कार्पोरेट जिहादची मास्टरमाईंड निदा खानला चार दिवसांची पोलीस कोठडी
08-May-2026
Total Views |
नाशिक : (Nida Khan Arrest) नाशिकमधील बहुचर्चित कार्पोरेट जिहाद आणि कथित धर्मांतर प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निदा खान हिच्या मुसक्या आवळण्यात नाशिक पोलिसांना छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या मदतीने यश आले आहे. शुक्रवार, दि. ८ मे रोजी तिला नाशिकरोड न्यायालयात हजर केले असता, चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
‘इन कॅमेरा’ झाली सुनावणी
या प्रकरणाचे गांभीर्य आणि सुरक्षेच्या दृष्टीने ही सुनावणी ‘इन कॅमेरा’ पार पडली. यावेळी न्यायालयाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सरकारी पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी युक्तिवाद करताना पोलीस कोठडीची मागणी केली. तर निदा खानची बाजू अॅड. राहुल कासलीवाल व अॅड. बाबा सय्यद यांनी मांडली. निदा खान गर्भवती असल्याने तिला जामीन देण्याची मागणी करण्यात आली होती, मात्र न्यायालयाने ती अमान्य करत पोलीस कोठडी सुनावली.
आश्रय देणाऱ्यांना गुन्हेगार करण्यात येणार
संशयित आरोपी निदा खान हिला तिच्या कुटुंबासह छत्रपती संभाजीनगर येथे आश्रय देणाऱ्या नगरसेवक मतीन पटेल यालाही या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे. कायदेशीर प्रक्रियेत अडथळा आणणाऱ्या आणि आरोपींना मदत करणाऱ्या प्रत्येकावर कडक कारवाई केली जाईल.
पीडित हिंदू तरुणीला संशयित आरोपी दानिश शेख याने टीसीएस कंपनीत नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. जुलै २०२२ मध्ये नाशिकच्या खंडोबा टेकडी परिसरात त्याने पीडितेशी गैरवर्तन केले आणि लग्नाचे वचन देऊन तिला विश्वासात घेतले. त्यानंतर ऑगस्ट २०२४ मध्ये त्र्यंबक रोडवरील एका रिसॉर्टवर नेऊन तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक अत्याचार केले.(Nida Khan Arrest)
विवाहित असूनही केली फसवणूक
फेब्रुवारी २०२६ मध्ये माहिरीन नावाच्या महिलेचा पीडितेला फोन आला. तेव्हा दानिश हा आधीच विवाहित असून त्याला दोन मुले असल्याची बाब समोर आली. याबाबत पीडितेने दानिशला जाब विचारला असता, त्याने लग्न करण्याबाबत उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच, तौसिफ अख्तर याने पीडितेच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याची धमकी देऊन ऑफिसच्या पॅन्ट्रीमध्ये तिचे लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केला. तपासादरम्यान या गुन्ह्यात अॅट्रॉसिटीचे कलम वाढवण्यात आले होते.(Nida Khan Arrest)