स्वयंसेवकांसोबत मातृशक्ती खंबीरपणे उभी असून राष्ट्रनिर्माणात तिचे योगदान महत्त्वपूर्ण; अखिल भारतीय सह प्रचार प्रमुख प्रदीप जोशी यांचे प्रतिपादन

    08-May-2026   
Total Views |
Rashtriya Swayamsevak Sangh
 
मुंबई : (Rashtriya Swayamsevak Sangh) समाजजीवनातील जवळपास सर्वच क्षेत्रांत मातृशक्तीचा सक्रिय सहभाग राहिला आहे. संघाच्या शताब्दी प्रवासातही मातृशक्तीची भूमिका विविध स्तरांवर ठळकपणे जाणवते. स्वयंसेवकांसोबत मातृशक्ती खंबीरपणे उभी असून, सामाजिक कार्य, संस्कार आणि राष्ट्रनिर्माणात तिचे योगदान महत्त्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सह प्रचार प्रमुख प्रदीप जोशी यांनी केले.
 
नेहरू सेंटर, हॉल ऑफ हार्मनी, वरळी येथे गुरुवार, दि. ०७ मे रोजी सायंकाळी ६ वाजता 'शतायु संघ आणि महिला सहभागिता' या पुस्तकाच्या निमित्ताने एक कार्यक्रम संपन्न झाला.
 
याप्रसंगी व्यासपीठावर राष्ट्र सेविका समितीच्या प्रचारिका आणि अखिल भारतीय सह संयोजिका महिला समन्वय भाग्यश्री साठ्ये, पुस्तकाच्या लेखिका डॉ. शोभा विजेन्द्र, कार्यक्रमाच्या अध्यक्षा वर्षा तावडे आणि निदर्शना गोवानी आदी मान्यवर उपस्थित होते.(Rashtriya Swayamsevak Sangh)
 
संघाची १०० वर्षांची यात्रा ही केवळ कालप्रवास नसून एक “विकास यात्रा” असल्याचे प्रदीप जोशी यांनी सांगितले. संघस्थानावर व्यक्तिनिर्माणाचे कार्य घडत असताना स्वयंसेवकांना गुणवान बनविण्यावर भर दिला जातो. समाजासाठी वेळप्रसंगी उभे राहण्याचे सामर्थ्य त्यांच्यात विकसित केले जाते. समाजजीवनात जबाबदारीने कार्य करणारा नागरिक घडविणे हा संघकार्याचा केंद्रबिंदू असल्याचे त्यांनी नमूद केले.
 
हेही वाचा :  सर्व अस्तित्व एक असल्याची भावना; सामाजिक समरसतेचा मूलाधार; सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन
 
पुढे ते म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मूळ उद्देश सुरुवातीपासूनच व्यक्तिनिर्माण हा राहिला असून, याच कारणामुळे संघाने दीर्घकाळ प्रसिद्धीपासून स्वतःला दूर ठेवले. मात्र, या काळात संघाशी संबंध नसलेल्या अनेकांनी संघाविषयी विविध समज-गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तसेच संघावर अनेक आक्षेपही घेतले गेले.
 
भाग्यश्री साठ्ये उपस्थितांना संबोधत म्हणाल्या की, संघातील महिला कार्य आणि महिला कार्यात सहभागी असलेले संघ स्वयंसेवक हे विलक्षण एकात्मतेचे प्रतीक आहेत. महिलांच्या स्वभाव, आवड आणि कार्यपद्धतीनुसार समितीचे कार्य उभे राहावे, संघाचे अनुकरण करू नये, असे प.पू.डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी स्पष्टपणे सांगितले होते. संघाच्या शाखेमध्ये महिला प्रत्यक्ष दिसत नसल्या, तरी विविध क्षेत्रांत महिलांचे कार्य प्रभावीपणे सुरू आहे. गुजरातमधील वनवासी भागात “घराघरांत महिला सहज पोहोचू शकते” या विचारातून अवघ्या सात दिवसांत १४०० महिलांचा सहभाग निर्माण करण्यात आला. संघविचार म्हणजे राष्ट्रविचार असून, त्यामध्ये महिलांचा सहभाग अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातो. देशभरात आयोजित विविध उपक्रमांमध्ये महिलांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.(Rashtriya Swayamsevak Sangh)
 
पुस्तकाच्या लेखिका डॉ. शोभा विजेंद्र यांनी आपल्या 'शतायु संघ और महिला सहभागिता' पुस्तकाविषयी माहिती देताना सांगितले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघात महिलांना स्थान नाही असे म्हणत काही लोक विनाकारण केवळ संघावर आक्षेप लावायचा म्हणून आरोप करतात. ही गोष्टी मला अजिबात पटत नाही. सज्जनांनी सांगितले की, संघाकडे अजूनही काही आवश्यक दस्तऐवज आणि पुरेशा डॉक्युमेंटेशनची कमतरता असल्यामुळे साम्यवादी विचारसरणीतून निर्माण झालेल्या काही भ्रम अजूनही पसरवले जातात. महिलांच्या प्रश्नांवर भूमिका मांडण्यासाठी आणि संघाचे विचार प्रभावीपणे मांडण्यासाठी जेव्हा एखादी महिला पुढे येते, तेव्हा तिच्या उत्तरांचा प्रभाव अधिक ठळकपणे जाणवतो. हा सर्व ऊहापोह या पुस्तकात मांडला आहे.
 
राष्ट्रीय विचारांबाबत सजग राहण्याची गरज
 
देशामध्ये भारतीय आदर्श बदलण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चिंता व्यक्त करताना, या विषयांवर प्रत्येक कुटुंबात चर्चा होणे आवश्यक असल्याचे प्रदीप जोशी यांनी सांगितले. समाजाने आपल्या संस्कृती, मूल्ये आणि राष्ट्रीय विचारांबाबत सजग राहण्याची गरजही यावेळी त्यांनी अधोरेखित केली.(Rashtriya Swayamsevak Sangh)
 
 

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक