कीर्तनकारांना 'घुसखोर' म्हणणाऱ्या विकास लवांडेना फासले काळे

    09-May-2026   
Total Views |

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना काळं फासल्याची घटना शनिवारी म्हातोबाची आळंदी ते पुणे दरम्यानच्या प्रवासात घडली. विकास लवांडे यांनी संग्राम भंडारे यांच्यासह २० कीर्तनकारांना 'घुसखोर' म्हटल्याने वारकरी संप्रदायातून संताप व्यक्त करण्यात आला.

काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी वारकरी संप्रदायात प्रतिगामींची घुसखोरी वाढत असल्याचं वक्तव्य केलं होतं. "वारकरी संप्रदायात ६० लोकांची मांडणी ही धर्मांध शक्तींना बळ देणारी आहे. आम्ही आता अशा धर्मांध लोकांची यादी तयार करायला सुरुवात केली आहे", असं शरद पवार म्हणाले होते. शरद पवारांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी २० नावे जाहीर करत संबंधित नावे वारकरी संप्रदायातील कथित घुसखोर असल्याचा आरोप केला. त्यांच्या या आरोपांमुळे नवा वाद निर्माण झाला होता. त्याचेच प्रत्युत्तर म्हणून शनिवारी लवांडेंना काळे फासण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी सदर घटनेचे कौतुक करत म्हटले की, मी ह.भ.प संग्राम बापू भंडारे यांचे अभिनंदन करतो आणि समर्थ देखील करतो. त्यांनी अत्यंत उत्कृष्ट प्रकारे आपल्या भावना व्यक्त केल्यात. त्यांनी जे केले त्या मागची भूमिका आपण लक्षात घेतली पाहिजे. महाराष्ट्राची आणि देशाची एक वेगळी परंपरा आहे. या परंपरेमध्ये आपल्या धर्माची पताका घेऊन जात असताना अनेक लोकांनी आपलं संपूर्ण जीवन धर्माकरिता समर्पित केले. मात्र कोणीतरी उठतो आणि एखाद्या अधिकाऱ्यांसारखी यादी वाचतो. त्यामुळे बापूंनी जे केले, त्याचे आम्ही हिंदुत्ववादी कार्यकर्ते म्हणून संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने अभिनंदन करतो.

शरद पवारांनी आपल्या बगल बच्च्यांना आवरावे

भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले म्हणाले की, विकास लवांडे ही व्यक्ती सातत्याने वारकरी सांप्रदायाप्रती जे पूज्य आणि महान संत आहेत ज्याच्यावर वारकरी संप्रदाय उभा आहे, ज्यांनी तो टिकवून ठेवला अशा लोकांवर सातत्याने घाणेरड्या भाषेत टीका करत होता आणि त्यांना घुसखोर घुसखोर असा संबोधत होता. ज्या लोकांचे लाखो शिष्य या महाराष्ट्रात आहेत ज्यांनी व्यसनमुक्तीचा मोठा कार्य या महाराष्ट्रात उभं केलं. त्यांना अशा पद्धतीने त्यांचा अपमान केल्यामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली असून त्या संतापाच्या उद्रेकातून हा प्रकार घडलेला आहे. माझे यानिमित्ताने शरद पवारांना आवाहन आहे की आता तरी तुम्ही तुमच्या बगल बच्च्यांना आवरा आणि या महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्राच्या पूज्य संतांचा अपमान करणं थांबवा.

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक