वडाळा पुनर्विकास प्रस्ताव अखेर मंजूर; सत्ताधाऱ्यांना दिलासा
09-May-2026
Total Views |
मुंबई : (Wadala Redevelopment) वडाळा गृहनिर्माण पुनर्विकास प्रकल्पाचा प्रस्ताव सत्ताधारी नगरसेवकांच्या अनुपस्थितीमुळे यापूर्वी मुंबई महापालिका सभागृहात फेटाळला गेला होता. मात्र शुक्रवारी (८ मे) विशेष सभेत हा प्रस्ताव पुन्हा मांडण्यात आला आणि बहुमताने मंजूर करण्यात आला. विरोधकांनी या प्रस्तावाला विरोध केल्यानंतर मतदान घेण्यात आले. यामध्ये सत्ताधारी पक्षाच्या बाजूने ११२ तर विरोधात ७९ नगरसेवकांनी मतदान केले.
प्रस्ताव फेटाळल्यानंतर भारतीय जनता पक्षाने आपल्या अनुपस्थित नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. मुंबई भाजपाध्यक्ष अमित साटम यांनी अनुपस्थित राहणाऱ्या नगरसेवकांचा निधी रोखण्याचा इशाराही दिला होता.
गुरुवार, ३० एप्रिल रोजी हा प्रस्ताव प्रथम सुधार समितीत मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी महापालिका सभागृहाच्या सकाळच्या सत्रात सत्ताधारी पक्षाने हा प्रस्ताव मांडला. मात्र भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कमी उपस्थितीचा फायदा घेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस आणि एमआयएमच्या नगरसेवकांनी या अत्यावश्यक प्रस्तावाला जोरदार विरोध केला.(Wadala Redevelopment)
प्रस्ताव मंजुरीसाठी आवश्यक असलेले दोन-तृतीयांश बहुमत सत्ताधाऱ्यांना मिळू शकले नाही आणि प्रस्ताव फेटाळला गेला. त्यामुळे सत्ताधारी पक्षाची मोठी नामुष्की झाली होती.
वडाळ्यातील किदवई मार्गावरील दादर-नायगाव परिसरातील महापालिकेची ‘आझाद नगर’ म्हणून ओळखली जाणारी मालमत्ता तसेच लगतच्या कमला नगर येथील झोपडपट्टी पुनर्विकासाचा हा प्रस्ताव होता. हा विषय अत्यावश्यक बाब म्हणून सभागृहात मांडण्यात आला होता.
शुक्रवारी प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. यासाठी सत्ताधारी पक्षाने आधीच व्हीप जारी केला होता. तरीही तीन नगरसेवक सभागृहातून अनुपस्थित राहिले.(Wadala Redevelopment)