हुतात्मा स्मारकावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी

स्मारक दुरुस्तीचा अहवाल सादर करण्याचे महापौरांचे निर्देश

    09-May-2026
Total Views |
Hutatma Smarak
 
मुंबई : (Hutatma Smarak) दक्षिण मुंबईतील फोर्ट परिसरातील हुतात्मा स्मारकाच्या दयनीय अवस्थेवरून शुक्रवारी मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील १०६ हुतात्म्यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या या स्मारकाच्या दुरुस्ती व सुशोभीकरणाची मागणी सर्व पक्षांच्या नगरसेवकांनी केली. त्यानंतर महापौर रितू तावडे यांनी आयुक्तांना पुढील सभागृह बैठकीत स्मारकाची दुरुस्ती, सुशोभीकरण आणि त्यासाठी आवश्यक निधी याबाबत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.
 
उद्धव सेनेचे नगरसेवक अंकित प्रभू यांनी सभागृहात हा मुद्दा उपस्थित करत प्रशासनावर दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. त्यांनी सांगितले की, ज्या १०६ हुतात्म्यांच्या बलिदानामुळे मुंबई महाराष्ट्राचा भाग बनली, त्याच स्मारकाकडे दुर्लक्ष केले जात आहे. ८१ हजार कोटी रुपयांच्या मनपा अर्थसंकल्पात जर या स्मारकाच्या दुरुस्तीसाठी तरतूद नसेल, तर अशा अर्थसंकल्पाचा उपयोग काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
 
काँग्रेस नेते अशरफ आझमी यांनी प्रभू यांच्या मागणीला पाठिंबा देत सांगितले की, स्मारकाची दुरुस्ती न झाल्यास विरोधक रस्त्यावर उतरतील. विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी सांगितले की, प्रशासकीय कारभाराच्या चार वर्षांत प्रशासनाला एकदाही या स्मारकाची आठवण झाली नाही. प्रशासनाकडे निधी नसेल तर विरोधक त्यांच्या २५ लाख रुपयांच्या विकास निधीतून मदत करण्यास तयार असल्याचेही त्यांनी सांगितले.(Hutatma Smarak)
 
हेही वाचा :  मुंबई महापालिका मुख्यालयात नगरसेवकांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्याची मागणी; भाजप कार्यालयात फेस रीडिंग प्रणाली सुरू
 
या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपही झाले. स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी स्मारकाच्या दुरुस्तीचे समर्थन करणाऱ्या काँग्रेसवर निशाणा साधला. मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचेच समर्थन उद्धव सेना का करत आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. काँग्रेसच्या प्रेमाची तुलना त्यांनी “पूतना मावशीच्या प्रेमाशी” करत त्यांच्या हातांवर हुतात्म्यांचे रक्त लागल्याची टीका केली.
 
शिंदे सेनेचे अमेय घोले यांनी काँग्रेसवर “चोर मचाए शोर” अशी टीका केली. तर सभागृह नेते गणेश खणकर यांनी विकास निधीचा मुद्दा येथे उपस्थित करण्याची गरज नव्हती, असे सांगत विरोधकांवरही टोला लगावला.(Hutatma Smarak)