राष्ट्रीय पंचायत पुरस्कार २०२५ जाहीर

महाराष्ट्राच्या पंचायतींचा राष्ट्रीय स्तरावर ठसा बालस्नेही, पाणी-स्वयंपूर्ण आणि सुशासन श्रेणींत राज्याला मानाचे पुरस्कार रायगड, भंडारा आणि नाशिक जिल्ह्यांतील ग्रामपंचायती अव्वल

Total Views |
Maharashtra Gram Panchayat Awards
 
मुंबई : (Maharashtra Gram Panchayat Awards) पंचायत राज मंत्रालयाने जाहीर केलेल्या राष्ट्रीय पंचायत पुरस्कार २०२५ मध्ये महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींनी राष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी करत विविध श्रेणींमध्ये मानाचे पुरस्कार पटकावले आहेत. देशभरातील १७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील ४२ पंचायतींची निवड करण्यात आली असून, त्यात महाराष्ट्रातील चार ग्रामपंचायतींचा समावेश आहे. राष्ट्रीय पंचायत पुरस्कार वितरण सोहळा दि. ३ जून २०२६ रोजी नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात येणार आहे.
 
विशेष म्हणजे, ‘बाल-स्नेही पंचायत’ आणि ‘पाणी-पुरेशी पंचायत’ या महत्त्वाच्या श्रेणींमध्ये महाराष्ट्राने प्रथम क्रमांक मिळवला आहे. भंडारा जिल्ह्यातील इटगाव (पु.) ग्रामपंचायतीने ‘बाल-स्नेही पंचायत’ श्रेणीत देशात प्रथम क्रमांक मिळवत १ कोटी रुपयांचे पारितोषिक पटकावले. तसेच रायगड जिल्ह्यातील खरीवली ग्रामपंचायतीने ‘पाणी-पुरेशी पंचायत’ श्रेणीत अव्वल स्थान मिळवत १ कोटी रुपयांचा पुरस्कार मिळवला.
 
याशिवाय रायगड जिल्ह्यातीलच चांभारली ग्रामपंचायतीला ‘सामाजिकदृष्ट्या न्याय्य आणि सामाजिकदृष्ट्या सुरक्षित पंचायत’ श्रेणीत द्वितीय क्रमांक मिळाला असून तिला ३७.५ लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर झाले आहे. नाशिक जिल्ह्यातील निंबाळे ग्रामपंचायतीने ‘सुशासनासह पंचायत’ श्रेणीत देशात द्वितीय क्रमांक पटकावत ७५ लाख रुपयांचे पारितोषिक मिळवले आहे.
 
 
राष्ट्रीय पंचायत पुरस्कार २०२५ अंतर्गत दीनदयाल उपाध्याय पंचायत शाश्वत विकास पुरस्कार आणि नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत सातत्यपूर्ण विकास पुरस्कार अशा दोन प्रमुख श्रेणींमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात येत आहेत. शाश्वत विकास उद्दिष्टांच्या स्थानिकीकरणाशी निगडित नऊ संकल्पनांवर आधारित ग्रामपंचायतींच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यात आले.
 
देशभरात कर्नाटकने सर्वाधिक सहा पुरस्कार पटकावले, तर आंध्र प्रदेश आणि ओडिशाला प्रत्येकी पाच पुरस्कार मिळाले. केरळ, त्रिपुरा, आसाम आणि महाराष्ट्रानेही विविध श्रेणींमध्ये ठसा उमटवला.(Maharashtra Gram Panchayat Awards)
 
नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत सातत्यपूर्ण विकास पुरस्कारांत त्रिपुरातील सेपाहिजाला जिल्हा पंचायतला सर्वोत्तम जिल्हा पंचायत म्हणून ५ कोटी रुपयांचे प्रथम पारितोषिक जाहीर झाले. केरळमधील हरिप्पड ब्लॉक पंचायतला सर्वोत्तम ब्लॉक पंचायत पुरस्कार, तर आसाममधील नवीन नापम ग्रामपंचायतीला सर्वोत्तम ग्रामपंचायत पुरस्कार मिळाला.
 
विजेत्या पंचायतींना त्यांच्या श्रेणीनुसार ५० लाख ते ५ कोटी रुपयांपर्यंतची आर्थिक प्रोत्साहने दिली जाणार आहेत. हे पुरस्कार राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान (RGSA) अंतर्गत ‘पंचायतींना प्रोत्साहन’ योजनेच्या माध्यमातून दिले जातात.
 
पंचायत राज मंत्रालयाच्या माहितीनुसार, ग्रामीण भागातील सर्वसमावेशक, सहभागी आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी हे पुरस्कार महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. २०२३ पासून पुरस्कारांची चौकट शाश्वत विकास उद्दिष्टांच्या स्थानिकीकरणाशी संरेखित करण्यात आली असून, ‘विकसित भारत@२०४७’ या राष्ट्रीय उद्दिष्टाच्या पूर्ततेत ग्रामपंचायतींचा सहभाग अधिक बळकट करण्यावर भर देण्यात आला आहे.(Maharashtra Gram Panchayat Awards)
 
 

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.