सरकारी प्रकल्पासाठी ८०० वर्षे जुन्या शिवमंदिरावर तेलंगणा सरकारचा बुलडोझर तर दुसरीकडे हज यात्रेकरूंना तेलंगणा सरकारकडून आर्थिक दिलासा

    08-May-2026   
Total Views |
Telangana Temple
 
मुंबई : (Telangana Temple) तेलंगणातील वारंगल जिल्ह्यातील सुमारे ८०० वर्षे जुन्या काकतीयकालीन शिवमंदिराच्या पाडकामामुळे मोठा संताप व्यक्त होत असून, केंद्रीय संस्कृती मंत्रालय आणि इतिहासकारांनी या प्रकरणात जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली आहे. खानापूर मंडलातील अशोक नगर येथे असलेले हे मंदिर सरकारच्या इंटिग्रेटेड स्कूल प्रकल्पासाठी जागा मोकळी करण्याच्या उद्देशाने बुलडोझरने पाडल्याचा आरोप आहे.
 
वारसा विभागाने १९६५ मध्ये या स्थळाची नोंद केली होती. हे मंदिर ऐतिहासिक “कोटा कट्टा” मातीच्या किल्ल्याच्या परिसरात होते, जो प्राचीन तटबंदींसाठी प्रसिद्ध आहे. तज्ज्ञांच्या मते, हे वारसास्थळ सहजपणे जतन करता आले असते किंवा दुसरीकडे स्थलांतरित करता आले असते. पुरातत्त्व आणि धर्मादाय विभागांची आवश्यक परवानगी न घेता कामास मंजुरी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर तेलंगणा वारसा कायद्याच्या कलम ३० अंतर्गत कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच राज्य सरकारने आवश्यक असलेली हेरिटेज कन्झर्वेशन कमिटी स्थापन करण्यात अपयश आल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
 
या प्रकरणावरून निर्माण झालेल्या संतापानंतर वारंगल जिल्हाधिकारी कार्यालयाने ६ मे रोजी संयुक्त पाहणीनंतर स्पष्टीकरण जारी केले. प्रशासनाने जाणूनबुजून मंदिर पाडल्याचा आरोप फेटाळून लावत, ३० एकर परिसरातील दाट झाडी हटविताना “जुन्या मोडकळीस आलेल्या रचनेचे अवशेष” आढळल्याचा दावा केला. तसेच या संरचनेची अधिकृत संरक्षित स्मारक म्हणून नोंद नसल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.(Telangana Temple)
 
 
तथापि, जनक्षोभ शांत करण्यासाठी वारंगलच्या जिल्हाधिकारी डॉ. सत्य शारदा आणि नरसंपेटचे आमदार डोंथी माधव रेड्डी यांनी घटनास्थळी भेट देत, त्याच ठिकाणी मंदिराचे पूर्ण पुनर्निर्माण करण्याचे आश्वासन दिले. इतिहासकार, स्थापत्यविशारद आणि पुरातत्त्व विभागाच्या सल्ल्याने हे पुनर्बांधकाम करण्यात येणार असून, त्या स्थळाला अधिकृत संरक्षण देण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.(Telangana Temple)
 
हज यात्रेकरूंच्या वाढीव विमानभाड्याचा भार तेलंगणा सरकार उचलणार!
 
अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाने गेल्या आठवड्यात जाहीर केलेल्या हज यात्रेच्या विमानभाड्यातील प्रति यात्रेकरू १० हजार रुपयांच्या एकरकमी वाढीचा अतिरिक्त भार राज्य सरकार उचलणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली, तरी मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी हा अतिरिक्त खर्च राज्य सरकारकडून उचलण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते आहे. यंदा तेलंगणातून सुमारे ७ हजार यात्रेकरूंनी हज यात्रेसाठी नोंदणी केल्याची माहिती आहे.(Telangana Temple)
 
 

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक