बाळकुम येथे सकल हिंदू समाज संमेलनात हिंदुत्वाचा शंखनाद

    01-Jun-2026   
Total Views |
Balkum All-Hindu Community Conference
 
ठाणे : (Balkum All-Hindu Community Conference) बाळकुम येथील रुणवाल गार्डन सिटी फेज दोन पोडियम येथे रविवारी संध्याकाळी साडेपाच ते साडेआठ दरम्यान सकल हिंदू समाज रुणवाल भाग यांच्या वतीने आयोजित सकल हिंदू समाज संमेलन अत्यंत उत्साहात, शिस्तबद्ध आणि भव्य स्वरूपात संपन्न झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या या विराट संमेलनाला बाळकूम परिसरातील विविध भाषिक, वयोगटातील आणि विविध आर्थिक-सामाजिक स्तरातील नागरिक मोठया संख्येने सहभागी झाले होते. महिलांची उपस्थिती विशेष होती. तरुणाईचा सहभाग लक्षणीय होता. संमेलनातून विविध जाती, प्रांत-भाषा यातून देशाच्या लघुरूपाचे मनोहारी दर्शन घडले. विविधतेतील एकतेचा प्रत्यय आला.
 
या संमेलनात हिंदू, हिंदुत्व आणि हिंदूपण यासह पंचपरिवर्तन याची अभ्यासपूर्ण मांडणी प्रमुख वक्ते मकरंद मुळे यांनी केली. ते म्हणाले, हिंदुत्व सीमा, संप्रदाय, पंथ, भाषा, जात पुरते मर्यादित नसून, संपूर्ण चराचराशी एकात्म भाव राखणारी आणि मानवी कल्याणाचा एकात्मिक विचार करणारी शाश्वत जीवन पद्धती आहे. 'वसुधैव कुटुम्बकम्' या महान वैश्विक मूल्यावर आधारलेली आहे. या समृद्ध आणि व्यापक संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी, तसेच समाजातील आत्मविस्मृती दूर करून राष्ट्रभाव जागृत करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गेल्या शंभर वर्षांच्या अखंड प्रवासात अनेक आव्हानांना आणि संघर्षांला सामोरे जात सेवा, सामाजिक समरसता, देशभक्ती आणि एकात्मतेचे संघटन चालवले आहे. यातून हिंदू समाजात नवचैतन्य जागवले आहे. आणि स्वाभिमानाचे पुनः निर्माण निर्माण केले आहे. (Balkum All-Hindu Community Conference)
 
पुढे ते म्हणाले, आजच्या आधुनिक काळात अंधानुकरणामुळे निर्माण होणाऱ्या विघटनात्मक आव्हानांवर मात करण्यासाठी आणि आपल्या भावी पिढीला सुसंस्कारी, सक्षम करण्यासाठी महिलांची भूमिका मोलाची ठरणार आहे. कुटुंबाच्या केंद्रस्थानी असलेल्या स्त्रीने स्वदेशीचा आग्रह, पर्यावरण रक्षण, नागरिक अनुशासन, सामाजिक समरसता आणि कुटुंब प्रबोधन हे पंचपरिवर्तन' आपल्या दैनंदिन जीवनात, घरात रुजवल्यास समाजात सकारात्मक बदल होईल. संस्कारक्षम हिंदू कुटुंबांच्या, जागृत महिलांच्या सामर्थ्यावर आपण सर्व प्रकारच्या आव्हानांचा यशस्वीपणे प्रतिकार करून, समरस, सुसंघटित, समृद्ध, समर्थ भारताची पुन:र्निर्मिती आत्मविश्वासाने करू शकू.
 
सांस्कृतिक कार्यक्रमात स्थानिक कलाकारांनी विविध पारंपरिक कलाप्रकार सादर करत संमेलन दर्जेदार केले. रति पाठक आणि नेहा कुलकर्णी यांनी आपल्या बहारदार आणि उत्कृष्ट सूत्रसंचालनाने संपूर्ण संमेलनात एक रंगत आणली. कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक पद्धतीने मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली. त्यानंतर अमर कुलकर्णी यांनी सुमधुर 'गणेश वंदना' गायली, तर श्रीमती सिंधु अशोक यांनी भक्तीभावाने 'राम भजन' सादर केले.
 
नुकत्याच झालेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीचे औचित्य साधत सुहिता मराठे, कर्वे आणि चिंचोले यांनी 'जयोस्तुते' हे स्फूर्ती गीत सादर करून वातावरणात ऊर्जा निर्माण केली. त्यानंतर अनुभूती बॅनर्जी, अग्रणी मिश्रा, नेहा भट यांनी नयनरम्य भरतनाट्यमच्या शास्त्रीय नृत्याविष्कारद्वारे देवी शारदेला वंदन केले. मूळ मराठी शारदा स्तुतीवर सादर केले नृत्य देखणे होते. संस्कृती अकॅडमीच्या आशा सुनीलकुमार यांनी हे नृत्य दिग्दर्शित केले होते. स्नेहलता गोगटे यांच्या योग मंडळाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 'पंच परिवर्तन' या सामाजिक विषयावर प्रबोधनात्मक भारूड सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली.
 
बालकलाकार आरोह गोगटे, हृदान करंदीकर आणि काव्या-ओवी शिरोळे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा भेटीचा प्रसंग अत्यंत शौर्यपूर्ण पोवाड्याद्वारे जिवंत केला, ज्याला श्रोत्यांनी भरभरून दाद दिली.सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उत्तरार्धात श्रीमती श्रीवास्तव यांनी सादर केलेल्या कृष्ण भजनाने रसिक मंत्रमुग्ध झाले, तर सायली साठे यांनी आपल्या नृत्याविष्काराने कथ्थकची सुंदर झलक दाखवली.यश काबाडी आणि प्रियांशु शर्मा यांचे तबला आणि बासरीचे अप्रतिम फ्यूजन सुश्राव्य जुगलबंदीने श्रोत्यांना आनंद दिला.
 
याच संमेलनाचे औचित्य साधत ज्येष्ठ वृत्तनिवेदिका आणि प्रसिद्ध सूत्रसंचालक स्नेहा आघारकर यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३०१ व्या जयंती निमित्त आपले अभ्यासपूर्ण व्याख्यान दिले आणि अहिल्याबाईंच्या जीवनकार्याचा व प्रशासकीय कौशल्याचा आढावा घेत उपस्थितांना प्रेरित केले.
 
या भव्य संमेलनाचे आयोजक राजेश वाघेला यांनी केले होते. संजय बुगडे यांनी सर्व कलाकार, वक्ते आणि उपस्थितांचे आभार मानले. योगेश गोगटे यांनी संपूर्ण 'वंदे मातरम'चे गायन केल्यानंतर, उपस्थितांनी केलेल्या जोरदार जयघोषात या दिमाखदार, शिस्तबद्ध संमेलनाची सांगता झाली. (Balkum All-Hindu Community Conference)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक