मंत्रालयात ‘टेक वारी २.० महाराष्ट्र प्रशिक्षण सप्ताह’ संपन्न

टेक वारी २.० मुळे प्रशासनाला नवी दिशा - महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

    09-May-2026   
Total Views |
Digital Governance Maharashtra
 
मुंबई : (Digital Governance Maharashtra) विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्राचा संकल्प साकार करण्यासाठी प्रशासनात नाविन्यपूर्ण उपक्रमांची आवश्यकता असून, ‘टेक वारी २.०’च्या माध्यमातून राज्य प्रशासनाला नवी दिशा देण्याचे कार्य सुरू आहे, असे प्रतिपादन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
 
मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगण येथे आयोजित ‘टेक वारी २.० महाराष्ट्र प्रशिक्षण सप्ताह’ अंतर्गत महासाधना सप्ताहातील विशेष पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार, कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, सामान्य प्रशासन विभाग सेवा मुख्य अतिरिक्त सचिव व्ही. राधा तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमात व्ही. राधा यांनी प्रास्ताविकात ४ मेपासून आयोजित विविध प्रशिक्षण उपक्रमांची माहिती दिली.
 
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "सामान्य प्रशासन विभागाने ‘टेक वारी २.०’च्या माध्यमातून राज्याच्या प्रशासनाला नवी दिशा देण्याचे कार्य केले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने नागरिकांपर्यंत सेवा अधिक प्रभावीपणे पोहोचविण्याचा हा प्रयत्न असून, विविध विभागांमध्ये तंत्रज्ञानाधिष्ठित कार्यपद्धती विकसित करणे ही काळाची गरज आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्राचा संकल्प पूर्ण करण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे कार्य करावे." (Digital Governance Maharashtra)
 
 
‘टेक वारी २.०’ ही प्रशासनाच्या भविष्यकालीन तयारीचा भाग - मंत्री ॲड. आशिष शेलार
 
मंत्री आशिष शेलार यांनी ‘टेक वारी’ची तुलना पंढरपूरच्या वारीशी करताना सांगितले की, "वारीमध्ये जशी शिस्त, सातत्य, अध्यात्म आणि सामूहिकता आहे, त्याचप्रमाणे प्रशासनात तंत्रज्ञान आत्मसात करण्याची वृत्ती विकसित होणे आवश्यक आहे. डिजिटल साक्षरता ही आजच्या काळातील खरी साक्षरता बनली असून, प्रशासनातील प्रत्येक अधिकारी आणि कर्मचारी यांनी नव्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेतले पाहिजे. ‘टेक वारी २.०’ ही केवळ कार्यशाळा नसून प्रशासनाच्या भविष्यकालीन तयारीचा भाग आहे. ‘विरासत से विकास तक’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार सांस्कृतिक वारसा जपत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विकास साधण्याचा हा प्रयत्न आहे." (Digital Governance Maharashtra)
 
कर्मचाऱ्यांनी स्वतःला ‘फ्युचर रेडी’ बनविणे आवश्यक - मंत्री मंगल प्रभात लोढा
 
कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी ‘टेक वारी’ उपक्रमामुळे प्रशासन अधिक भविष्यवेधी बनत असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य प्रशासन जागतिक स्तरावरील स्पर्धेसाठी सज्ज होत असून, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्वतःला ‘फ्युचर रेडी’ बनविणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. (Digital Governance Maharashtra)
 
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....