मीरा-भाईंदर आज विकासाच्या महामार्गावर धावणारं एक गजबजलेलं शहर म्हणून उदयास आले आहे. मात्र, या शहराच्या भूतकाळात डोकावून पाहिलं, तर एकेकाळी इथे कच्च्या रस्त्यांचं साम्राज्य आणि सोयी-सुविधांचा मोठा अभाव होता. सायकल हेच प्रवासाचं मुख्य साधन असलेल्या त्या काळात, भाईंदरच्या भूमीत एका ध्येयवादी नेतृत्वाचा उदय झाला; ज्यांनी आपल्या निष्ठेने आणि कष्टाने या परिसराचा चेहरामोहरा बदलण्यात मोलाचं योगदान दिलं. ते उत्तुंग व्यक्तिमत्त्व म्हणजेच कै. गंगाधर लादूरामजी गाडोदिया.
गंगाधर गाडोदिया यांचा जन्म १९३० मध्ये राजस्थानच्या नागौर जिल्ह्यात झाला. बालपणातच ते आपल्या कुटुंबासह भाईंदर येथे आले. त्यानंतर तब्बल ६८ वर्षं भाईंदर हीच त्यांची कर्मभूमी राहिली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भाईंदरचे 'संघचालक' म्हणून जबाबदारी सांभाळण्यासोबतच, त्यांनी १९७८ पासून भाईंदर ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणूनही लोकसेवा केली.
त्या काळात मुंबईतील संघ कार्यात 'हेमंत शिबिर' हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि नियमित उपक्रम असे. मुंबईत शिबिरासाठी योग्य जागा मिळणे कठीण झाल्यामुळे, तत्कालीन शारीरिक शिक्षण प्रमुख आबा मयेकर जागा शोधत भाईंदरला गंगाधरजींच्या निवासस्थानी आले. त्यावेळी भाईंदर हे प्रामुख्याने 'मीठाघर' (मिठागरे) साठी ओळखले जाई.
जागेचा शोध सुरू असतानाच उत्तन येथील 'भूत बंगला' परिसराजवळ डॉ. शरदचंद्रराव आणि अजिंक्यजी यांची २०० एकर जमीन रिकामी असल्याची माहिती मिळाली. आबा मयेकर यांनी तातडीने हालचाली करून ती जागा मिळवली. जागा निश्चित होताच आबांनी गंगाधरजींना फोन करून सांगितले, "शिबिरासाठी जागा मिळाली आहे, तुम्ही भाईंदरहून ११ स्वयंसेवकांसाठी जेवण बनवून घेऊन या."
त्या वेळी आजच्या अथांग 'केशवसृष्टी'च्या जागेवर कल्लू नावाचे एक छोटेसे घर होते. गंगाधरजी अत्यंत अभिमानाने सांगायचे, "या केशवसृष्टीच्या पुण्यभूमीत सर्वात पहिले पाऊल माझे पडले." भाईंदरचे संघचालक या नात्याने या संपूर्ण प्रकल्पाची जबाबदारी आपलीच आहे, या भावनेतून ते पहिल्या दिवसापासून या कार्यात जोडले गेले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहिले.
अनेक वर्षांपर्यंत केशवसृष्टीला जाणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचा पहिला टप्पा म्हणजे गंगाधरजींचे घर असायचा. मुंबईहून येणारे कार्यकर्ते आधी त्यांच्या घरी येत, चहा-नाश्ता करत आणि मग गंगाधरजींना सोबत घेऊन केशवसृष्टीच्या भूमीकडे रवाना होत. कार्यकर्त्यांचे आदरातिथ्य करणे हा त्यांच्या दिनक्रमाचा भाग बनला होता.
जेव्हा केशवसृष्टीच्या परिसरात 'रामरत्न विद्या मंदिर' या निवासी शाळेची उभारणी झाली, तेव्हा नवीन वातावरणात मुले आणि कर्मचाऱ्यांना भीती वाटू नये म्हणून गंगाधरजी स्वतः ६ महिने शाळेच्या वसतिगृहात राहिले. केशवसृष्टीत स्थानिक मुलांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा असावी, हा त्यांचाच आग्रह होता. त्यांच्या याच दूरदृष्टीतून आणि आग्रहातून पुढे 'रामरत्ना इंटरनॅशनल स्कूल'ची स्थापना झाली.
२०१७ मध्ये या कर्मयोगीचे निधन झाले. आज गंगाधरजी आपल्यात नसले, तरी त्यांनी लावलेले केशवसृष्टीचे रोपटे आज एका विशाल वटवृक्षात रूपांतरित झाले आहे. त्यांचा सेवाभावाचा हा वारसा त्यांचे सुपुत्र ओमप्रकाश गाडोदिया तितक्याच निष्ठेने पुढे चालवत असून, केशवसृष्टी आणि सामाजिक कार्यात सक्रिय योगदान देत आहेत. केशवसृष्टीच्या पावन भूमीचा विचार करताना, तिची पायाभरणी करणाऱ्या गंगाधरजींसारख्या तपस्वी महापुरुषाचे स्मरण सदैव प्रेरणा देत राहील.