरणा करण्यास सुरुवात करतात. मात्र, तुम्ही विचार करत असाल की, तुम्ही फॉर्म १६च्या भरवशावर बसाल आणि करभरणा सुलभ व अचूक होईल तर हा तुमचा गैरसमज आहे. नव्या नियमावलीबद्दल तुम्हाला माहिती नसेल तर लक्षात घ्या सरकारची तुमच्या प्रत्येक व्यवहारावर नजर असेल.
 
याच कारणास्तव फॉर्म १६च्या सोबत दोन आणखी पुरावे सादर करण्याची गरज आहे. एआयएस म्हणजेच ॲन्युअल इन्फोर्मेशन स्टेटमेंट आणि टीआयएस म्हणजेच टॅक्सपेअर इन्फॉर्मेशन समरी ही दोन कागदपत्रे जमा करण्याची गरज आहे. या तिन्ही विवरणपत्रातील रक्कम जर मेळ खात नसेल तर आयकर विभागाची नोटीस येऊ शकते. त्यामुळे सोप्या शब्दात समजून घ्या नक्की ही तिन विवरणपत्रे नेमकी काय आहेत?
 
फॉर्म १६ म्हणजे काय?
 
फॉर्म १६ म्हणजे सोप्या शब्दांत सांगायचे झाल्यास आपल्या पगाराचा आणि कराशी निगडीत एक महत्वाचा दुवा मानला जातो. ज्यात तुम्ही नोकरीपेक्षातून कमावलेल्या रक्कमेवर लागणाऱ्या कराचा उल्लेख त्यात असतो. एचआरए, लिव ट्रॅव्हल अलाऊन्स तसेच करवजावट करण्यासाठी केलेल्या गुंतवणूकीची माहितीही या फॉर्ममध्ये उपलब्ध असतो. उदा. ८० सी अंतर्गत पीएफ, एलआयसी किंवा अन्य गुंतवणूक तसेच ८० डी अंतर्गत येणाऱ्या वैद्यकिय विम्याचाही सामावेश होतो. या सर्व वजावटीनंतर तुम्हाला करपात्र रक्कम भरावी लागते. जर यांची वजावट शून्य असेल तर करभरणा करावा लागत नाही. आपल्याला फॉर्म १६ मिळाल्यानंतर त्यावर तुमचा पॅन क्रमांक अचूक आहे की नाही हे नीट तपासा.त्यानंतर पार्ट एमद्ये दाखविण्यात आलेल्या टीडीएस रक्कमेशी फॉर्म २६ एएस तपासून पहा. कंपनीने जो कर वजा केला आहे तो सरकारकडे जमा केला आहे, याची पुष्टी याद्वारेच होते.
 
ॲन्यूअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट : तुमच्या कमाईचा डिजिटल हिशोब
 
आयकर विभागाच्या अंतर्गत काही दिवसांपूर्वी (एआयएस) ची सुरुवात केली आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास संपूर्ण व्यवहारांचा हिशोब या फॉर्ममध्ये ठेवला जातो. जिथे फॉर्म १६मध्ये फक्त वजावट निश्चित केलेली असते त्याऐवजी एआयएसमध्ये विस्तृत चित्र स्पष्ट करता येते. कंपनीकडे तुमच्या नोकरीतून मिळालेल्या उत्पन्नाचा हिशोब असतो. मात्र, इतर मिळकत रक्कमेबद्दल एआयएसमध्ये समजू शकते. वर्षभरात झालेल्या संपूर्ण व्यवहारांची नोंद इथे ठेवली जाते. जेव्हा तुम्ही आयकर विभागाच्या संकेतस्थळाद्वारे तुमच्या लॉगिननुसार हे स्टेटमेंड डाऊनलोड कराल तेव्हा लक्षात येईल की, आपण वर्षभरात केले असे खर्च आणि लाभांश जे तुमच्याही लक्षात नसतील पण त्याची नोंद आयकर विभाग चोख ठेवत आहे. उदा. तुम्हाला मिळालेले व्याज, म्युच्युअल फंड, शेअर, महागडी कार, जमीन आदी गोष्टी खरेदी केल्या असतील तर त्याची नोंद यात आढळेल. त्यामुळे आता आयकर विभागापासून या गोष्टी लपणाऱ्या नाहीत.
 
टॅक्सपेअर इन्फॉर्मेशन समरी – कित्येकदा वर्षभरात इतके व्यवहार होतात कि, सर्व आयकर परताव्यात दाखविणे शक्य होत नाही. त्याचा उपाय म्हणून आयकर विभागाने टॅक्स इन्फॉर्मेशन समरीचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. ही एक सोप्या आणि छोट्या प्रणालीचे रुप आहे. टीआयएस आपल्या प्रत्येक कॅटेगरीच्या व्यवहारांना एकत्रित करुन एकूण रक्कम दाखवते. उदा. आपण जर विविध तारखेला शेअर बाजारात ५० स्वतंत्र व्यवहार केले आहेत. सहाजिकच त्यांची यादी भली मोठी होऊ शकते. हे टाळण्यासाठी टीआयएस सोप्या प्रकारे एका ओळीत संपूर्ण व्यवहाराची रक्कम दर्शवते. आयकर विभागाला समजू शकते की वर्षभरात कुठल्या प्रकारात किती खर्च झालेला आहे.
 
या तिघांचा मेळ कसा साधाल?
 
आयकर भरण्याची सुरुवात करण्यापूर्वी तिन्ही कागदपत्रे समोर ठेवून तुम्हाला अभ्यास करावा लागेल. ज्यात फॉर्म १६मध्ये दाखविण्यात आलेल्या पगारावर लक्ष केंद्रीत करा. जर हीच रक्कम दोन्ही उर्वरित स्टेटमेंडमध्ये असेल तर निश्चिंत व्हा. कंपन्या बऱ्याचदा आकडेवारी देताना घोळ करतात. त्याचा फटका आयटीआर भरणाऱ्याला बसू शकतो. आपले बँक पासबुक तपासा, ज्यात प्रत्येक तिमाहीला जमा होणारे व्याज आणि फॉर्ममध्ये भरण्यात आलेले बँकेचे व्याज हा कॉलम तपासा. याऐवजी जर शेअर आणि डिविडेंटचा सामावेश आहे तर त्याचीही नोंद करा. जर तुम्ही कुठल्याही प्रकारचा व्यवहार केला नसेल आणि त्याची नोंद एआयएस आणि डीआयएसवर असेल तर तुम्ही आयकर विभागाच्या वेबसाईटद्वारे याबद्दल तक्रार करू शकता. ज्यात फिडबॅक देण्याचा पर्याय उपलब्ध आहे. ज्यात इन्फॉर्मेशन इज नॉट करेक्ट या रकान्यावर टीक करू शकतात. वरील तिन्ही कागदपत्रांवरील रक्कम पडताळणी योग्य असेल तरच तुम्ही आयकर विभागाच्या रडार आणि नोटीशीपासून दूर राहाल.






तेजस परब

मुंबई विद्यापीठातून एमएसीजेपर्यंत शिक्षण. वाणिज्य शाखेतून पदवी. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (वेब) म्हणून कार्यरत. पाच वर्षांपासून विविध वृत्तपत्रांमध्ये वार्ताहर व उपसंपादक पदाचा अनुभव. दोन प्रमुख वृत्तपत्रांतील निनावी सुत्रांच्या बातम्यांबद्दल संशोधन. डिजिटल मीडियासाठी लेखन. डिजिटल मार्केटींग विषयाचा अभ्यासक.