हवामान साक्षरतेसाठी ‘सृष्टीज्ञान’ संस्थेने ‘क्लायमेट अॅम्बेसॅडर्स ऑफ मुंबई’ हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. मुंबई महानगरात राबवल्या जाणार्या या उपक्रमाविषयी माहिती देणारा हा लेख...
मुंबई हे महानगर आपल्या समृद्ध आणि वैशिष्ट्यपूर्ण परिसंस्थेसह सह्याद्रीच्या (पश्चिम घाट) कुशीत वसलेले आहे. मात्र, सध्या शहरीकरण आणि प्रदूषणामुळे येथील नैसर्गिक संसाधने प्रचंड दबावाखाली आहेत. शहराने हरित क्षेत्राचा मोठा भाग गमावल्यामुळे पुराचा धोका आणि तापमानवाढीसारखी संकटे उभी ठाकली आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईसमोरील हवामानबदलाची आव्हाने पेलण्यासाठी आणि तरुणांना या लढ्यात सामील करण्यासाठी ‘सृष्टीज्ञान’ संस्थेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. ‘वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणीसंग्रहालय’ आणि ‘ऑईको एसेन्स’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सृष्टीज्ञान’ संस्थेने ‘क्लायमेट अॅम्बेसॅडर्स ऑफ मुंबई’ (Climate mbassadors of mumbai) हा विशेष उपक्रम सुरू केला आहे.
केवळ वरवरची पर्यावरणीय जागरूकता निर्माण न करता, प्रत्यक्ष कृतीत आणता येईल, अशी स्थानिक ‘हवामान साक्षरता’ तरुणांमध्ये रुजवणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. यासाठी ‘सृष्टीज्ञान’ संस्थेच्या सहसंचालिका संगीता खरात यांनी पर्यावरण क्षेत्रातील तज्ज्ञ, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांशी जानेवारी २०२६ मध्ये चर्चा सुरू केली होती. या मंथनातून अनेक महत्त्वाचे मुद्दे समोर आले. पर्यावरण शिक्षण क्षेत्रातील २० वर्षांहून अधिक अनुभव असलेले डॉ. श्रेया भानप, गौरी गुरव आणि डॉ. अभिषेक साटम यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांना ‘अर्बन हीट आयलंड इफेक्ट’सारख्या गुंतागुंतीच्या वैज्ञानिक संकल्पना समजून घेण्यात अडचणी येतात. तसेच, संसाधनांची कमतरता हा या शिक्षणातील मोठा अडथळा आहे.”
डॉ. शांती उपाध्ये (के. जे. सोमय्या महाविद्यालय), डॉ. प्रिया पारकर (महर्षी दयानंद महाविद्यालय), डॉ. वर्षा माळवदे (रामनारायण रुईया महाविद्यालय) आणि डॉ. वैशाली जावळेकर (डी. जी. रुपारेल महाविद्यालय) या नामांकित शिक्षणतज्ज्ञांनी सांगितले की, “सध्याच्या अभ्यासक्रमात हवामानबदल समाविष्ट असला, तरी शिक्षक अनेकदा याकडे एक ओझे म्हणून पाहतात. त्यामुळे शिक्षकांसाठी विशेष प्रशिक्षणाची गरज आहे.”
महर्षी दयानंद महाविद्यालय आणि बी. एन. बांदोडकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक चौकटीबाहेर जाऊन प्रत्यक्ष क्षेत्रात कार्य करण्याची आणि संशोधनावर आधारित शिक्षणाची इच्छा व्यक्त केली आहे. या चर्चेदरम्यान एक महत्त्वाचे निरीक्षण समोर आले. सध्याचे १८ ते २० वयोगटातील तरुणांचे माध्यमिक शिक्षण हे ‘कोविड’ काळात झालेले आहे. महामारीमुळे त्यांच्या पारंपरिक शिक्षण प्रक्रियेत मोठे अडथळे आले, ज्याचा परिणाम त्यांच्या मूलभूत संकल्पनांवर झाला आहे. या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा चिकित्सक विचार आणि स्वतंत्र संशोधनाकडे वळवून खर्या शिक्षण चौकटीत आणणे गरजेचे बनले आहे.
मुंबईला प्रामुख्याने समुद्रपातळीतील वाढ, अतिवृष्टी, उष्णकटिबंधीय चक्रीवादळे आणि वाढते तापमान या हवामानविषयक संकटांचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत मुंबईतील ‘वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणीसंग्रहालय’ (राणीची बाग) यांसारखी ठिकाणे शहरी रहिवाशांना निसर्गाशी जोडण्याची आणि पर्यावरण जपण्याची मोठी संधी उपलब्ध करून देतात. म्हणूनच, या व्यासपीठावर ‘सृष्टीज्ञान’ संस्थेने युवकांमध्ये शहरी जैवविविधतेचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आणि जैवविविधता संवर्धनासाठी त्यांची क्षमताबांधणी करण्यासाठी ‘क्लायमेट अॅम्बेसॅडर्स ऑफ मुंबई’ हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला. यासाठी उद्यानाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी विशेष सहकार्य केले. हवामानबदलाच्या जागतिक आणि स्थानिक आव्हानांना समजून घेणे, जैवविविधतेवर होणार्या हवामानबदलाच्या परिणामांबद्दल तरुणांमध्ये ज्ञान, क्षमता आणि सकारात्मक दृष्टिकोन विकसित करणे आणि शाश्वततेवर आधारित ‘हवामान सुसंगत जीवनशैली’ जगण्यासाठी प्रोत्साहन देणे, ही मुख्य उद्दिष्टे ठरवण्यात आली.
- संगीता खरात