शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्याकडून दहावीतील यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन - राज्यात ९२.०९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण- मुलांपेक्षा मुलींचे उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ५.४० ने अधिक

    08-May-2026
Total Views |
Dada Bhuse

मुंबई : (Dada Bhuse) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षेचा निकाल शुक्रवार दि.८ रोजी मंडळामार्फत जाहीर करण्यात आला असून यशस्वी विद्यार्थ्यांचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी अभिनंदन केले आहे.
 
"या परीक्षेत ज्यांना अपेक्षित यश मिळाले नाही, त्यांनी खचून न जाता पुन्हा प्रयत्न करावेत, शासन आपल्या पाठिशी आहे.विद्यार्थी हे महाराष्ट्राचे भविष्य आहेत. त्यांच्या कर्तृत्वाने त्यांच्याबरोबरच राज्य आणि देश निश्चितच प्रगती करेल." असा विश्वास भुसे यांनी यावेळी व्यक्त केला.
 
ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या अथक परिश्रमाने आणि जिद्दीने या परीक्षेत दैदीप्यमान यश संपादन केले आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांबरोबरच त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहणारे शिक्षक आणि माता-पिता यांचेही विशेष अभिनंदन मंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे.
 
निकालाची वैशिष्ट्ये
 
या परीक्षेत राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण १५,५५,०२६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५,४२,४७२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून १४,२०,४८६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उतीर्णतेची टक्केवारी ९२.०९ इतकी आहे.(Dada Bhuse)
 
मुलींचे उत्तीर्ण होण्याची टक्केवारी अधिक
 
दहावीची परीक्षा दिलेल्या एकूण ८,२०,४२७ मुलांपैकी ७,३४,८१४ मुले (८९.५६ टक्के) तर एकूण ७,२२,०४५ मुलींपैकी ६,८५,६७२ मुली (९४.९६ टक्के) उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ५.४० ने अधिक आहे.
 
 
कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक
 
सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल (९७.६२ टक्के) सर्वाधिक असून सर्वात कमी निकाल छत्रपती संभाजीनगर विभागाचा (८८.४१ टक्के) आहे. इतर विभागांमध्ये कोल्हापूर विभागाचा निकाल ९५.४७ टक्के, मुंबई- ९४.९७, पुणे- ९४.२४, नाशिक- ९०.५३, अमरावती- ९०.५०, नागपूर- ८९.०७ तर लातूर विभागाचा निकाल ८८.४२ टक्के लागला आहे.
 
श्रेणीनिहाय निकाल
 
एकूण उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये प्राविण्यासह प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण २७.४१ टक्के, प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण ३१.२६ टक्के, द्वितीय श्रेणीमध्ये २४.६६ टक्के तर उत्तीर्ण श्रेणीमध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण ८.७५ टक्के इतके आहे.(Dada Bhuse)