बिल्डरांना पाठीशी घालण्यासाठी हे मविआचे सरकार नाही; नवनाथ बन यांची टीका

    09-May-2026   
Total Views |
Navnath Ban
 
मुंबई : (Navnath Ban) मिरा-भाईंदर येथील राज्य सरकारची एक इंचही जमीन बिल्डरच्या घशात जाऊ दिली जाणार नाही. त्यासाठी थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंतही लढू. ज्याप्रमाणे पत्राचाळ घोटाळ्यातील दोषींना तुरुंगात टाकले तसे इथेही आरोपींना तुरुंगात टाकले जाईल. कुठल्याही बिल्डरला पाठीशी घालायला हे काही महाविकास आघाडीचे सरकार नाही, अशा शब्दात भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी टीका केली.
 
नवनाथ बन म्हणाले की, "ज्या पद्धतीने संजय राऊत हे उच्च आणि सर्वोच्च न्यायालयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात, हा न्यायालयाचा अपमान आहे. मेधा सोमैया यांच्या अवमान प्रकरणांमध्ये संजय राऊत यांना सत्र न्यायालयाने दिलासा दिला की, योग्य न्याय दिला आणि दुसऱ्या प्रकरणात न्यायालयाने विरोधात निर्णय दिला की, न्यायालयाबद्दलच प्रश्नचिन्ह उपस्थित करायचे हा ढोंगीपणा, दुटप्पीपणा आहे."
 
तुमची परंपरा १०० कोटी वसुलीची
 
"पश्चिम बंगालमध्ये भाजपाची परंपरा काय आहे, हे सांगण्याच्या भानगडीत संजय राऊत यांनी पडू नये. तुमची परंपरा १०० कोटी रुपये वसुलीची होती. कार्टून फॉरवर्ड केले म्हणून नौदल अधिकाऱ्याचा डोळा फोडणे ही तुमची परंपरा होती. एवढेच नाही, तर कोविडमध्ये सर्वसामान्य माणूस मरत असताना प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाण्याची परंपरा महाविकास आघाडीची होती. सुवेंदू अधिकारी यांना भाजपने मुख्यमंत्री केले, कारण त्यांच्यावरचे कुठलेही आरोप सिद्ध झालेले नाहीत. आपल्यावरचे आरोप सिद्ध झालेले आहेत आणि जेलवारीही झालेली आहे. हे संजय राऊत यांनी लक्षात ठेवावे."(Navnath Ban)
 
 
इंडिया आघाडीत फूट
 
"राहुल गांधी आणि संजय राऊत यांच्या नेतृत्वातील इंडिया आघाडीत फूट पडली आहे, हे सांगायला कुठल्याही ज्योतिषाची गरज नाही. काँग्रेसने द्रमुकच्या पाठीत खंजीर खुपसत तामिळनाडूमधील 'टीव्हीके' पक्षाला समर्थन दिले. संजय राऊत, तुम्ही आणि राहुल गांधी यांनी अनेक प्रादेशिक पक्षांच्या पाठीत असाच खंजीर खुपसलेला आहे. द्रमुक नेते वेळीच सावध झाले. आमचे संसद सदस्य काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही, असे द्रमुकने लोकसभा सभापतींना कळवून टाकले आहे. उद्धव ठाकरे यांच्याही पाठीत काँग्रेस खंजीर खुपसणार आहे," असेही नवनाथ बन म्हणाले.(Navnath Ban)
 
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....