मुंबई महापालिका मुख्यालयात नगरसेवकांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्याची मागणी; भाजप कार्यालयात फेस रीडिंग प्रणाली सुरू
08-May-2026
Total Views |
मुंबई : (Corporator Attendance System) मुंबई महानगरपालिका मुख्यालयात येणाऱ्या सर्व पक्षांच्या नगरसेवकांसाठी बायोमेट्रिक हजेरी अनिवार्य करण्यात यावी, अशी मागणी पुढे आली आहे. भाजपचे कुलाबा विभागातील नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी यासंदर्भात महापौर रीतू तावडे यांना पत्र लिहून सर्व नगरसेवकांसाठी बायोमेट्रिक उपस्थिती प्रणाली लागू करण्याची मागणी केली आहे.
विशेष म्हणजे, मनपा मुख्यालयातील भाजप कार्यालयात भाजप नगरसेवकांसाठी बायोमेट्रिक हजेरी मशीनची अंमलबजावणी आधीच करण्यात आली असून फेस रीडिंग प्रणाली सुरू करण्यात आली आहे.
मकरंद नार्वेकर यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, बायोमेट्रिक हजेरी अनिवार्य केल्यास मुंबई महापालिकेच्या कामकाजात पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल. भाजप कार्यालयात ही प्रणाली यशस्वीरीत्या राबविण्यात आली असून त्यामुळे उपस्थितीची अचूक नोंद ठेवता येत आहे तसेच नगरसेवकांमध्ये शिस्तही वाढली आहे, असे त्यांनी नमूद केले.
याच धर्तीवर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेसाठीही अशीच प्रणाली लागू करण्यात यावी, असा त्यांचा प्रस्ताव आहे. त्यांच्या मते, या व्यवस्थेमुळे नगरसेवकांमध्ये वेळेचे पालन आणि सक्रिय सहभागाला प्रोत्साहन मिळेल. तसेच पारदर्शक प्रशासनामुळे नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होईल.
मकरंद नार्वेकर यांनी पत्रात असेही म्हटले आहे की, नागरिक आपल्या निवडून दिलेल्या प्रतिनिधींकडून अधिक उत्तरदायित्वाची अपेक्षा करत असताना, हा निर्णय सुशासनाप्रती महानगरपालिकेची बांधिलकी दर्शवणारा ठरेल. (Corporator Attendance System)
यापूर्वी माजी नगरसेवक आणि खासदार मनोज कोटक यांनीही मनपा सभागृहात सूचना मांडत नगरसेवकांसाठी बायोमेट्रिक हजेरी सुरू करण्याची मागणी केली होती. त्या प्रस्तावाला मनपा सभागृहाने मंजुरी दिली होती. (Corporator Attendance System)