उष्णतेचा पारा वाढतोय; धोका किती मोठा?

    09-May-2026   
Total Views |
Maharashtra Climate Change Crisis
 
बदलत्या हवामानाचा वाढता वेग, अनियमित पावसाचे चक्र आणि वाढत्या उष्णतेच्या लाटा या सगळ्यामुळे महाराष्ट्रातील हवामानाचे स्वरुप झपाट्याने पालटताना दिसते. कोकणातील अतिवृष्टी असो, मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती असो किंवा विदर्भातील तीव्र उकाडा, महाराष्ट्रातील प्रत्येक विभाग वेगवेगळ्या आव्हानांना सध्या सामोरा जात आहे. या पार्श्वभूमीवर वाढत्या तापमानामागची कारणे, हवामानाचा अचूक अंदाज, त्यामागील विज्ञान आणि पुढील काळातील धोके समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. त्यासाठी भारतीय हवामान विभागातील एक अनुभवी शास्त्रज्ञ आणि पुणे वेधशाळाप्रमुख डॉ. के. एस. होसाळीकर यांच्याशी दै. ‘मुंबई तरुण भारत’ने साधलेला हा संवाद...
 
महाराष्ट्रातच नाही तर देशभरात उष्णतेची लाट आली आहे. हा सगळा ‘अल निनो’चा परिणाम असल्याचे म्हटले जाते. तेव्हा, ‘अल निनो’ आणि ‘ला निना’ म्हणजे नेमके काय?
 
‘अल निनो’ आणि ‘ला निना’ हे शब्द वैज्ञानिक तर वापरतातच. पण, सर्वसामान्य नागरिकसुद्धा हवामानाशी संबंधित विषयांवर या शब्दांचा प्रयोग करताना दिसतात. एप्रिल आणि मे महिन्यात राज्यात आणि देशात उष्णतेची तीव्रता वाढलेली दिसते. प्रशांत महासागरात ‘अल निनो’ निर्मितीच्या जवळ असून, अनेकदा त्याचा परिणाम उन्हाळ्यावर होतो. काहीवेळा देशाच्या आणि राज्याच्या तापमानावर ‘अल निनो’चा प्रभाव वाढलेला दिसतो. ‘अल निनो’ म्हणजे प्रशांत महासागरात समुद्राच्या पाण्याचे तापमान सरासरीपेक्षा वाढते. हे तापमान अर्ध्या डिग्रीपेक्षा जास्त झाले की, ‘अल निनो’ तयार झाले, असे म्हणतात. सध्या हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मान्सूनच्या मध्यावर ‘अल निनो’ तयार होणार असून, त्याचा प्रभाव दिसायला लागेल. प्रशांत महासागरात समुद्राचे तापमान जास्त वेगाने वाढताना दिसत असल्याने मान्सून अजून लवकर येण्याची शयता नाकारता येत नाही. ‘ला निना’ हा ‘अल निनो’च्या अतिशय विरुद्ध शब्द आहे. प्रशांत महासागराचे तापमान सरासरीपेक्षा खाली जाते म्हणजेच, उणे अर्धा डिग्रीवर गेल्यानंतर ‘ला निना’ तयार झाला, असे म्हणतात. ‘ला निना’ असतो, तेव्हा देशातील आणि राज्यातील पावसावर त्याचा सकारात्मक प्रभाव दिसण्याची शयता आहे. पण, जेव्हा ‘अल निनो’ तयार होतो, तेव्हा देशातील आणि राज्यातील पावसावर नकारात्मक प्रभाव दिसतो.
 
गेल्या काही वर्षांत अतिवृष्टी, उष्णतेच्या लाटा आणि अवकाळी पावसाचे प्रमाण वाढत असल्याचे दिसते. यामागील मुख्य कारणे काय?
 
जागतिक स्तरावर याबाबत जे काही अभ्यास झालेले आहेत, त्यात सर्वांनी असे म्हटले की, पृथ्वीचे तापमान किंवा जागतिक तापमानवाढीचे मूळ कारण जवळपास ९५ ते १०० टक्के मानवी हस्तक्षेपच आहे. समजा, मुंबईचे आजचे तापमान ३४ डिग्री आहे आणि उद्या ते ३६ झाले म्हणजे, दोन डिग्री जरी वाढले; तरी आपल्याला त्याचा तसा विशेष प्रभाव जाणवणार नाही. पण, जागतिक स्तरावर पृथ्वीचे तापमान अर्धा किंवा एक डिग्रीने वाढले, तरी त्याचा प्रभाव पडतो. पृथ्वीचे तापमान वाढल्यानंतर हवेची आर्द्रता शोषून घेण्याची क्षमता वाढते. मग मोठमोठे ढग तयार होतात आणि बर्‍याचदा मेघगर्जनेसह गडगडाटाचा पाऊस पडताना दिसतो. यामागची कारणे म्हणजे जीवाश्म इंधन, गाडीमध्ये वापरण्यात येणारे इंधन, कारखान्यांना लागणारे इंधन या सगळ्याचा अतिवापर, पायाभूत सुविधांचा विकास अशा अनेक कारणांमुळे तापमानवाढीचा वेग दिसतो. पण, हा वेग आपल्याला कमी करता येईल का? तर, सध्यातरी ते शय दिसत नाही. पण, तापमानवाढीचा वेग आपल्याला कसा कमी करता येईल, हाच सर्व वैज्ञानिक आणि सर्व देशांचाही मूळ हेतू आहे.
 
हवामानातील या बदलांचा शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतो?
 
आपल्याकडे जवळपास ४६ ते ५० टक्के व्यवसाय शेतीशी निगडित आहेत. ‘अल निनो’चा हवामानबदलाशी कुठलाही संबंध नाही, हे मी इथे नमूद करू इच्छितो. ‘अल निनो’ गेल्या अनेक दशकांपासून येतो. बर्‍याचदा ‘सर्वसाधारणतः एवढा पाऊस पडणार आहे’, असे हवामान विभागाने सांगिल्यावर ती सरासरी गाठली जाते. पण, तो किती आहे, त्याचे वितरण कसे होते, कुठल्या टप्प्याला तो किती पडेल, हे बघावे लागते. कारण, प्रत्येक स्तरावर कृषीला लागणार्‍या पावसाचे प्रमाण वेगवेगळे आहे. पेरणी, मशागत, कापणी या प्रत्येक टप्प्यावर पाऊस वेगळा असतो. पण, अशा तर्‍हेने पडणार्‍या पावसाचे वितरण आणि त्याची तीव्रताही महत्त्वाची आहे. या सगळ्याचा नक्कीच कृषीवर परिणाम दिसतो. आपल्याकडे सिंचनावर आधारित शेतीपेक्षा पावसावर आधारित शेतीचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे एखाद्या वेळी कमी पाऊस पडणार असल्यास तशा प्रकारे नियोजन करण्याची गरज आहे. आपल्या राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणे, हे काही नवीन नाही. गेल्या १०० ते १५० वर्षांपैकी जवळजवळ २५ वर्षे अशी होती, ज्यावेळी आपल्याकडे सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला. त्यामुळे या अनुभवाचा उपयोग आपल्याला नियोजनासाठी होऊ शकेल. यासाठी शासनाच्या वतीनेही वेगवेगळ्या योजना राबवण्यात येतात.
 
तापमानवाढीसाठी कुठेतरी वाढते काँक्रिटीकरण, काचेच्या इमारती कारणीभूत असल्याचेही सांगितले जाते. हे कितपत खरे आहे? आणि यावर नेमका उपाय काय?
 
पूर्वी माझी आजी तारेवर किंवा दोरीवर कपडे सुकवायची. आता वॉशिंग मशीनमध्येच कपडे धुतले आणि सुकवलेही जातात. एक पाव टोस्टरमध्ये टाकल्यानंतर त्यामुळे होणारा विजेचा खप अधिक आहे. या छोट्याछोट्या गोष्टींमुळेही हवामानबदल होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला अतिऊर्जेचा उपयोग करणे टाळता येणे गरजेचे आहे. देशात किंवा राज्यात शहरी आणि ग्रामीण या दोन्ही भागांतील आव्हाने वेगवेगळी आहेत. शहरात पायाभूत सुविधांचा विकास करताना मोठ्या प्रमाणात बांधकाम होते. अर्थात, या सगळ्याची गरज प्रत्येकाला आहे. पण, प्रगती करताना त्यासोबत येणारे दुष्परिणामही बघणे तितकेच गरजेचे आहे. शहरांमध्ये वाढती लोकसंख्या, मोठ्या प्रमाणात असलेले वाहतूक क्षेत्र, कारखाने, उद्योगधंदे आणि त्याचबरोबर मोठमोठ्या इमारती, यामुळे ‘अर्बन हिट आयलॅण्ड’ म्हणजे ‘उष्णतेची बेटे’ तयार होतात. म्हणजे शहरांमध्ये काही भाग नेहमी उष्ण असतात. मुंबई शहरातही अशाप्रकारचे ‘अर्बन हिट आयलॅण्ड इफेट’ नक्कीच आहे. यावर निसर्गआधारित उपाय करणे गरजेचे आहे. यात व्यवस्थित प्रमाणात झाडे लावणे, लावलेली झाडे जगवणे, यामुळे ऑसिजनचे संतुलन आणि कार्बन डायऑसाईडचे उत्सर्जन कमी होण्यास मदत होईल. हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी हरित पट्टे वाढवावे लागतील.
 
महाराष्ट्रात बर्‍याच ठिकाणी गारपीट होते; उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात. मुंबईत कधी गारपीट झाल्याची नोंद आहे का? किंवा मुंबईत गारपीट का होत नाही?
 
आपल्याकडे विदर्भामध्ये आणि मराठवाड्यामध्ये गारपिटीची तीव्रता खूप जास्त आहे. त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रातही त्याचा प्रभाव दिसून येतो. बर्‍याच अंशी मुंबई किंवा कोकणामध्ये तशी गारपीट होण्याची शयता फार कमी आहे. समुद्राच्या किनारपट्टीच्या भागावर हवामान दमट आणि उष्ण असते. दुसरी गोष्ट अशी की, सर्वसाधारणतः मेघगर्जनेसह पाऊस पडण्यासाठी लागणार्‍या ढगांतून गारपीट होऊ शकते. हे ढग एखाद्या डोंगराळ भागात तयार होताना दिसतात. विदर्भ आणि मराठवाड्यातील तापमानाचा आकडा मोठा असतो. मुंबई हा आकडा गाठत नाही. कारण, मुंबईला समुद्रावरून येणार्‍या खार्‍या वार्‍यांचे वरदान आहे. हे खारे वारे तापमान-नियंत्रकाचे काम करतात. ते कोकणातील तापमान वाढू देत नाहीत. येणार्‍या काळात मुंबई किंवा कोकणातील तापमानही ४३च्या वर जाऊ शकते. येणार्‍या काळामध्ये वातावरणात होणारे बदल तीव्र आहेत. त्याविषयी बरीचशी माहिती अजून आपल्याला गठित करायची आहे.
 
मान्सून यंदा २१ ते २५ मेदरम्यान अंदमानात दाखल होणार आहे. तेव्हा मान्सूनचा हा एकूणच प्रवास कसा ‘ट्रॅक’ केला जातो?
 
काही दिवसांपूर्वी भारतीय हवामान विभागाने मान्सूनबद्दल पूर्वानुमान दिले आहे. अंदमानमध्ये दि. २० मे रोजी पाऊस दाखल होण्याची शयता आहे. पण, २० मे ही तारीख असली, तरी सर्वसाधारण १४ ते १६ मेच्या आसपास अंदमान-निकोबारमध्ये पावसाला सुरुवात होते आणि त्यानंतर मुंबई आणि राज्यातील इतर ठिकाणी पाऊस पडतो. बर्‍याचदा फक्त पाऊस पडतो म्हणून, तो ‘मान्सूनचा पाऊस’ म्हणता येत नाही. यंदा देशात मे महिन्याचा पाऊस सरासरीपेक्षा जास्त असण्याची शयता आहे. एकंदर २० मेच्या आसपास अंदमान-निकोबारमध्ये पाऊस दाखल होईल. त्यानंतर १० ते १२ दिवसांच्या प्रवासाने दि. १ जूनला तो केरळम्मध्ये दाखल होतो. त्याच्यानंतर मग तो टप्प्याटप्प्याने उत्तरेकडे सरकत जातो. साधारणपणे गोवा आणि सिंधुदुर्गच्या आसपास दि. ७ जूनला पाऊस येतो. त्यानंतर मुंबई, पुणे हा टप्पा दि. १० ते १२ जूनच्या आसपास पूर्ण होतो.
 
२०२६ साठी हवामान विभागाने त्याच्या भाकितामध्ये एक वाय म्हटले की, सर्वसाधारणत: यंदा पाऊस त्याच्या सरासरी तारखेच्या आसपास येण्याची शयता आहे. १८७५ मध्ये भारतीय हवामान विभागाची स्थापना झाली. संपूर्ण देशामध्ये हवामान विभागाकडे जवळ २०० वर्षांचा जिल्हास्तरीय हवामानाचा डेटा डिजिटल स्वरूपात आहे. जागतिक स्तरावर भारतीय हवामान विभागाला उच्च स्थान आहे. आम्ही दिलेले पूर्वानुमान आणि झालेली घटना याचा ताळमेळ घालतो. बर्‍याचदा दिलेल्या पूर्वानुमानानुसार घटना घडत नाही, तर त्याचाही अभ्यास होतो.
 
हवामान विभागाकडे आता वेगवेगळी साधने आहेत. उपग्रहाद्वारे मिळणारी माहिती, रडारद्वारे मिळणारी माहिती, समुद्रावर येणारी माहिती, आपल्याकडे जमिनीच्या पृष्ठभागावर येणारी, वेगवेगळ्या हजारो स्वयंचलित हवामान केंद्रांतून येणारी सर्व माहिती आणि सर्व राज्यांकडून येणार्‍या माहितीनुसार वेगवेगळी गणिते जुळवून वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये कशाप्रकारे हवामान असेल, याची अचूकपणे माहिती देता येते.
 
हवामानबदलाचा सामना करण्यासाठी शासन आणि नागरिकांनी कोणती पावले उचलायला हवीत?
 
हवामानबदल हा जागतिक आहे, असे आपण म्हणतो. परंतु, त्याचे परिणाम आता प्रादेशिक स्तरावर दिसू लागले आहेत. हवामानातील तीव्र बदल हे सर्वसामान्यांना बाधित करू लागले आहेत. तुमचे आरोग्य, उद्योगधंदे, एकंदरच दिवसाचे कार्यक्रम आणि पुढे येणारे कार्यक्रम किंवा वेगवेगळ्या योजना हे सर्व हवामानाशी निगडित आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी अतिशय सुज्ञपणे चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या स्रोताकडून हवामानविषयक माहिती घेणे गरजेचे आहे. हवामान विभागाचे वेगवेगळे अ‍ॅप जसे- ‘मौसम’ अ‍ॅप, ‘दामिनी’ अ‍ॅप आहे. हवामान विभागाने काही दिवसांपूर्वी एक नवीन प्रणाली सुरू केली आहे, त्याला ‘मौसम ग्राम’ म्हणतो. तुम्ही पिनकोड टाका, तुम्हाला पुढच्या पाच दिवसांचे हवामान काय असेल याबद्दलची माहिती मिळू शकते.
दुसरे म्हणजे शाश्वत विकास हा देखील महत्त्वाचा आहे. आपण आज जी प्रगती करू, ती उद्यासाठी बाधक असू नये. केंद्रातर्फे आणि राज्यातर्फे तयार होणार्‍या वेगवेगळ्या धोरणांचा पुरेपूर वापर होणे गरजेचे आहे. २०२६ मध्ये यंदाचा पावसाळा सरासरीपेक्षा कमी असेल. पण, त्यामुळे घाबरून न जाता, त्याच्याशी समन्वय साधण्याची गरज आहे.
 
सध्याच्या प्रचंड वाढलेल्या तापमानामुळे उकाड्यात काय काळजी घेण्याचा सल्ला द्याल?
 
राज्यात सध्या तीव्र उन्हाळ्याचे दिवस आहेत. ज्यावेळी हवामान विभाग उष्णचेचा इशारा देतो, त्यावेळी लोकांनी काळजी घेण्याची गरज आहे. आपल्या शरीराला खूप अंशी पाण्याची गरज आहे. तहान लागेल तेव्हा पाणी पिऊ नका, तर तहान लागण्याच्या अगोदरच पाणी प्या. आपल्या बॅगेमध्ये नेहमी एक पाण्याची बाटली ठेवावी. तुम्ही कसे कपडे परिधान करता आणि कोणत्या अन्नपदार्थांचे सेवन करता, तेही महत्त्वाचे आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत खूप पचायला जड असे पदार्थ खाऊ नये, असे म्हणतात. बर्‍याचदा दिवसाच्या तापमानावर लोकांचे लक्ष केंद्रित असते. पण, रात्रीचे वाढलेले तापमानही शरीराला खूप अपायकारक आहे. त्यामुळे तुमची झोपेची वेळ बिघडू शकते आणि त्याचा ताण दुसर्‍या दिवशी आपल्याला कामावर दिसू शकतो. हवामान विभाग किंवा शासन काही गोष्टी करा किंवा काही गोष्टी करू नका, याबाबत माहिती देत असते. जरी यंदा उन्हाळा तीव्र असला, तरी त्याबद्दल काळजी घेतल्यास बर्‍याचशा गोष्टीतून आपल्याला मार्ग काढता येतो.

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....