तामिळनाडूच्या ‘विजया’ला काँग्रेससह डाव्यांचाही टेकू! - 119 आमदारांच्या समर्थनासह ‘टीव्हीके’चा सत्तास्थापनेचा दावा; द्रमुक-अण्णाद्रमुक आघाडीच्या चर्चांवर अखेरीस पडदा

    08-May-2026
Total Views |
 Vijay TVK support
 
चेन्नई : (Vijay TVK support) काँग्रेसच्या पाठिंब्यावर ‘टीव्हीके’ने पूर्वी केलेला सत्तास्थापनेचा दावा राज्यपालांनी अपुर्‍या संख्याबळामुळे फेटाळल्यानंतर तामिळनाडूमध्ये एक वेगळेच राजकीय कोडे निर्माण झाले होते. परंतु, शुक्रवारी तामिळनाडूमध्ये सत्तास्थापनेसाठीचे गणित जुळवण्यात जोसेफ विजय यांच्या ‘टीव्हीके’ पक्षाला यश आले असून, प्रादेशिक पक्ष आणि डाव्यांच्या टेकूवर विजय यांनी राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्याकडे पुन्हा सत्तास्थापनेचा दावा केला आहे.
 
परवाच काँग्रेसच्या पाच आमदारांनी विजय यांना आधीच पाठिंबा जाहीर केला होता. आता तामिळनाडूचा प्रादेशिक पक्ष असलेला ‘विदुथलाई चिरुथईगल काची’ अर्थात ‘व्हीसीके’ पक्षाच्या आमदारांनीही ‘टीव्हीके’ला पाठिंबा जाहीर केला आहे. ‘व्हीसीके’चे विधानसभा निवडणुकीमध्ये दोन आमदार निवडून आले होते, तर, ‘सीपीआय’ आणि ‘सीपीआय-एम’ या दोन्ही पक्षांनीही ‘टीव्हीके’ला बिनशर्त पाठिंबा दर्शविला केला. या दोन्ही पक्षांकडेही प्रत्येकी दोन आमदार आहेत. एकूणच काँग्रेस, व्हीसीके, सीपीआय आणि सीपीआय-एम या चारही पक्षांच्या पाठिंब्यामुळे ‘टीव्हीके’कडे 119 आमदारांचे संख्याबळ झाले असून, बहुमताचा 118 आमदारांचा आकडा ओलांडल्याने विजय यांनी सत्तास्थापनेचा दावा केला आहे.
 
दरम्यानच्या काळात मागील वेळीस जेव्हा राज्यपाल आर्लेकर यांनी सरकार स्थापनेसाठी आवश्यक आमदारांचे संख्याबळ दाखवण्याच्या सूचना, ‘टीव्हीके’चे सर्वेसर्वा जोसेफ विजय यांना केल्याने राज्यपालांवर टीका केली जात आहे. मात्र, राज्यपालांचे वर्तन नियमानुसार असल्याचे समोर आले आहे. संविधानाच्या भारतीय राज्यघटनेच्या कलम 164(1) नुसार मुख्यमंत्री नेमण्याचा अधिकार राज्यपालांना असून, सभागृहात बहुमत मिळवण्याची क्षमता असलेल्या व्यक्तीलाच राज्यपाल सरकार स्थापनेसाठी आमंत्रित करतात.
 
हेही वाचा :  Vijay Thalapathy TVK : तामिळनाडूमध्ये विजय सरकारची शक्यता प्रबळ; काँग्रेससह डाव्या पक्षांचा टीव्हीकेला पाठिंबा
 
त्रिशंकू विधानसभेच्या परिस्थितीत, राज्यपाल भारतीय संविधानाच्या कलम 163(1) अंतर्गत मिळालेला विवेकाधीन अधिकार वापरून सभागृहाचा विश्वास मिळवण्याची सर्वाधिक शक्यता असलेल्या नेत्याची निवड करतात. एखाद्या पक्षाच्या बहुमताविषयी विश्वास नसल्यास राज्यपालांना त्याचा दावा फेटाळण्याचाही अधिकार असल्याचा निर्णय, सर्वोच्च न्यायलयाने 2006 मधील ‘रामेश्वर प्रसाद विरुद्ध भारत संघ’ खटल्यामध्ये दिला होता. त्यामुळे तामिळनाडूमध्ये राज्यपालांचे वर्तन हे न्यायाला अनुसरूनच असल्याचे सिद्ध होते.(Vijay TVK support)
 
विश्वासघातामुळे द्रमुकची काँग्रेसबरोबर कट्टी!
 
तामिळनाडू विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसने जवळपास दोन दशकांची द्रमुकबरोबरची आघाडी मोडून, ‘टीव्हीके’बरोबर हातमिळवणी केली. काँग्रेसच्या या निर्णयामुळे काँग्रेस स्वार्थी असल्याचा आरोप द्रमुकने केला असून, यापुढे लोकसभेमध्ये काँग्रेस खासदारांबरोबर बसणार नसल्याचे द्रमुकने पत्र लिहून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना कळवले आहे. तसेच, द्रमुकच्या खासदारांसाठी वेगळी बैठक व्यवस्था करण्याची विनंतीही द्रमुकने पत्राद्वारे केली आहे.(Vijay TVK support)