रेल्वेची 40 वर्षे जुनी तिकीट प्रणाली कात टाकणार

संक्रमणादरम्यान प्रवाशांना कोणतीही अडचण येऊ नये;केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी घेतला आढावा

Total Views |
Ashwini Vaishnav
 
मुंबई : (Ashwini Vaishnaw Railway Update) भारतीय रेल्वेच्या प्रवासी आरक्षण प्रणालीच्या आधुनिकीकरण प्रक्रियेचा केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकताच आढावा घेतला. जुन्या आरक्षण प्रणालीवरून नव्या अत्याधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्मकडे होणाऱ्या संक्रमणादरम्यान प्रवाशांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी अधिकाऱ्यांना विशेष दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.
 
रेल्वे मंत्रालयातील रेल भवन येथे झालेल्या या बैठकीला केंद्रीय राज्यमंत्री व्ही. सोमाण्णा आणि रनवीत सिंग बिट्टू यांच्यासह रेल्वेच्या आधुनिकीकरण कार्यक्रमाशी संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. नव्या प्रवासी आरक्षण प्रणालीकडे टप्प्याटप्प्याने संक्रमणाची प्रक्रिया यावर्षी ऑगस्टपासून सुरू होणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
 
भारतीय रेल्वेची विद्यमान आरक्षण प्रणाली प्रथम १९८६ मध्ये सुरू करण्यात आली होती. गेल्या चार दशकांत या प्रणालीमध्ये अनेक टप्प्यांत सुधारणा करण्यात आल्या; मात्र वाढती प्रवासी संख्या, ऑनलाइन बुकिंगवरील वाढता ताण आणि अधिक वेगवान सेवांची गरज लक्षात घेता आता संपूर्ण प्रणाली नव्या तंत्रज्ञानाच्या आधारे पुन्हा विकसित करण्यात आली आहे.
 
हेही वाचा :  Suvendu Adhikari Bengal CM : सुवेंदु अधिकारी होणार पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री!
 
अधिकाऱ्यांच्या मते, नव्या डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे तिकीट बुकिंग क्षमता वाढणार असून आरक्षण प्रक्रिया अधिक जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह होईल. तसेच मोठ्या प्रमाणावरील बुकिंगदरम्यान प्रणालीवर येणारा ताण कमी करण्यासाठी अत्याधुनिक तांत्रिक सुविधा समाविष्ट करण्यात आल्या आहेत. भारतीय रेल्वेने २००२ मध्ये ऑनलाइन तिकीट आरक्षण सेवा सुरू करून प्रवाशांच्या सेवांमध्ये मोठा बदल घडवून आणला होता. आता नव्या आरक्षण प्रणालीमुळे रेल्वेच्या डिजिटल सेवांना आणखी गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (Ashwini Vaishnaw Railway Update)
 
 

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.