जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाला उद्धारी’ हे वचन, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्याला सांगितलं. आजच्या तारखेला यामध्ये थोडा बदल करून, ‘ज्याच्या हाती ‘एआय’ची दोरी, तोच जगाचा उद्धारी,’ असे म्हणावे लागेल. ही काही अतिशयोक्तीचे नसून, आजचे वास्तव आहे. तंत्रज्ञानाचा विकास जसजसा होत जातो, तसतसं असंख्य शक्यतांचा महासागरच आपल्यासमोर आपल्याला दिसू लागतो. आजच्या ‘एआय’च्या जगात, या शक्यता काही सेकंदांतच आपल्यासमोर साकार होतात. अशा पद्धतीने एखादी आगळी-वेगळी कलाकृती जन्माला आली की, आपसूकच ती जगाचं लक्ष वेधून घेते. असाच प्रकार, चीनमधील एका युवकाच्या बाबतीत घडला.
चीनमधील २९ वर्षीय युवक लिऊ झियूने, ‘एआय’च्या मदतीने अवघ्या साडेतीन मिनिटांचा ‘झोम्बी स्कॅव्हेंजर’ हा लघुपटच तयार केला. या चित्रपटाने आता थेट हॉलीवूडचे लक्ष वेधून घेतले आहे. पिक्सारच्या ‘वॉल-ई’ चित्रपटापासून प्रेरित झालेली, ही एका रोबोट आणि बाहुलीच्या प्रेमाची कथा आहे. कला, चित्रपट किंवा संगणकशास्त्राची कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या लिऊने, हा लघुपट केवळ दहा दिवसांत आणि अवघ्या तीन हजार युआन अर्थात सुमारे ४२ हजार रुपयात बनवला. हा खर्च त्याने सॉफ्टवेअर सबस्क्रिप्शन आणि टोकन्सवर केला. लिऊ झियू हा काही, तंत्रज्ञ नाही. इंजिन ड्रायव्हर म्हणून तीन महिने काम केल्यानंतर, लग्नांमध्ये फोटोग्राफी करण्याचं काम त्याने केलं. चित्रपटनिर्मिती, किंवा संगणकशास्त्रात कोणतीही पार्श्वभूमी नसल्यामुळे, त्याच्या या निर्मितीचे कौतुक होत आहे.
या निर्मितीचा प्रवाससुद्धा अत्यंत रंजक असाच. आपल्या कौटुंबिक हॉटेल व्यवसायासाठी, त्याच्या आई-वडिलांनी त्याला जाहिरातींची निर्मिती करण्यास सांगितले. लिऊ याने मग वेगवेगळ्या ‘एआय’ टूल्सवर काम करण्यास सुरुवात केली. यातूनच पुढे लघुपटाची कल्पना त्याला सुचली.
‘एआय’चा वापर करून तयार केलेला हा अॅनिमेटेड लघुपट, दि. ९ मे रोजी चिनी समाज माध्यमांवर पोहोचला. अर्थात, सुरुवातीला चीनमध्ये याला थंडच प्रतिसाद मिळाला. मात्र, काही हॉलीवूड दिग्दर्शक, सिनेरसिकांचे लक्ष गेल्यावर, तो मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाला. एखादा उद्देश ठेवून ही निर्मिती न केल्यामुळे, त्याने तितक्याच सहजपणे याविषयीची माहितीसुद्धा लोकांना दिली. लिऊच्या मते, वास्तववादी ‘एआय’ व्हिडिओ बनवण्याची गुरुकिल्ली म्हणजे सॉफ्टवेअरला केवळ साध्या सूचना देण्याऐवजी, स्पष्ट कथानकाचा तर्क देणे. मूव्हमेंट, मोटिवेशन आणि मूड यांच्या संगमातूनच ‘एआय’ला आपण सूचना द्यायला हव्या, असं तो सांगतो. हॉलीवूडस्थित ‘एआय’ चित्रपटनिर्मात्यांनी त्याच्या कामाचे कौतुक करत, अमेरिकेत संधीची दारही उघडली. मात्र, लिऊला इतक्यात तरी अमेरिकेत जायचे नाही. चीनमध्येच तो व्यस्त असून, त्याला अद्याप इंग्रजीही बोलता येत नाही.
एका बाजूला ‘एआय’चा वापर अमूक एका क्षेत्रात करावा की करू नये, अशा विचारांमध्ये काही देश अडकलेले असताना, दुसर्या बाजूला ‘एआय’च्या नव्या गोष्टी समोर येत आहेत. ‘स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी’च्या ‘ह्युमन-सेंटर्ड आर्टिफिशियल इंटिलिजन्स इन्स्टिट्यूट’ने, नुकताच ‘एआय इंडेस अहवाल २०२६’ प्रसिद्ध केला. हा अहवाल २०१७ पासून जगभरातील ‘एआय’ क्षेत्रातील प्रगती, त्याचा अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम आणि सामाजिक बदलांचा विश्वासार्ह ताळेबंद मानला जातो. या अहवालानुसार अमेरिका आणि चीनमध्ये ‘एआय’वरून स्पर्धा सुरू असून, चीन सध्या ‘एआय’पेटंट्स, ‘सायटेशन्स’ आणि ‘इंडस्ट्रियल रोबोट इन्स्टॉलेशन’मध्ये जगाचे नेतृत्व करत आहे. ‘एआय’ मॉडेल्सची कोडिंग क्षमताही कैक पटीने वाढली आहे.
एका बाजूला ही स्वागतार्ह बाब असली तरी, ‘एआय’ मॉडेल्सच्या सर्व्हरला थंड ठेवण्यासाठी लागणार्या पाण्याचा वार्षिक वापर १२ लाख लोकांच्या पिण्याच्या पाण्याच्या गरजेइतका आहे. ’ग्रोक ४’सारख्या मोठ्या मॉडेलच्या ट्रेनिंगदरम्यान, तब्बल ७२ हजार, ८१६ टन कार्बन उत्सर्जन झाले. एका बाजूला ‘एआय’च्या क्षेत्रात गगनभरारी घेण्याची इच्छा असलेले राष्ट्र आणि दुसर्या बाजूला पर्यावरणातील माणसांना न परवडणारे बदल. नेहमीप्रमाणे यातूनसुद्धा माणसाच्या भाळी असलेल्या अनिश्चिततेवर शिक्कामोर्तब होत आहे, एवढे नक्की.