केईएम आणि सायन रुग्णालयांत नव्या वैद्यकीय सेवांचा शुभारंभ

    08-May-2026
Total Views |
KEM Hospital Mumbai

मुंबई : (KEM Hospital Mumbai) मुंबईकरांना अधिक गुणवत्तापूर्ण आणि अत्याधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध वैद्यकीय सुविधांचे आज महापौर रितू तावडे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. परळ येथील केईएम रुग्णालय तसेच धारावी येथील लोकनेते एकनाथराव गायकवाड नागरी आरोग्य केंद्र येथे हा कार्यक्रम पार पडला.
 
केईएम रुग्णालयात (KEM Hospital Mumbai) नवजात शिशू अतिदक्षता विभाग (NICU), मॅमोग्राफी मशीन, सर्जिकल पॅथोलॉजी सेमिनार सभागृह आणि फिजिओलॉजी सेमिनार सभागृहाचे उद्घाटन करण्यात आले. तर लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय संलग्नित धारावी येथील लोकनेते एकनाथराव गायकवाड नागरी आरोग्य केंद्रात बालरोग, रक्तदोष, कर्करोग आणि बोनमॅरो ट्रान्सप्लांट केंद्र सुरू करण्यात आले.
 
यावेळी बोलताना महापौर रितू तावडे म्हणाल्या की, महानगरपालिकेच्या रुग्णालयांत अत्याधुनिक उपकरणे आणि दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध होत असल्याचा अभिमान आहे. महिलांच्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणारे मॅमोग्राफी उपकरण उपलब्ध झाल्याने स्तनाच्या कर्करोगाचे वेळेत निदान आणि उपचार शक्य होणार असून महिलांना इतरत्र धावपळ करावी लागणार नाही.
 
 
नवजात शिशू अतिदक्षता विभागामुळे अकाली जन्मलेली किंवा कमी वजनाची बालके तसेच तातडीच्या उपचारांची गरज असलेल्या नवजात शिशूंना अधिक सुरक्षित आणि प्रभावी उपचार मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. या सुविधेमुळे संसर्ग नियंत्रण आणि बालकांची देखरेख अधिक सक्षम होईल, असेही त्यांनी नमूद केले.
 
‘जागतिक थॅलेसेमिया दिना’निमित्त धारावी येथील नव्या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. बृहन्मुंबई महानगरपालिका आणि ‘वेहा फाऊंडेशन’च्या संयुक्त प्रयत्नातून सुरू करण्यात आलेल्या या केंद्रात सहा रुग्णशय्या, डे-केअर केमोथेरपी कक्ष आणि आंतररुग्ण सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी ही सेवा महत्त्वाची ठरणार आहे. बोनमॅरो ट्रान्सप्लांट सुविधा उपलब्ध करून देणारे हे महानगरपालिकेचे पहिले रुग्णालय असल्याचे महापौरांनी सांगितले.
 
यावेळी सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्ष हरिष भांदिर्गे, उपआयुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे, संचालक डॉ. शैलेंद्र मोहिते, अधिष्ठाता डॉ. प्रमोद इंगळे, डॉ. हरिश पाठक तसेच ‘वेहा फाऊंडेशन’च्या रुमाना हमीद उपस्थित होत्या.(KEM Hospital Mumbai)
 
दरम्यान, थॅलेसेमिया दिनानिमित्त रुग्णालयातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी थॅलेसेमिया स्क्रीनिंग उपक्रमालाही सुरुवात करण्यात आली.(KEM Hospital Mumbai)