मुंबई : (Amit Shah West Bengal Speech) "ज्या प्रकारे आसाममध्ये घुसखोरी पूर्णपणे रोखली, त्याच प्रकारे आता बंगालमध्येही तसेच चित्र दिसेल. भाजपच पश्चिम बंगालला घुसखोरीमुक्त करणार. भाजपचा मुख्यमंत्री झाल्यानंतर यावर तातडीने कारवाई सुरू होईल. बंगालमधील भाजपच्या विजयामुळे राष्ट्रीय सुरक्षाही सुनिश्चित झाली आहे”, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले. पश्चिम बंगालच्या राजकारणात एका नव्या युगाची नांदी करत, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कोलकाता येथे भाजपच्या नवनिर्वाचित विधिमंडळ पक्षाला संबोधित केले. या प्रसंगी, राज्यात प्रथमच पूर्ण बहुमताचे भाजप सरकार स्थापन झाल्याबद्दल आनंद व्यक्त करताना, शाह यांनी याला 'वैचारिक विजय' असे संबोधले.
काँग्रेसवर निशाणा साधताना अमित शाह म्हणाले, “काँग्रेस पक्ष अनेक वर्षांपासून निवडणुका जिंकू शकलेला नाही. निवडणूक जिंकणे अशक्य असल्याचे त्यांना समजले आहे, त्यामुळे आता ते निवडणूक प्रक्रियेलाच बदनाम करण्याच्या प्रयत्नात आहेत. म्हणूनच काँग्रेसचे प्रमुख नेते राहुल गांधी यांनी आपल्या पराभवावर पडदा टाकण्यासाठी कधी ईव्हीएम, कधी मतदार यादी, कधी एसआयआर, तर कधी मतचोरीसारखे आरोप करून चिखलफेक करण्याचा प्रयत्न केला आहे,”
पुढे ते म्हणाले की, "आम्ही तर २०१४ मध्ये सत्तेत आलो. तमिळनाडूमध्ये १९६७ पासून आजपर्यंत काँग्रेसचा मुख्यमंत्री झालेला नाही. तीही मतचोरी होती का? पश्चिम बंगालमध्ये ४९ वर्षांपासून काँग्रेसचा मुख्यमंत्री झालेला नाही. सिक्कीममध्ये ४२ वर्षांपासून, बिहारमध्ये ३६ वर्षांपासून, गुजरातमध्ये ३० वर्षांपासून, ओडिशामध्ये २६ वर्षांपासून, नागालँडमध्ये २३ वर्षांपासून आणि महाराष्ट्रात १२ वर्षांपासून काँग्रेसचा मुख्यमंत्री नाही. जर हे सर्व मतचोरीमुळे झाले असेल, तर मतचोरी करणारे लोक तुमच्याच सोबत बसलेले आहेत. हे सर्व इंडी आघाडीचे सदस्य आहेत. काँग्रेस पक्षाने आपल्या पराभवाचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. राहुल गांधी नेतृत्व स्वीकारल्यानंतर देशातील जनता टप्प्याटप्प्याने काँग्रेसविरोधात कौल देत आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालीच इंडी आघाडीच्या विघटनालाही सुरुवात झाली आहे.”(Amit Shah West Bengal Speech)
भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी ‘सबका साथ, सबका विश्वास’ या मार्गावर चालण्याची घोषणा करत संदेशखाली प्रकरणाची चौकशी करण्याबाबत आश्वासन दिले. त्यासाठी चौकशी आयोगाची स्थापना करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. दोषींविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल याबाबत त्यांनी स्पष्टता दिली.
भाषणाच्या शेवटी कार्यकर्त्यांना आवाहन
आपल्या भाषणाच्या शेवटी अमित शाह यांनी कार्यकर्त्यांना संयम आणि विनम्रतेचे आवाहन केले. ते म्हणाले, “सरकार स्थापन झाल्यानंतर कोणत्याही प्रकारची हिंसा किंवा सूडाचे राजकारण होऊ नये. जनतेने आम्हाला सेवेची संधी दिली आहे आणि आम्ही पूर्ण निष्ठेने दिलेली आश्वासने पूर्ण करू.”(Amit Shah West Bengal Speech)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक